उगवतीचे रंग रामरक्षा : एक अद्वितीय स्तोत्र लहानपणी आई आम्हाला देवासमोर बसून शुभंकरोती, रामरक्षा, मनाचे श्लोक आदी म्हणायला लावत असे. आता तर बदलत्या काळानुसार हे सगळे मागे पडले आहे. पण मंत्र आणि स्तोत्र पठणाचे महत्व तसेच अबाधित आहे. रामरक्षा बुधकौशिक ऋषींनी लिहिली त्याला हजारो वर्षे होऊन गेली, पण आजही पारंपरिक स्तोत्रात त्याचे स्थान फार वरचे आहे. हे स्तोत्र घरातील आबालवृद्धांनी म्हणायचे स्तोत्र आहे. ते मंत्र आहे. कवच आहे. रक्षा म्हणजे रक्षण करणारे आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवांसाठी त्याचे विशिष्ट श्लोक आहेत. त्या त्या श्लोकांसाठी रामाच्या वेगवेगळ्या नावाचा उल्लेख केला आहे. उदा ' शिरो मे राघव: पातु भालं दशरथात्मजा " म्हणजे रघुकुल भूषण ' राघव ' म्हणजेच राम माझ्या मस्तकाचे रक्षण करो. दशरतपुत्र राम माझ्या भालाचं म्हणजे कपाळाचे रक्षण करो. त्या त्या शब्दात विशिष्ट अर्थही दडलेला आहे. पण आज आपण तेवढ्या खोलात जाणार नाही आहोत. तसेही रामरक्षेचा अर्थ आपल्याला बऱ्याच पुस्तकातून वाचायला मिळतो. त्यामुळेआज फक्त रामरक्षेच्या रचनेमागील पार्श्वभूमी आणि तिचे महत्व फक्त मी स...