उगवतीचे रंग बंदिस्त मानव जोपर्यंत प्राथमिक अवस्थेत होता, तोपर्यंत तो निसर्गाच्या जवळ होता. त्याच्यासाठी हे विश्व अफाट, अनादी आणि अनंत होते. पण तो जसजसा प्रगत होऊ लागला, तसतसा निसर्गापासून दूर जाऊ लागला. त्याच्यासाठी मग हे विश्व अनादी आणि अनंत राहिले नाही. ते मर्यादित झाले. किती विरोधाभास आहे बघा ! जेव्हा प्रगती नव्हती, मानव प्राथमिक अवस्थेत होता, तेव्हा हे विश्व विराट होते. पण जसजशी प्रगती होत गेली, निरनिराळे शोध लागत गेले, तसतसे हे विश्व जवळ आले, मर्यादित झाले. मानवाच्या प्रगतीला आकाश खुले झाले. दाहीदिशा मोकळ्या झाल्या. विश्वाला प्रदक्षिणा करायची तर वेळ लागणार. पण आईवडिलांनाच प्रदक्षिणा घातली तर विश्वप्रदक्षिणेचे पुण्य लाभेल. आईवडील म्हणजे विश्वच ! म्हणून गणपतीने विश्वाऐवजी आईवडिलांना प्रदक्षिणा घालून आपल्या बुद्धिमत्तेचा आणि मातापित्यांवरील आपल्या श्रद्धेचा प्रत्यय आणून दिला. मानवाने मात्र आपल्या बुद्धिचातुर्याने आणि वैज्ञानिक प्रगतीच्या जोरावर जणू या विश्वालाही प्रदक्षिणा घातली. पण या गोष्टीला खरोखरंच प्रगती म्हणावं तर अनेक गोष्टींचा संकोच झालेला दिसतो. वैज्ञा...