मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग किस्से पुणेकरांचे...

उगवतीचे रंग

किस्से पुणेकरांचे...

आम्ही चाळीसगावासारख्या छोट्याशा गावात  राहणारी माणसं . पण वेळोवेळी काही कारणाने पुण्यात जावे लागते. तेव्हा कधी कधी अस्सल पुणेकरांशी गाठ पडते. आम्ही गावाकडचे लोक म्हणजे तसे पुणेकरांच्या दृष्टीने थोडे असंस्कृत,  ग्राम्य, गावंढळ वगैरे वगैरे.  मराठीत ( ? )  सांगायचं तर मॅनर्स नसलेले.  आम्ही  थोडंफार इंग्रजी शिकलेलो. आणि मॅनर्स म्हणाल तर हाय, हॅलो, थँक यु , धन्यवाद इ सारखे शब्द फक्त आम्हाला येतात. पण पुणेकर म्हणजे काय समजलात राजेहो ..! महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेलं शहर. शिक्षणाचं माहेरघर. इ इ  ऐकून असल्याने पुण्यात गेलो म्हणजे छाती दडपायला होते. आपल्याला जमेल का त्या लोकांशी वागणं, बोलणं असे बालिश ( त्यांच्या दृष्टीने ) प्रश्न आम्हाला पडतात.

आमच्या गावाकडचं स्वागत कसं अघळपघळ असतं . अगदी मनमोकळं. कोणी पाहुणा आला की त्याला प्रथम घरात या म्हणून विनवले जाणार. तो आला की पाण्याचा तांब्या पेला हजर असतो. चहा तर किमान होणारच. या सगळ्या प्राथमिक स्वागताच्या गोष्टी झाल्यावर मग पाहुण्याला किंवा यजमानाला जसा वेळ असेल आणि जशी त्या यजमानांची परिस्थिती असेल, तसे त्याच्या दिमतीला आम्ही असतो. मग जेवण, चहा, नाश्ता हे ओघानेच आले. कधी कधी वेळ असला, तर त्या पाहुण्यांना जवळपासची ठिकाणे दाखवण्यासाठी स्वतःच उत्साहाने घेऊन जात असतो. आणि मग काय, पाहुणा खुश झाला की आम्ही खुश ! दुसरे काय हवे असते !

पण पुण्यात तर काही ठिकाणी पाणी सुद्धा मागून घ्यावे लागले. अर्थात मागितल्यावर ते पटकन दिले हे त्यांचे केवढे मोठेपण ! पुण्यात कोणाकडे गेलो, तर घराची बेल वाजवू का नको इथपासून विचार करायची सुरुवात होते. बरं, ती बेल मध्ये ऐकू गेली की नाही हे बऱ्याच वेळेला समजत नाही. दुसऱ्यांदा वाजवावी, तर अस्सल पुणेरी भाषेत काहीतरी ऐकावे लागायचे ही भीती असते. बऱ्याच ठिकाणी तर कुत्रे नसताना ' कुत्र्यांपासून सावधान ' असा ठळक फलक लावलेला आढळला. मग कुत्र्यांपासून सावधान असे लिहिलेले ते कुत्रे कोणते असावेत असाही प्रश्न पडला.

आमच्या गावातील एक शिक्षक निवृत्तीनंतर पुण्यात राहायला गेले. त्यांचा मुलगा पुण्यात नोकरीला होता. एका चांगल्या सोसायटीत त्यांच्या मुलाने फ्लॅट घेतलेला होता. तिथे संध्याकाळी सोसायटीतले सगळे ज्येष्ठ जमायचे. गप्पा मारायचे. तर या आमच्या शिक्षक बंधूंची अशाच एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ ( ? ) पुणेकर आजोबांशी ओळख झाली. ते आजोबा त्यांना म्हणाले, ' तुम्ही असं करा, उद्या दुपारी चार वाजता चहाला माझ्याकडे या. म्हणजे गप्पाही होतील. ' आमच्या या मित्राने तात्काळ हो म्हणून त्यांचे आमंत्रण स्वीकारले. पण त्या आजोबांनी  चार वाजता बोलावले म्हणजे अगदी चारलाच गेले पाहिजे असे थोडेच आहे, असे आमच्या त्या मित्राला वाटले. तो आपला मस्तपैकी साडेचार पाचला त्यांच्याकडे गेला.

त्यांच्याकडे गेल्याबरोबर, ' तुम्ही उशिरा आला . तुमची चारला वाट पाहिली . चहा झाला आमचा. ' असे उद्गार आमच्या त्या मित्राला ऐकायला मिळाले. आता आमचा मित्र बिचारा काय बोलणार ? तो बिचारा ठीक आहे असे म्हणून आल्या पावली परत फिरला. सगळे असे असतात असं नाही. पण असे अनुभव सुद्धा येतात.

बऱ्याच वेळेला मी माझी गाडी घेऊन पुण्याला जातो. आता मुलगा राहतो त्या सोसायटीत गाडीसाठी स्वतंत्र पार्किंग नाही. त्यातून आम्ही बाहेरून आलेलो. त्यामुळे आम्हाला गाडी बाहेरच लावावी लागणार हे उघड होतं . त्याची तयारी आम्ही ठेवलीच होती. पण ही गोष्ट सुद्धा वाटली तेवढी सोपी नव्हती असं आमच्या लक्षात आलं. आमची गाडी येताच, वरच्या दोनचार गॅलरीतले सभ्य स्त्रीपुरुष बाहेरच लक्ष ठेवून होते. मला वाटलं बऱ्याच पौराणिक सीरिअल्स मध्ये एखाद्या शुभ प्रसंगी आकाशातून देवदेवता पुष्पवृष्टी करताना जसे उभे असतात, तशी ही मंडळी उभी राहिली असावी आणि आपल्या कॉलनीत कोण नवीन व्यक्ती आली, तिचं स्वागत करूया असा त्यांचा शुभ विचार असेल. पण त्या मंडळींनी माझा अंदाज सपशेल चुकीचा ठरवला.  आम्ही आमची गाडी कुठे लावतो याकडे ती सज्जन मंडळी तत्परतेने लक्ष ठेवून होती. मग पुढे गाडी लावावी तर वरून सूचना येई, इथे लावू नका. तिथे आमची गाडी असते. मागे लावावी तर समोरचा फ्लॅट मालक इथे लावू नका. आमच्या गाडीला टर्न बसत नाही यासारख्या अनेक सूचना आणि दिव्यातून पार पडत कशी तरी गाडी एका ठिकाणी लावली. आणि हुश्श केलं. मला वाटलं की आता तरी त्यांच्यापैकी एखादा थँक यु म्हणेल, किंवा ठीक आहे म्हणेल. पण कसले काय ? एकाच्याही चेहेऱ्यावर एखादीही स्मितरेषा नाही. सगळ्यांचे चेहरे जसे काही बऱ्याच दिवसांपासून ' होम क्वारंटाईन ' केले आहे की असं वाटावं असे होते.

लोकांशी भांडायचं कसं हे आम्हाला माहित नाही. नाहीतर या वरच्या प्रसंगात तशी संधी होती. ही रस्त्यावरची जागा म्हणजे काय तुमच्या मालकीची आहे का किंवा अजून चांगल्या शब्दात तुमच्या टिम्ब टिम्ब ची आहे का वगैरे अशी वाक्ये उगाचच आमच्या मनात येऊन गेली. पण जाऊ द्या. त्या वैभव मांगलेच्या चित्रपटातले ' नया है वह ' हे वाक्य आठवले. म्हटले नको. आपणच ते ' नया है वह ' असे आहोत.

पण ते जाऊ द्या. पुण्याच्याच एका सोसायटीत घडलेला एक किस्सा तुम्हाला सांगतो. माझी मुलगी राहते त्या परिसरात एकाच बिल्डरने बांधलेल्या तीनचार इमारती आहेत. त्यांना सोयीसाठी ए बी सी डी अशी नावे दिली आहेत. या इमारती शेजारी शेजारी असल्या तरी प्रत्येक इमारतीचे गेट स्वतंत्र, स्वतंत्र वॉचमन इ आहे. या सोसायटीतले लोक शक्यतो तिकडे जात नाहीत किंवा तिकडचे इकडे येत नाहीत. ए बिल्डिंगमधल्या लोकांना बी बिल्डिंगमधले लोक शहाणे आहेत असे वाटते, तर बी वाल्यांना ए बद्दल तसेच वाटत असते. कोणी काही बोलून दाखवत नाही. पण एक प्रकारचे शीतयुद्ध त्यांच्यात सुरु असते.

तर एकदा झालं असं की बी बिल्डिंगमधील एकानं पाळलेला  कुत्रा त्याने खाली फिरवण्यासाठी आणला. त्या दिवशी त्याला काय वाटलं कोणास ठावूक , पण कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा त्याने लावलेला नव्हता. त्यामुळे ते मोकळं फिरत होतं . ती संध्याकाळची वेळ होती. इकडे ए बिल्डिंगमध्ये खाली काही लहान मुले फ़ुटबाँल खेळत होती. काही ज्येष्ठ मंडळी सुद्धा खाली गप्पा मारत बसली होती. कोणी तिथेच फिरत होते. अशा वेळेला त्या मुलांचा बॉल गेटच्या बाहेर गेला. मुलं तो आणण्यासाठी बाहेर धावली. ते पट्टा नसलेलं श्वान देखील मोकळं असल्याने बाहेरच फिरत होतं . त्या मुलांनी तो बॉल आणताच ते कुत्र त्यांच्यामागे ए सोसायटीत आलं. ते कोणाला चावलं वगैरे नाही. पण काही जणांना त्याने जवळ जाऊन हुंगायला सुरुवात केली. ते पाहताच तेथे असलेली लहानथोर मंडळी घाबरली. आणि काही ज्येष्ठ मंडळींना बऱ्याच दिवसांनी काहीतरी भांडणाचा विषय मिळाला.

तिथे चाललेली ती गडबड पाहून त्या कुत्र्याचा मालक लगबगीने आला. आणि तो आल्याबरोबर, ' तुमचं का हे ? ' अशा दोनचार जणांच्या प्रश्नाला तो सामोरा गेला. आता प्रसंग असा बाका होता. आजूबाजूला ए बिल्डिंगमधली चारपाच लोकं आणि हा त्याच्या कुत्र्यासहित त्यांच्या गराड्यात एकटा सापडलेला. पण तो जातीचा पुणेकर होता. अजिबात घाबरला नाही. बिचकला नाही. आता पुढे त्यांच्यात झालेला संवाद त्यांच्याच शब्दात .  ए बिल्डिंगमधल्या लोकांचा उल्लेख फक्त ए म्हणून करतो आणि तो श्वानमालक म्हणजे बी असं आपण म्हणू या -

ए - कुत्रा तुम्ही पाळायचा आणि त्रास आम्हाला ?
बी - अहो, कुणाला चावलाय का तो ?
ए - म्हणजे तुम्ही त्याच्या चावण्याची वाट पाहणार का ? आणि चावला तर तुम्ही काय करणार आहात  ?
बी - अहो, तो कोणालाच कधी चावत नाही. नुसता जवळ येतो.
ए - पण, तुम्हाला विचारून चावणार आहे का तो ? नॉन्सेन्स.
बी - अहो, पण मी काय सांगतो ते ऐका. मी त्याला बावीस इंजेक्शन्स देऊन आणली आहेत. त्यामुळे तो चावला तरी कोणाला काही होणार नाही.
ए - तुम्ही बावीस इंजेक्शन्स द्या की चोवीस, त्याच्याशी आम्हाला काय करायचे ? तो इथे यायला नको आहे.
बी - मला एवढं बोलताय पण समजा , एखादा रस्त्यावरचा कुत्रा तुम्हाला चावला तर तुम्ही काय कराल ?
ए - ते आमचे आम्ही पाहून घेऊ तेव्हा. तुमचा कुत्रा इथे यायला नको आहे. आणि तो तुमचा वॉचमन काय करतो ?    झोपा काढतो का ? त्याला विचारा . कुत्रा इथे आलाच कसा ?
बी - अहो, सारखं कुत्रा कुत्रा काय म्हणताय ? ते फक्त सहा महिन्यांचं पिल्लू आहे. त्याला घाबरायचं कारण नाही.
ए - घाबरायचं कारण नाही ? काय बोलता ? पिल्लू वाटतं का ते ? उद्या तुम्ही सिंह पाळाल आणि म्हणाल घाबरू नका. काही अर्थ आहे का याला ?

अशा तऱ्हेचे खटकेबाज, गरमागरम संवाद सुरु होते. त्याचा शेवट एका ज्येष्ठाच्या मध्यस्थीने झाला. दोन्हीकडच्या वॉचमनला सूचना दिल्या गेल्या. कुत्र्याच्या गळ्यात पट्टा अडकवल्याशिवाय त्याला खाली आणू नये आणि तो इकडे येता कामा नये अशा प्रकारच्या महत्वपूर्ण अटी त्या तहात मान्य केल्यावर त्या श्वानमालकाची एकदाची सुटका झाली. हे सगळं चालू असताना ते श्वान आपल्या बिल्डिंगमध्ये आणि खेळणारी मुले आपल्या खेळण्यासाठी निघून गेली होती. त्यांना या सगळ्याशी काही घेणंदेणं नव्हतं.

( पुण्यात माझे अनेक मित्र आहेत आणि खूप चांगली मंडळीही आहेत. तेव्हा त्या सगळ्यांनी आपला समावेश यात नाही याची खात्री बाळगावी )

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
     ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...