उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ४७ सहजपाठ : रवींद्रनाथांची अनमोल देणगी (२) बंगालमधील लोक खरंच भाग्यवान ! रवींद्रनाथांचे सहजपाठ जणू त्यांच्या रक्तातच भिनले होते. अगदी शिशुवर्गात जाणाऱ्या लहान मुलांपासून ते वयोवृद्ध असणाऱ्या बंगाली माणसांपर्यंत त्यांच्या सहजपाठातील कविता सर्वांना पाठ होत्या. ही रवींद्रनाथांनी घडवून आणलेली जादू होती. खरंतर शिक्षण क्षेत्रातील ही एक क्रांती होती असे म्हटलेले जास्त योग्य ठरेल. पु ल देशपांडे यांचा मुक्काम शांतीनिकेतनला असताना त्यांच्यासोबत सलील घोष नामक तेथीलच एक तरुण होता. त्याच्याबरोबर एकता ते शिशुभवनाच्या वस्तीगृहात गेले. त्या प्रसंगाचे मोठे सुंदर वर्णन त्यांनी आपल्या ' वंगचित्रे ' या पुस्तकात केले आहे. ते वर्णन अत्यंत हृद्य आहे. तेथे गेल्यावर सलीलने त्यांची तेथे शिकवणाऱ्या बाईंशी ओळख करून दिली. त्या प्रसंगाचे मोठे मनोरंजक वर्णन पुलं करतात. ते त्यांच्याच शब्दात- " बाईच्या भोवती पाच पंचवीस पोरींचा किलबिलाट चालला होता. आम्हाला पाहिल्यावर उगीचच त्या पोरी लाजल्या काय, गंभीर काय झाल्या, खुदकन हसल्या काय. काही बोलायची सोय ना...