उगवतीचे रंग जलसंजीवनी देणारा देवदूत १९७१ चे वर्ष. पाकिस्तानी सैनिक पूर्व पाकिस्तानातील नागरिकांवर भयंकर अत्याचार करीत होते. लाखो लोकांची सामुहिक हत्या करण्यात आली होती. लाखो स्त्रियांवर बलात्कार झाले होते. लोकांमध्ये प्रचंड भीती होती. त्यातूनच जवळपास कोट्यवधी लोक भारताच्या आश्रयाला आले होते. भारताने सीमावर्ती भागात या लोकांना आश्रय देण्यासाठी छावण्या उभारल्या होत्या. कडाक्याची थंडी पडलेली. काही लोक तंबूत तर काही उघड्यावर राहत होते. आपला प्रदेश, घरदार सोडून आलेल्या या लोकांची मानसिक अवस्था फार बिकट होती. भारतावरही प्रचंड आर्थिक ताण पडत होता पण मानवतेच्या भावनेतून या सर्व लोकांना भारताने आश्रय दिला होता. पण तरीसुद्धा एवढ्या लाखो लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतेच्या सुविधा देणे शक्य नव्हते. त्यातून त्या काळात जगातील अनेक देशात कॉलरा, अतिसाराच्या साथीने थैमान घातले होते. अशा वेळी व्हायचे तेच झाले. हजारो लोकांना कॉलरा आणि अतिसाराची लागण झाली. एवढ्या लोकांना वैद्यकीय उपचार किंवा सुविधा पुरवणे आवाक्याबाहेरची गोष्ट होती. त्यातच ढाक्यातील कॉलरा संशोधन केंद्र निधीअभावी आणि ...