मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग... उन्नयन : विचारांचे, भावनांचे

उगवतीचे रंग...

उन्नयन : विचारांचे, भावनांचे

फार पूर्वी चीनमध्ये कन्फ्यूशियस नावाचा एक तत्वज्ञ होऊन गेला. चीनमधील तत्वज्ञानावर त्याच्या शिकवणुकीचा प्रभाव आहे. त्याची अनेक वचने प्रसिद्ध आहेत. ती मला तर सुभाषितांसारखीच वाटली. आणि आजच्या परिस्थितीतही ही कालबाह्य झालेली नाहीत. आपल्या एका वचनात तो म्हणतो, " तुम्हाला जर असे वाटले की तुम्हाला जे ध्येय साध्य करायचे ते खूप कठीण आहे, तर ते ध्येय बदलू नका. तर ते साध्य करण्याचे मार्ग किंवा पद्धत बदला. "

इतर अनेक गुरूंसारखा त्याचाही मोठा शिष्यपरिवार होता. एकदा त्याला त्याच्या एका शिष्याने प्रश्न विचारला. ' कनिष्ठ दर्जाचा माणूस त्याच्या शत्रूला किंवा विरोध करणाऱ्याला कसे मारतो ? ' कन्फ्यूशियस तत्काळ उत्तरला, ' दगडाने. ' शिष्याने पुढे विचारले की मग उच्च दर्जाचा माणूस त्याच्या विरोधकाला कसे मारतो ? यावर कन्फ्यूशियस उद्गारला, ' लेखणीने. ' तसं पाहायला गेलं तर ही उत्तरे वरवर फार साधी वाटतात. पण त्यात खोल अर्थ दडलेला आहे. कनिष्ठ माणूस म्हणजे ज्याच्या विचार, भावनांचा विकास झालेला नाही असा माणूस. तो रानटी माणसासारखा प्राथमिक अवस्थेतच असतो. आपली नैसर्गिक प्रतिक्रिया तो दगड मारून व्यक्त करतो. अशी माणसे त्या काळातच होती का ? नाही. ती आजही आहेत. ती सर्व काळात असतात. फक्त दगडाच्या ऐवजी इतर शस्त्रे त्यांच्या हाती आली आहेत. तो लगेच मारण्याची भाषा करतो. सूड घेण्याची भाषा करतो. हातघाईवर येतो. हे व्यक्तीलाही लागू होते आणि राष्ट्रालाही.

या गोष्टीतला ' उच्च दर्जाचा ' माणूस कोणाला म्हणता येईल ?  तर जो शिकलेला आहे, ज्याच्यावर चांगले संस्कार झाले आहेत असा माणूस. केवळ पुस्तकी शिक्षण घेतलेला किंवा आपल्या नावामागे पदव्या लावणारी व्यक्ती येथे अपेक्षित नाही. तर अशी व्यक्ती जी आपल्या विरोधकांचा मुकाबला विचाराने करते. त्या व्यक्तीच्या लेखणीत असे सामर्थ्य असते. आपल्या विचारांच्या साहाय्याने समोरच्या व्यक्तीत बदल घडवून आणण्याची क्षमता अशा व्यक्तींमध्ये असते. स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, सावरकर, वि वा शिरवाडकर, साने गुरुजी इ च्या साहित्यात अशी ताकद आहे. या माणसांनी आपल्या विचारांनी समोरच्या व्यक्तींमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. संत साहित्यामध्ये सुद्धा अशी ताकद आहे. बऱ्याचशा संतांचा समाजाने छळ केला. बऱ्याच समाजसुधारकांचा समाजाने छळ केला. पण या सगळ्यांनी हातात दगड न उचलता, शापवाणी न उच्चारता आपल्या अमृतवाणीने लोकांचे प्रबोधनाच केले.

ही सगळी थोर माणसांची उदाहरणे आहेत. पण आपल्यातही म्हणजे सामान्यातही अशा असामान्य व्यक्ती असतातच. त्यांच्या विचारांचा, भावनांचा सुयोग्य विकास झालेला असतो. आपण ज्या वातावरणात वाढतो, शिक्षण घेतो, आपल्याला अनुभव येतात, तसतशी आपल्या विचारांची धारणा होत जाते. पण चांगले विचार असणाऱ्या लोकांच्या नेहमी संगतीत राहिल्याने, चांगले साहित्य वाचल्याने आपल्याही विचारांचे, भावनांचे उन्नयन व्हायला मदत होते. नाहीतरी इंग्रजीत म्हण आहेच ना, ' Man is known by the company he keeps .'

 नुकतीच एक गोष्ट वाचनात आली . तुम्हीही कदाचित वाचली असेल. ती थोडक्यात अशी. एक नवीन लग्न झालेले जोडपे हनिमूनसाठी जात असते. उंच डोंगररांगातून त्यांची बस जात असताना मध्येच त्यांना निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी खाली उतरण्याची लहर येते. ते बस थांबवतात आणि उतरून जातात. बस पुढे निघून जाते. काही वेळ जातो न जातो तोच त्यांना कळते की ज्या बसने ते जात होते , त्या बसवर दरड कोसळली आहे. आणि गाडीतील काही प्रवासी ठार तर काही जखमी झाले आहेत.

त्या स्त्रीचा नवरा म्हणतो, ' बघ, बरं  झालं आपण उतरलो. नाहीतर त्या प्रवांशांबरोबर आपलाही आज शेवट झाला असता. ' हे ऐकल्यावर ती नवपरिणिता पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणते, ' अहो, आपण बस थांबवली आणि त्यामुळे पुढे बस जाण्याची आणि दरड कोसळण्याची वेळ एक झाली. आपण ती बस थांबवली नसती, तर दरड पडण्याआधी कदाचित ती बस पुढे निघून गेली असती. आणि सगळ्यांचे प्राण वाचले असते. ' आज समाजाला गरज आहे ती अशा विचार आणि भावनांचे उन्नयन झालेल्या व्यक्तींची. खरं तर शिक्षणाचा अंतिम हेतू तोच आहे आणि असावा.

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
       ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...