मुख्य सामग्रीवर वगळा

तुम्ही युनिक आहात ..

उगवतीचे रंग

तुम्ही युनिक आहात ..

मागे एका शाळेत गेलो होतो. ती शाळा खूप प्रसिद्ध म्हणून पाहायला. त्या शाळेच्या ऑफिसमध्ये एक वाक्य वाचायला मिळालं. ' एव्हरी चाईल्ड इज  युनिक. ' आणि अगदी खरं आहे. प्रत्येक मूल दुसऱ्या मुलापासून वेगळं आहे. बुद्धीनं, रूपानं , विचारानं, भावनेनं. प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट करण्याची क्षमता वेगवेगळी. जे एकाला खूप चांगलं जमतं , तसं दुसऱ्याला येईलच असे नाही सांगता येत. आपण पालक मात्र ही गोष्ट समजूनच घ्यायला तयार नसतो. एखादा मुलगा अभ्यासात हुशार असला तर आपण आपल्या मुलाला त्याचे उदाहरण देतो. तो अमुक अमुक बघ. कसा हुशार आहे. गणितात किती गुण मिळाले त्याला ! नाहीतर तू .. असे म्हणून आपण त्याला हिणवतो. आणि त्याचं फुलू पाहणारं व्यक्तिमत्व कोमेजण्यासाठी हातभार लावतो. अरे, निसर्गातही बघा ना. प्रत्येक फुल वेगवेगळं आहे. गुलाब फुलांचा राजा झाला म्हणून काय इतर फुलांचं सौंदर्य, सुगंध कमी आहे का ? प्रत्येक फुल आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. सगळेच गुलाब झाले तर कसे चालेल ? फुलांच्या हारामध्ये जेव्हा वेगवेगळ्या रंगांची फुलं असतात, तेव्हा तो हार शोभून दिसतो.

पण आज मला लहान मुलांबद्दल आणि त्यांच्या शिक्षणाबद्दल नाही बोलायचं. पण त्यानिमित्ताने एक विचार मात्र मनात आला. प्रत्येक लहान मूल युनिक असतं तसं आपण मोठी माणसं पण असतो का ? नक्कीच असतो. पण हे आपण समजून नाही घेत. कदाचित समजतं पण उमजत नाही. कळतं पण वळत नाही. अशी आपली अवस्था असते. आणि बऱ्याच वेळा हेच आपल्या दुःखाचं मूळ असतं . मी काय करतो, तर माझी तुलना सतत दुसऱ्याशी करत असतो. एखादा माणूस तब्येतीने चांगला दिसला, दिसायला त्याचे व्यक्तिमत्व छाप पडणारे असले की मी नकळत माझी तुलना त्याच्याशी करतो आणि दुखी होतो. मला वाटतं मी एवढा बारीक आणि अशक्त का ? जे माझ्या बाबतीत तेच एखाद्या लठ्ठ माणसाला सुडौल असणाऱ्या माणसाबद्दल वाटू शकेल. त्या लठ्ठ माणसाला वाटते की मी का नाही असा सडपातळ ? लोक हसतात माझ्याकडे पाहून. एखाद्या बुटक्या माणसाला उंच माणसाबद्दल हेवा वाटू शकतो. एखाद्या आखूड केस असणाऱ्या तरुणीला लांब आणि दाट केस असलेल्या स्त्रीबद्दल असूया वाटू शकते.

अशा अनेक गोष्टींमुळे आपण स्वतःला दु:खी करून घेतो. इथे आपले चुकते ते हे की आपण स्वतःला आहे तसे स्वीकारायला तयार नसतो. पण निसर्ग तुमच्यात जेव्हा तुम्हाला वाटणारी एखादी उणीव ठेवतो, तेव्हा तुम्हाला तो अशी काही गोष्ट देऊन ठेवतो, की जी दुसऱ्याजवळ नसते. एखाद्या धनिकाला सगळ्या गोष्टी उपलब्ध असून शांत झोप लागत नाही. तेच झोपेचे वरदान देव मात्र एखाद्या सर्वसामान्य माणसाला सहज देऊन ठेवतो. तो श्रीमंत माणूस सगळे विकत घेऊ शकतो. पण झोप नाही विकत घेऊ शकत. मनःशांती नाही मिळत पैशाच्या जोरावर. अशा खूप गोष्टी असतात आपल्याजवळ. या अर्थाने आपण गिफ्टेड असतो. पण आपण नेमके आपल्याजवळ असलेल्या गोष्टींचा विचार न करता आपल्याजवळ नसलेल्या गोष्टीचा विचार करतो.

या अर्थाने खरं तर प्रत्येक व्यक्ती युनिक आहे. वेगळी आहे. मी मुद्दामच या लेखाचं नाव तुम्ही युनिक आहात असं दिलंय . खरं म्हणजे बरेचदा मी इंग्रजी शब्द वापरायचे टाळतो. पण काही वेळा आपल्याला अपेक्षित असणारा अर्थ एखादा शब्द चटकन स्पष्ट करत असेल तेव्हा मी तो बिनदिक्कतपणे वापरतो. इंग्रजीतला युनिक हा शब्दही असाच. युनिक म्हणजे एकमेवाद्वितीय. इतरांपासून एकदम वेगळा. आपण सगळे या अर्थाने युनिक असतो. इतरांपासून वेगळे असतो. मला गाणी आवडतात, प्रवास आवडतो, वाचायला आवडते, लिहायला आवडते. दुसरा माझा एक मित्र उत्तम चित्रं काढतो आणि लिहितोही. तो फिरत मात्र फारसा नाही. कोणी उत्तम गातो. कोणाला उत्तम स्वयंपाक करता येतो. कोणीतरी उत्तम खेळाडू आहे. किती हे वेगळेपण ! किती या प्रत्येकाच्या तऱ्हा ! म्हणून तर प्रत्येक जण युनिक. हे जेव्हा आम्ही समजून घेऊ ना, तेव्हा आम्ही स्वतःवर प्रेम करायला लागू.
आणि जो स्वतःवर प्रेम करू शकतो, तोच इतरांवरही प्रेम करू शकतो. पण आपल्याकडे ही गोष्ट लहानपणापासून सांगितलीच जात नाही. उलट सांगितलं जातं . की स्वतःचा विचार करू नका. स्वतःवर प्रेम करू नका. दुसऱ्यावर प्रेम करा. पण स्वतःवर प्रेम नाही करता आलं, स्वतःला आहे तसं नाही स्वीकारता आलं , तर तुम्ही दुसऱ्याला काय स्वीकारणार आणि मग प्रेम करणं तर लांबची गोष्ट !

तेव्हा आजपासून स्वतःला सांगू या की मी इतरांपेक्षा अगदी वेगळा आहे, युनिक आहे आणि त्यातच माझे सौंदर्य आहे, सामर्थ्य आहे. इतरांना दिल्या त्यापेक्षा परमेश्वराने मला काही गोष्टी नक्कीच वेगळ्या दिल्या आहेत. त्यांचा मी विचार करीन . त्यांचा वापर करून माझे जीवन आनंदी बनवेन. आणि त्याच बरोबर इतरांचेही. आणि मग बघा. तुमच्याही ओठांवर आनंदाचे गाणे आल्याशिवाय राहणार नाही.

लिये सपने निगाहोमें, चला हू 'तेरी राहोंमे
जिंदगी, आ रहा हू मै ....

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
        ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...