उगवतीचे रंग विश्वास देशपांडे, चाळीसगाव भारतरत्नावली द्रष्टा उद्योगपती : जे आर डी टाटा ( भाग तेरा ) रोमारोमात देशभक्ती... जे आर डी म्हणजे रोमारोमात देशभक्ती भिनलेला उद्योगपती. त्यांनी तयार केलेल्या मुंबई योजना किंवा बॉंबे प्लॅन बद्दल आपण भाग अकरा मध्ये डॉ जॉन मथाई यांची माहिती घेताना पाहिले आहे. देशातील आघाडीच्या उद्योगपतींना घेऊन तयार केलेल्या या योजनेत स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या आशाआकांक्षाचा विचार करून तरतुदी केलेल्या होत्या. पण स्वातंत्र्यानंतर जेव्हा देशासाठी पंचवार्षिक योजनांचे नियोजन करण्यात आले, तेव्हा जे आर डींच्या सूचना गांभीर्याने घेतल्या गेल्या नाहीत. त्यानंतरही जे आर डींनी आत्यंतिक तळमळीने वेळोवेळी अनेक सूचना सरकारला केल्या. त्यातील बऱ्याचशा राज्यकर्त्यांना सोयीच्या नव्हत्या म्हणून त्या अमलात येऊ शकल्या नाहीत हे उघड आहे. जे आर डी आणि तत्कालीन पंतप्रधान पं नेहरू यांची खास मैत्री होती. या दोघांचेही वैशिष्ट्य म्हणजे दोघांनी अत्याधुनिक शिक्षण घेतलेले. दोघेही युरोपात शिकलेले होते. दोघांचीही विचारसरणी त्यामुळे आधुनिक होती. जे आर डींचे बालपण, शिक्षण जर...