मुख्य सामग्रीवर वगळा

रंग सोहळा ...

उगवतीचे रंग

रंग सोहळा ...

 परवाच होळी झाली. होळी म्हणजे रंगोत्सव. होळीला आपण तनमनाने रंगात रंगून जातो. होळी वर्षातून एकदाच येते. आणि आपल्या रंगात आपल्याला रंगवून जाते. तसं पाहिलं तर आपल्याकडचा प्रत्येक सण हा कुठल्या ना कुठल्या रंगात न्हायलेला असतो. म्हणून तर सण उत्सव आपल्या जीवनात रंग भरतात . रंगच नसते तर आपले जीवन किती नीरस झाले याची कल्पनाच करवत नाही.

पण खरा रंगारी म्हणजे निसर्ग. तो तीनही ऋतूत आपले वेगवेगळे रंग भरत असतो. आणि सगळे रंग विलोभनीय असतात. पावसाळ्यात तर आभाळ खाली उतरते. आणि धरतीला हिरवं स्वप्न दाखवते. मग तीही त्या स्वप्नात रंगून जाते. समृद्धीची हिरवी शाल अंगावर ओढून घेते आणि नवनव्या रूपात नटते. जणू नववधूचा शृंगारच केलेला असतो तिनं . त्यातूनच हिवाळ्यात येणारी विविधरंगी  फळं, फुलं बहरून येतात. नुसते भाजी मंडईत गेलो तरी निसर्गाचे हे विविध रंग आपल्याला विविध भाज्या, फळं आणि फुलांच्या रूपात दृष्टीस पडतात.

आणि आता तर उन्हाळ्याला नुकतीच कुठे सुरुवात झाली  आहे. अशा वेळी निसर्गातही एक वेगळा रंग सोहळा सुरु होतो. त्याचं नाव वसंत. हा वसंतोत्सव मनमोहक असतो. झाडावरची जुनी पानं गळून पडलेली असतात. जणू आम्ही आता आमच्या जीवनातील शेवटचा उत्सव साजरा करतो आहोत असंच त्यांच्या मनात असावं. म्हणून सन्याशाचं पीत वस्त्र ते धारण करतात. पिवळ्या रंगात रंगतात. आणि आपल्या शेवटच्या निजधामी निघून जातात. पण त्यांचं जाणंही किती सुंदर ..! हळूच अलग होतात आपल्या फांदीपासून, आपल्या कुटुंबापासून. आणि मग वाऱ्याच्या लहरीवर तरंगत हळूहळू खाली येतात. आणि इतके दिवस उंचावर असलेले जीव धरित्रीवर विसावतात. त्यांची जागा मग नवी पाती घेतात. तीही किती सुंदर अवतीर्ण होतात. येताना सुंदर कोमल गुलाबी रंग लेऊन येतात. आणि मग हळूहळू मनमोहक अशा हिरव्या रंगात परावर्तीत होतात. जणू येतानाच सोबत हिरव्या रंगाचे स्वप्न घेऊन येतात. आणि मग सगळे झाडच हिरव्या रंगात रंगून जातं . बहुतेक निसर्ग हिरव्या रंगाचं स्वप्न पेरत असावा. धरित्रीच्या कुशीत. आणि मग ते स्वप्न सत्य होऊन धरित्रीच्या कुशीतून हिरव्या रंगात उमलतं. ते सोबत सौख्य, समृद्धी आणि आनंद घेऊन येतं .

वाहत्या पाण्यातही कधी कधी आकाश उतरतं . आणि जादू केल्यासारखं ते पाणी नीलवर्ण होऊन जातं . रात्रीच्या वेळी ते जल रात्रीचा श्यामरंग धारण करतं आणि एक गूढ काळिमा त्या जलावर पसरतो. पहाट झाली की तो गूढ काळिमा अदृश्य होऊन प्रकाशाच्या सोनेरी रंगात परावर्तित होतो . कधी कधी दाट धुकं पसरलेलं असतं . पहाटेच्या वेळी. अशा वेळी निसर्ग बघावा. सगळा निसर्ग जणू स्तब्ध झालेला भासतो. झाडं अंगावर धुक्याची शाल ओढून बसलेली असतात. अशा वेळी त्यांच्याकडे बघताना मला एखाद्या ध्यानस्थ बसलेल्या साधूची आठवण येते. जोपर्यंत सूर्यदेवाची किरणं त्यांना जागी करत नाहीत, तोपर्यंत त्यांचं ते ध्यान चालूच असतं .

पूर्व क्षितिजावर अरुणोदय झाला की दिशा हळूहळू उजळू लागतात. झोपलेल्या सृष्टीला जाग येते. ' अंधाराचे जाळे फिटून आकाश मोकळे होते. आणि सगळीकडे प्रकाश भरून राहतो. पूर्वेच्या पटलावर तर अप्रतिम रंगोत्सव सुरु असतो. विविध रंगांनी ते नभोमंडल रंगलेलं असतं . रंग उगवतीचे असो की मावळतीचे, ते मनोहरच असतात. फक्त आपल्या दृष्टीवर ते अवलंबून असतात. आपण पाण्याच्या बाबतीत नेहमी म्हणतो, ' पानी तेरा रंग कैसा, जिसमे मिला दो उस जैसा.' तसेच आपल्या मनाचेही असते असे मला वाटते. आपल्या मनाला कोणताही रंग नाही. ते निर्विकार असते. आपण आपल्या वेगवेगळ्या भावभावनांचे रंग त्यात मिसळतो. जशी भावना , तसा मनाचा रंग. कधी ' हास्य ' रंग तर कधी ' राग ' रंग ...! याप्रमाचे ते भय, शोक, चिंता या रंगातही रंगते.पण ते रंग कधी कधी नकोसे वाटतात. मनाला अस्वस्थ करतात. नकोसे वाटतात.  मग सगळ्यात कोणता रंग चांगला ..? तो म्हणजे ' प्रेम ' रंग.

पतझर सावन बसंत बहार , एक बरस  के मौसम चार
पाचवा मौसम प्यार का, इंतजार का.

हा प्रेम रंग एकदा का
मनात मिसळला की मग राग, शोक, चिंता, भय इ ना थाराच राहत नाही. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, ' मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण.' आणि मनाला जर त्या ' रामरंगात ' किंवा ' श्यामरंगात ' रंगायची सवय झाली तर मग सगळेच प्रसन्न होऊन जाते. आणि ' आनंदाचे डोही आनंद तरंग ' उठतात.

( ' उगवतीचे रंग ' वर प्रेम करणाऱ्या माझ्या रसिक वाचक मित्रांनो , परवा माझ्या ' आकाशझुला ' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा असल्याने काही दिवस तुमच्या भेटीला येणं शक्य होणार नाही. पण तुमचं प्रेम असंच  राहू द्या. पुन्हा भेटूच... )

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
      ९४०३७४९९३२ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...