मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग रामरक्षा : एक अद्वितीय स्तोत्र

उगवतीचे रंग

रामरक्षा : एक अद्वितीय स्तोत्र

लहानपणी आई आम्हाला देवासमोर बसून शुभंकरोती, रामरक्षा, मनाचे श्लोक आदी म्हणायला लावत असे. आता तर बदलत्या काळानुसार हे सगळे मागे पडले आहे. पण मंत्र आणि स्तोत्र पठणाचे महत्व तसेच अबाधित आहे. रामरक्षा बुधकौशिक ऋषींनी लिहिली त्याला हजारो वर्षे होऊन गेली, पण आजही पारंपरिक स्तोत्रात त्याचे स्थान फार वरचे आहे. हे स्तोत्र घरातील आबालवृद्धांनी म्हणायचे स्तोत्र आहे. ते मंत्र आहे. कवच आहे. रक्षा म्हणजे रक्षण करणारे आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवांसाठी त्याचे विशिष्ट श्लोक आहेत. त्या त्या श्लोकांसाठी रामाच्या वेगवेगळ्या नावाचा उल्लेख केला आहे. उदा ' शिरो मे  राघव:  पातु  भालं दशरथात्मजा " म्हणजे रघुकुल भूषण ' राघव ' म्हणजेच राम माझ्या मस्तकाचे रक्षण करो. दशरतपुत्र राम माझ्या भालाचं  म्हणजे कपाळाचे रक्षण करो. त्या त्या शब्दात विशिष्ट अर्थही दडलेला आहे. पण आज आपण तेवढ्या खोलात जाणार नाही आहोत. तसेही रामरक्षेचा अर्थ आपल्याला बऱ्याच पुस्तकातून वाचायला मिळतो. त्यामुळेआज फक्त रामरक्षेच्या रचनेमागील पार्श्वभूमी आणि तिचे महत्व फक्त मी सांगणार आहे.

वाल्मिक ऋषींनी रामाचे चरित्र लिहिले होते. ते शंभर कोटी श्लोकांचे होते. ' चरितं रघूनाथस्य शतकोटी प्रविस्तरम ' मर्यादापुरुषोत्तम रामाचे चरित्र आणि त्यातही ते वाल्मिकींनी लिहिलेले. त्यामुळे देव, दानव आणि मानव यांच्यात ते मिळवण्यासाठी स्पर्धा सुरु झाली. प्रत्येकाला ते चरित्र आपल्यालाच मिळावे असे वाटत होते. शेवटी ते सगळे एकत्र आले. आणि त्यांनी ते शंभर कोटी श्लोक तिघांत वाटून घेण्याचे ठरवले. पण समान आणि उचित वाटणी कोण करणार ? यासाठी स्मशानात निवास करणारे आणि वैराग्य असलेले भगवान शंकर त्यांना सुयोग्य वाटले. शंकरांनी त्यांना तशी समान वाटणी करून दिली. शेवटी एका श्लोकातील ३२ अक्षरे उरली. ती सुद्धा प्रत्येकी दहा दहा याप्रमाणे शंकरांनी देव, दानव आणि मानव यांना वाटून दिली . शेवटी दोन अक्षरे उरली. ती म्हणजे ' राम '. ती शंकरांनी स्वतःकडे ठेवून घेतली. म्हणजे जणू शंभर कोटी श्लोकांचे सारच शंकरांनी स्वतःकडे ठेवून घेतले. भगवान शंकरांनी हलाहल प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ काळानीळा पडला. त्याचा प्रचंड दाह होऊ लागला. तो शांत व्हावा म्हणून त्यांनी शिरावर गंगा, मस्तकावर चंद्र आणि गळ्यात नाग धारण केला. पण इतके करूनही ती आग शांत होईना. असे म्हणतात की ' राम ' दोन अक्षरे कंठात धारण केल्याने शंकरांचा हलाहल प्यायल्यामुळे होणारा दाह त्वरित थांबला. यातच ' राम ' नामाचे महत्व आणि रहस्य दडलेले आहे. रामनाम हे विष्णूच्या सहस्त्र नामांची बरोबरी करणारे आहे. ' सहस्त्र नाम तत्तुल्यम रामनाम वरानने '.

बुधकौशिक ऋषींना ही रामनामाची महती भगवान शंकरांकडून जाणून घेण्याची ओढ लागली होती. शिवशंकरांनी त्यांची भक्ती आणि ओढ जाणून त्यांना स्वप्नात रामरक्षा सांगितली. आणि त्यामुळे ' प्रबुद्ध ' झालेल्या बुधकौशिक ऋषींनी ती पहाटे जशीच्या तशी लिहून काढली. त्यामुळे ती आपल्यासारख्या सर्वसामान्यांना उपलब्ध झाली. ती प्रत्यक्ष भगवान शंकरांकडून आल्याने तिचे महत्व जास्त आहे. या रामरक्षेतले एकेक अक्षर त्यात म्हटल्याप्रमाणे ' एकैकमक्षरं पुंसां महापातक नाशनं ' आहे.

कुठल्याही मंत्र किंवा स्तोत्रातील अक्षरांची रचना आपल्या ऋषीमुनींनी विशिष्ट प्रकारे केली आहे. त्या रचनेचा नादशास्त्राशी अत्यंत जवळचा संबंध आहे. विशिष्ट छंदात ते लिहिले गेले आहेत. रामरक्षा अनुष्टुभ छंदात आहे. आपण जेव्हा कुठलेही स्तोत्र किंवा मंत्र त्याच्या लयबद्ध पद्धतीने म्हणतो, तेव्हा अक्षरांचा एक विशिष्ट नाद निर्माण होतो. त्या अक्षरांना केवळ नाद नसतो , तर त्यांच्यामागे विशिष्ट अर्थ असतो. आपल्या कल्याणाचा हेतू असतो. आपण जेव्हा ते स्तोत्र म्हणतो तेव्हा त्याच्या ध्वनीशी संबंधित असणारा मेंदूचा विशिष्ट भाग त्या ध्वनिलहरींनी उत्तेजित होतो. त्यामुळे मेंदूमध्ये आपला उत्साह वाढवणारी रसायने स्त्रवू लागतात. आणि आपल्याला उत्साह वाटतो.

एखाद्या वास्तूत जर सतत भांडणे सुरु असतील, नकारात्मक बोलले जात असेल, अभद्र आणि अर्वाच्य बोलले जात असेल, तर त्या वास्तूत एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अशा ठिकाणी गेल्यावर आपल्या मनावर एक प्रकारचे दडपण आल्यासारखे वाटते. पण तेच ज्या ठिकाणी चांगल्या विचारांचे मंथन होते, मंत्र, स्तोत्र आदींचे पठण होते, चांगली गाणी लावलेली असतात, अशा
ठिकाणी आपल्या मनाला आपोआपच प्रसन्न वाटते. एखाद्या मंदिरात गेल्यावर आपल्याला प्रसन्न का वाटते त्याचे कारण हेच आहे.

रामाच्या नावात ' र ' कार आहे. त्याला मंत्रशास्त्रात ' अग्निबीज ' म्हणतात. त्याच्या उच्चाराने आपल्या शरीरात विद्युतशक्ती जागृत होते. रामरक्षेच्या नियमित पठणाने अनेक गूढ आणि दिव्य अनुभूती येऊ लागतात. त्यासाठी रामरक्षा सिद्ध व्हावी लागते. लहान मुलांची वाणी रामरक्षेच्या नियमित उच्चाराने शुद्ध होते. शिवाय रामरक्षेतील अर्थ लक्षात घेऊन जर ती म्हटली तर जास्त प्रभावी होते. आजच्या काळात आपण अनेक ताणतणावांना सामोरे जात असतो. अशा वेळी रामरक्षेसारखी स्तोत्रे आपल्याला एक मानसिक बल आणि ऊर्जा देतात. आजपर्यंत हजारो, लाखो भाविकांना रामरक्षेने मोठा आधार दिला आहे. संकटकाळी, एकटे असताना किंवा ज्यांना मनावर कुठलीही भीती किंवा दडपण आल्यासारखे वाटत असेल, त्यांनी रामरक्षा नियमितपणे म्हणावी.

आपदामहर्तारं दातारं सर्वसंपदाम !

लोकाभिरामं श्रीरामं  भूयो भूयो नमाम्यहं !!

माझी सर्व संकटे दूर होऊ देत. मला सुखसंपदा लाभू दे. अशा सर्व आपत्तींचा नाश करणाऱ्या श्रीरामाला मी पुन्हा पुन्हा वंदन करतो. जय श्रीराम.

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

        ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...