उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य ( भाग ५ ) जगणे आनंदी करणाऱ्या शैक्षणिक संकल्पना मागील चार भागांमध्ये रवींद्रनाथ टागोरांचे व्यक्तिमत्व कसे घडत गेले हे आपण पाहिले. त्याचप्रमाणे त्यांच्या शिक्षणविषयक संकल्पना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आजच्या या भागात आपण त्यांच्या याच शैक्षणिक संकल्पना जाणून घेण्याचा आणखी प्रयत्न करू या. रामायण, महाभारताच्या काळात आपल्या देशात शिक्षणासाठी तपोवन किंवा आश्रम पद्धती अस्तित्वात होती. गुरु आपल्या शिष्यांना निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण देत असत. प्राचीन काळातील ऋषीमुनी चिंतन, मनन आणि तपसाधनेतून ज्ञान प्राप्त करीत. त्यातून प्राप्त झालेले ज्ञान आपल्या शिष्यांना सहजपणे देता यावे, देशहित आणि समाजहित साधतील असे उत्तम नागरिक त्यातून घडावेत असा त्यांचा उदात्त हेतू होता. हे ऋषीमुनी काही जीवनाला कंटाळून अरण्यात पळून गेलेले नव्हते. त्यांच्यासाठी निसर्गातील पंचमहाभूते म्हणजे खळाळणारे ईश्वरी चैतन्य होते. याच चैतन्याची अनुभूती त्यांना आपल्या शिष्यांना द्यायची होती. केवळ शिक्षणच नव्हे तर एकूणच त्यांचे जीवन जगणे आनंदी करायचे होते. या उदात...