उगवतीचे रंग स्वराज्य - सुराज्य -रामराज्य स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा झाला. प्रजासत्ताक दिनही साजरा झाला. आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी. या पार्श्वभूमीवर जरा मागील काळात एक चक्कर मारून येऊ या. काही दृश्ये मी आपल्याला दाखवणार आहे. आपल्याला ती काल्पनिक वाटतील पण त्यांना घडलेल्या घटनांचा आधार आहे. काही लेखातून, पुस्तकातून माझ्यापर्यंत पोहोचलेली ती समाजमनाची आंदोलने आहेत असे समजायला हरकत नसावी. दृश्य एक स्वातंत्र्यापूर्वीचा काळ सर्वत्र इंग्रजी राजवट. गोऱ्या साहेबांचा प्रभाव, दिमाख आणि तोरा. गावागावातल्या शाळा भरल्या आहेत. भिंतीवर पंचम जॉर्ज आणि महाराणी मेरी यांच्या तसबिरी विराजमान आहेत. धोतर, कोट, टोपी घालून लहान मुले शाळेत बसली आहेत. शाळेची सुरुवात ' भो पंचम जॉर्ज... ' अशा काहीतरी शब्दांनी गोऱ्या साहेबाला वंदन करून होते. सातासमुद्राकडून आलेला गोरा साहेब आमच्या या देशावर राज्य करतो. त्याच्या कृपेनेच सर्व काही होत आहे. शिक्षण, विज्ञान, नवनवीन शोध, संकल्पना त्यांच्यामुळेच आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. अशी शिकत असलेल्या बालगोपाळांची कल्पना. इंग्रजां...