मुख्य सामग्रीवर वगळा

ज्योती कलश छलके ...

उगवतीचे रंग

ज्योती कलश छलके ...

पूर्वी दूरदर्शनवर राष्ट्रीय साक्षरता मिशन या कार्यक्रमाच्या प्रचारार्थ एक गाणं दाखवलं जायचं. मला ते फार आवडायचं. ते गाणं होतं ' पूरब से सूर्य उगा, फैला उजियारा , जागी हर दिशा दिशा , जागा जग सारा. ' त्या गाण्यात सकाळच्या सूर्याचा सोनेरी प्रकाश,छोट्या मुलांचं पाटीवर मुळाक्षरं गिरवणं , त्या वृद्ध आजोबांचा हसतमुख चेहरा, त्यांचं दाढी करताना साबणाचा फेस त्या छोट्या मुलाच्या चेहऱ्याला लावणं, नंतर त्या मुलाच्या चेहऱ्यावरून हात फिरवणं, त्या मुलाचा विलक्षण हास्याने उजळलेला चेहरा, त्याचं निरागस हास्य या गोष्टी मनाला खूपच स्पर्शून जात होत्या. काही काही गोष्टी अशा चिरकाल स्मरणात राहून जातात. तसेच ते ' मिले सूर मेरा तुम्हारा ' हे गाणं . भारतातील विविध भाषा, विविध भागातील प्रादेशिक प्रथितयश कलाकार आणि गायक आणि विविध नयनरम्य दृश्ये यामुळे ते गाणं अमर झालं आहे. भारतातील विविधतेतील एकतेच दर्शन घडवण्यात त्या गाण्याचा दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.

तसेच ज्योती कलश छलके हे गाणं . सूर्य उगवल्यानंतरच्या दृश्याचं मनोरम वर्णन त्या गाण्यात आहे. अशी खूप गाणी आहेत. जी सकाळची वेळ दाखवतात. सूर्य उगवला आहे, आणि त्याबरोबर सारी सृष्टी कशी चैतन्यात न्हाऊन निघाली आहे हे बहुतेक गाण्यातून दाखवले आहे. अशी मन प्रसन्न करणारी भक्तिगीते तर भरपूर आहेत. गणपतीला भूपाळी म्हणताना ' तुझ्या कांतीसम रक्त पताका पूर्वदिशी फडकती, अरुण उगवला, प्रभात झाली , उठ महागणपती. ' किती सुंदर वर्णन हे ..! शब्दातलं सौंदर्य बघा. गणपतीचा वर्ण लाल, आरक्त. तशीच पूर्व दिशा सकाळच्या वेळी लाल, आरक्त झाली आहे. जणू रक्त पताका म्हणजे लाल रंगाच्या पताका पूर्व दिशेला सूर्यदेवाच्या आगमनाने फडकत आहेत. कशासारख्या  तर गणपतीच्या रक्तवर्णासारख्या.

तर दुसऱ्या एका अवीट गोडीच्या भक्तिगीतात श्रीरामाला जागवताना, ' उठी श्रीरामा, पहाट झाली, पूर्वदिशा उजळली, उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माऊली ..' त्याच गाण्यात पुढे ' चराचराला जिंकून घेण्या अरुणप्रभा उगवली.. ' असे शब्द आहेत. खरोखर सूर्योदय झाला की त्याची प्रभा, प्रकाश जणू चराचर जिंकून घेतो. चराचरात चैतन्य आणतो. धरतीवरच निद्रिस्त जीवन जागृत होतं . फुलं उमलतात, पक्षी गाऊ लागतात. देवळातल्या घंटा निनादू लागतात. काही काळापूर्वी सगळीकडे पसरलेलं अंधाराचं साम्राज्य कुठे नाहीस होत ते कळत नाही. ' फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश..' दरीखोऱ्यात मग सगळीकडे प्रकाशच प्रकाश भरून राहतो.

 वसंतराव देशपांडेंनी गायलेलं ' तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज..' हे गाणं मनाला स्पर्शून जातं .  कट्यार काळजात घुसली या नाटकातलं हे पद पुरुषोत्तम दारव्हेकरांनी लिहिलं आणि त्याला संगीतसाज चढवला आहे जितेंद्र अभिषेकी बुवांनी. ललत पंचम रागातील हे गीत कधीही ऐकलं तरी आनंद देणारं . हा तेजोनिधी एकदा आकाशात प्रकटला की अवघे भुवन म्हणजे जग त्याच्या दिव्य स्पर्शाने झगमगून जातं .

आपण भारतीय किती भाग्यवान आहोत, याची तुम्हाला कदाचित कल्पना नसेल. जगातील अनेक देशात फार कमी मिळणारा सूर्यप्रकाश आमच्या देशात जवळपास बारा महिने  मुबलक उपलब्ध आहे. हे आमचे केवढे भाग्य आहे. आणि आता तर उन्हाळा सुरु झाला आहे. आता आमचा देश कोरोनासारख्या संकटाला तोंड देत आहे. ही राष्ट्रीय आपत्ती आहे. जागतिक आपत्ती आहे. पण आम्ही सूर्योपासनेच्या बळावर या संकटाचा यशस्वी मुकाबला करू शकतो. सूर्यनमस्कारासारखा व्यायाम आम्हाला शक्ती देईल. आमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल. कोवळ्या सूर्यप्रकाशात फिरायला जाणे आमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरेल.

 सूर्य हा अनंत काळापासून आपला शक्तीदाता आहे, बुद्धिदाता आहे, आरोग्यदाता आहे. तो आहे तर पृथ्वीवर जीवन आहे. म्हणूनच तो खऱ्या अर्थाने ' मित्र ' आहे. सकाळी उठल्यावर प्रकाशमान, चैतन्यदायी असं काही आपल्याला दिसत असेल, तर ते म्हणजे पूर्वेला उगवलेला सूर्य. केवढ्या तेजानं ती पूर्व दिशा उजळली असते..! अशा वेळी आपणही त्या तेजाचं दर्शन घ्यावं. त्या तेजात न्हाऊन घ्यावं. त्याला थोडी प्रार्थनाही करावी. की बाबा, या तुझ्या विलक्षण तेजातला काही अंश तरी आम्हाला दे. आमचेही अंतर असेच उजळू दे. त्यातील अमंगल, वाईट विचार, निराशा यांचा अंध:कार तुझ्या तेजात नष्ट होऊ दे. आम्हाला आरोग्य प्रदान कर. रोगराई नष्ट होऊ दे. सर्वांचं मंगल कर, सर्वांचं कल्याण कर.

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
       ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...