मुख्य सामग्रीवर वगळा

नित्य नवा दीस जागृतीचा...

उगवतीचे रंग

नित्य नवा दीस जागृतीचा...

भक्ती सोपी नाही. भक्ती ही सुळावरची पोळी आहे, असे तुकाराम महाराज सांगतात. आणि या भक्तीमार्गात दिखावा चालत नाही. ती मनापासून असावी लागते. या अभंगात तुकोबा म्हणतात ' तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दीस जागृतीचा. '

हा तुकोबांचा अभंग आठवण्याचे एक कारण घडले. परवाच्या दिवशी रात्री माझ्या घरासमोर रस्त्यावर कोणीतरी एक वृद्ध माणूस झोपलेला दिसला. तो कुठून आला होता हे माहिती नाही आणि कुठे जाणार होता हेही माहिती नव्हते. पण रात्रीच्या वेळी आपल्या अंगाचे मुटकुळे करून तो झोपला होता. तो भिकारी होता की वारकरी, प्रवास करणारा होता की ज्याला घरातून कोणी काढून दिले असा निराधार होता. काही समजायला मार्ग नव्हता. त्याचे बूट त्याच्याजवळ पडलेले होते. पायात मोजे होते. त्याच्याजवळ एक छोटीशी बॅग होती. त्यामध्ये त्याचे काही कपडे आणि नित्याच्या वस्तू असतील. ती बॅग तो उशाला घेऊन शांत पडला होता. अंगावरती पांढरे धोतर त्याने ओढून घेतले होते. डास चावतात म्हणून असेल बहुधा. जणू धरतीचा बिछाना, आणि आकाशाचे पांघरूण त्याने ओढून घेतले होते.

तो तसाच रात्रभर तिथे पडून होता. येणारे जाणारे पाहत होते आणि पुढे निघून जात होते. माझ्या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या कोणी सुद्धा त्याची चौकशी केली नाही. सकाळी आमच्या सौ लवकर फिरायला जातात. तिने पाहिले आणि मला म्हणाली, ' अहो, गेटला कुलूप लावून घ्या. नाहीतर तो आत यायचा. ' मी म्हटलं नाही येणार. तो यायचा असता तर रात्रीच आला असता किंवा त्याने काही मागितले असते.

थोड्या वेळाने मी फिरायला निघालो. तेव्हा तो जागा झाला होता. आपले कपडे आवरत होता. मी फिरून आलो आणि पाहिले तर तो कुठेतरी निघून गेला होता. आणि मला अचानक स्वतःची लाज वाटू लागली. कोणीतरी त्याची विचारपूस करील अशी वाट मी का पाहिली ? मी काही नाही त्याची चौकशी केली ? कदाचित माझ्या मनात भीती होती. याला कुठला आजार असेल का ? मला ते इन्फेक्शन होईल का ? एक ना दोन हजार शंका. खरं म्हणजे सकाळी माझ्या मनात विचार आला होता की त्याला विचारावं, ' बाबा, चहा घेणार का ? ' मी किमान त्याला चहा तरी देऊ शकलो असतो.दुरून का होईना पण विचारायला काय हरकत होती.  पण आता तो निघून गेला होता. ' अब पछताये  क्या होत, जब चिडिया चुग गई खेत .' बऱ्याचदा आपण ज्यांना गरज नाही , त्यांना विचारतो. चहा नको असला तरी आग्रह करतो. पण मग या माणसाला का नाही विचारलं  ?

रोज आपल्या मनाचाच शोध घ्यावा. हृदयात कुठेतरी सल होता. अपराधीपणाची जाणीव बोचत होती. काही महिन्यांपूर्वीच मी आनंदवन, हेमलकसा इथे जाऊन आलो होतो. बाबा आमटेंचा कुष्ठरोग्यांसाठीचा त्याग, प्रकाश आमटेंचं रोग्यांसाठी जीवापाड झटणं , विकास आमटेंचं आनंदवनाप्रती असलेलं समर्पण मी पाहून आलो होतो. बाबा आमटे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पुढच्या पिढ्या सुद्धा या सेवाकार्यात आपल्या सगळ्या आनंदाचा होम करून इतरांसाठी आनंद निर्मिती करीत असतानाच प्रत्यक्ष दर्शन मी घेऊन आलो होतो. ते सगळं मनाला भिडलं होत. पण प्रत्यक्षात का नाही आलं ? परवापासून मी आतून कुठेतरी हललो आहे. माझं बोलणं, माझं लिहिणं हे नुसतंच पोपटपंची आहे की काय असं वाटू लागलं आहे. पण नवीन काहीतरी जाणीव झाली हेही नसे थोडके असं म्हणू या. नित्य नवा दीस जागृतीचा.

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
          ९४०३७४९९३२


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...