उगवतीचे रंग गाथा एका शूरवीराची मागील सप्टेंबर महिन्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला. हा कार्यक्रम नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे होता. हा कार्यक्रम बऱ्याच अर्थाने आगळावेगळा होता. ज्यांनी हे पुस्तक लिहिलं त्या श्रीमती कालिंदी हिंगे या आता सुमारे ८५ वर्षांच्या आहेत. कालिंदीताई या राज्य सरकारच्या ' आदर्श पुरस्कारप्राप्त ' मुख्याध्यापिका आहेत. त्यांचं हे पहिलंच पुस्तक आहे ' क्रांतिसूर्य हेमंत लक्ष्मण सोमण ' या नावाचं. हेमंत सोमण हे कालिंदीताई हिंगे यांचे बंधू. गोवा मुक्तीसाठी आपलं आयुष्य झोकून देणाऱ्या या शूरवीराच्या आयुष्याचा प्रेरणादायी पट या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतो. या वयात सगळे संदर्भ मिळवणं , ते सगळे तारीखवार जुळवणं आणि त्या सगळ्यांना एका प्रेरणादायी चरित्राचं रूप देणं हे शिवधनुष्य कालिंदिताईंनी या वयात पेलणं हे सगळंच अद्भुत आणि आश्चर्यकारक ! अर्थात या कामात त्यांना त्यांच्या कुटुंबीयांची मोलाची मदत झाली. खरं तर या वयात कोणी काही लिहिण्याचा ध्यास घेत नाही. समजा कोणाच्या मनात तशी कल्पना आलीच तर कुटुंबीयच अशा व्यक्तीला अशा विच...