उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग तेहेतीस निवडक पण दर्जेदार गीते देणारा संगीतकार : खय्याम चित्रपटगीतांचे दर्दी असणाऱ्या रसिकांना खय्याम हे नाव निश्चितपणे परिचित असणार. खय्याम यांची गीतं म्हणजे बावनकशी सोनं. हिणकस कुठेही आढळणार नाही. लतादीदींची संगीत कारकीर्द म्हणजे आकाशाचा एक विस्तीर्ण पट म्हटला तर निरनिराळ्या संगीतकारांची लखलखती नक्षत्रे आपल्याला या आकाशात चमकताना दिसतील. या नक्षत्रांमध्ये आपल्या तेजाने लक्ष वेधून घेणारे एक नक्षत्र म्हणजे संगीतकार खय्याम. लतादीदींना एका मुलाखतीमध्ये गीतकार जावेद अख्तर यांनी विचारले की तुम्ही आजपर्यंत हजारो गाणी गायलीत. या सगळ्या गाण्यांमध्ये तुम्हाला सर्वात जवळचं वाटणारं गाणं कोणतं ? दीदी म्हणाल्या, ' तशी तर मला खूप गाणी आवडतात. पण मी जेव्हा एकटी असते किंवा प्रवासात असते तेव्हा ' रझिया सुलतान ' मधलं ' ऐ दिले नादान...' हे गाणं गुणगुणायला मला खूप आवडतं. ' दीदींचं हे उत्तर ऐकून जावेद अख्तर खुश झाले कारण या गाण्याचे गीतकार होते जावेद अख्तर यांचे वडील जां निसार अख्तर आणि संगीतकार होते खय्याम. खय्याम म्ह...