उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंद घन : लता मंगेशकर - भाग आठ वाटचाल नव्या क्षितिजाकडे... लताच्या संघर्षाचा काळ सुरु होता. परिस्थती प्रतिकूल होती. प्रतिकूल परिस्थतीत मी मी म्हणणारी माणसे मोडून पडतात. पण ज्यांच्या डोळ्यांसमोर ध्येयाचा ध्रुवतारा अढळ असतो, ती माणसे पराभूत न होता वाटचाल करत राहतात. ' कोलंबसाचे गर्वगीत ' या कवितेत कुसुमाग्रज म्हणतात अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला. प्रतिकूल परिस्थितीचा अग्नी आपल्याला भाजून काढत असतो. जे त्यातून तावून सुलाखून निघतात, त्यांना सुवर्णाप्रमाणे झळाळी प्राप्त होते. लता हे प्रतिकूल परिस्थितीच्या भट्टीतून भाजून निघालेले असेच बावनकशी सोने आहे. १४/१५ वर्षांची अल्लड पोर. वडिलांचे छत्र हरपलेले. स्वतःचे घर नाही, पैसा नाही, लहान भावंडांची असलेली जबाबदारी यासारखी संकटे तिची परीक्षा पाहायलाच उभी होती. पण अशाही परिस्थितीत हार न मानता स्व कर्तृत्वाने यशाचा मंडप तिने उभारला. त्या काळी स्टुडिओत चौदा चौदा तास काम करावे लागत असे. पगार होता दरमहा ऐंशी रुपये. जेवण वेळेवर मिळेलच असे नाही. कधी कधी तर अंगात ताप, पायाला सेप्टिक झालेले अशा...