उगवतीचे रंग आमची पहिलीवहिली युरोपवारी - भाग १२ अकरा जून २०२४. युरोपवारीहून सुखरूप परत आलो आणि या शुभ दिनी भारतभूमीवर पाऊल ठेवले. कधी काळी आपण युरोप प्रवासाला जाऊ आणि आतापर्यंत केवळ ऐकलेले वा सिनेमात किंवा टीव्हीवर पाहिलेली ठिकाणे आपण प्रत्यक्षात पाहू असे वाटले नव्हते. पण सुदैवाने हा योग आला होता. मिलानहून रात्री दहा वाजता विमानात बसलेलो आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता दिल्ली विमानतळावर येणे अपेक्षित होते. पण आमचे विमान खराब हवामानामुळे दिल्लीला अर्धा ते पाऊण तास उशिरा पोहोचले होते. दिल्लीहून आम्हाला पुढेच जे कनेक्टिंग फ्लाईट होते ते दहा वा. च्या सुमारास होते. त्यामुळे आमचे ते विमान मिस होते की काय अशी धाकधूक मनात होती. पण आम्ही जवळपास ३५ प्रवासी त्या विमानाने जाणारे असल्याचे कळल्यावर एअर इंडियाने ते विमान अर्धा तास उशिरा सोडण्याचे ठरवले. दिल्ली विमानतळावर आमचे सामान कलेक्ट करणे, इमिग्रेशन आदी तपासण्यांना सामोरे जाणे यात आमची खूपच धावपळ झाली. इकडून तिकडे पळ, तिकडून आणखी दुसरीकडे अशी धावाधाव करावी लागली. मुंबईला जाणाऱ्या विमानात स्थानापन्न झालो आणि आम्ही सुटकेच...