उगवतीचे रंग ये दिल मांगे मोअर ... माणसाचा स्वभावच असा आहे की त्याला अधिक अधिक हवे असते. हवे , हवे आणि हवे. या हवेची हाव कधी संपत नाही. या अर्थाने तो ' हवेशीर ' प्राणी आहे. म्हणून तर आमच्या जाहिरातीत सुद्धा ये दिल मांगे मोअर अशा असतात. झालं असं की सुरुवातीला माझ्याकडे एक सायकल होती. म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी. तेव्हा स्कूटर, मोटरसायकल चालवणाऱ्यांचा हेवा वाटायचा . मग पुढे मोटारसायकल आली . तेव्हा बऱ्याच मंडळींकडे फोरव्हीलर म्हणजे मराठीत आपली चारचाकी हो, ती असायची. तिचे सुख काही वेगळेच. आणि ज्या प्राण्यांकडे म्हणजे मनुष्यप्राण्यांकडे बरं का, ती असायची त्यांचा भाव वेगळाच असायचा. म्हणजे आताच्या भाषेत ' लई भारी.' पण करणार काय ? आपल्याला जे काही घ्यायचे ते आपल्याच बळावर. आपल्या पूर्वजांनी काही गडगंज संपत्ती कमावून ठेवली नव्हती. त्यांचा उदात्त हेतू इतकाच होता की पुढच्या पिढीच्या कर्तुत्वाला वाव मिळावा. त्यामुळे जोपर्यंत हातात पैसे येत नाही, तोपर्यंत गाडीत बसून फिरण्याचे स्वप्न फक्त पाहत होतो. दुसरं काय करणार ? ते किशोरकुमारचं गाणं आम्हाला आपलं वाटायचं. ' थोडा ह...