उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग वीस ये जिंदगी उसी की हैं ... ( लता मंगेशकर आणि सी रामचंद्र ) सी रामचंद्र म्हणजे रामचंद्र नरहर चितळकर. अहमदनगर जिल्ह्यातील चितळी त्यांचं मूळ गाव. वडील रेल्वेत असल्यामुळे त्यांच्या बदलीनिमित्त त्यांचे विविध ठिकाणी राहणे आणि फिरणे झाले. पण रामचंद्रला शालेय शिक्षणात फारशी रुची नव्हती. त्याऐवजी गाणी, शास्त्रीय संगीत यामध्ये त्याला स्वारस्य होते. विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. तरुण वयात चित्रपटसृष्टी त्यांना खुणावत होती. आपणही नट होऊन नाव कमवावे असे त्यांना वाटत होते. काही चित्रपटात त्यांनी सुरुवातीला भूमिकाही केल्या. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ते मिरसाहेब या संगीत दिग्दर्शकांच्या सहवासात आले. त्यांच्यामुळे त्यांचा मास्टर भगवान उर्फ भगवान दादा यांच्याशी परिचय झाला. मा. भगवान यांनी त्यांना मद्रासला बोलवून घेतले. तिथे त्यांनी तीन तामिळी चित्रपटांना संगीत दिले. रामचंद्र चितळकर तेथेच सी रामचंद्र म्हणून प्रसिद्ध झाले. पुढे भगवान दादांबरोबर ' अलबेला ' हा चित्रपट त्यांनी केला. ...