मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग या सुखांनो या..

उगवतीचे रंग

या सुखांनो या..

'  लाईफ इज ब्युटीफुल ' या चित्रपटात जोशुआ नावाच्या एका ज्यू व्यक्तीला नाझी सैनिक पकडतात आणि छळ छावणीत ठेवतात. या चित्रपटाला दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी आहे. नाझी सैनिक ज्यूंचा अनन्वित छळ करतात. आणि शेवटी त्यांची हत्या करतात. या जोशुआला त्यांनी पकडलेले असते. पण तो आपला कायम आनंदी . तो म्हणतो, ' तुम्ही माझ्या शरीराला यातना देऊ शकाल. पण माझ्या मनाला नाही. आनंदी राहायचे की नाही ते मी ठरवणार. '

खरंच मला कौतुक वाटतं त्या जोशुआचं . इतक्या विपरीत परिस्थितीत तो आनंदी कसा राहू शकला ? त्याचे एकच कारण म्हणजे त्याची असलेली धारणा. त्याची धारणा ही की मला माझ्या मर्जीविरुद्ध कोणीही दुःखी करू शकणार नाही. पण जोशुआचं उदाहरण चित्रपटातलं म्हणून आपण सोडून देऊ. पण ते खोटं आहे असं मात्र नाही. कुठेतरी ही वस्तुस्थिती असल्याशिवाय दिग्दर्शकाने ते दाखवलेले नाही.

सुख आणि दुःख याच्यावर मी जेव्हा विचार करतो, तेव्हा मला वाटतं की सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कुठलाही प्रसंग किंवा घटना अगदी निर्भेळ अशी सुखाची किंवा दुःखाची नसतेच. सुखाच्या घटनेला अनेकदा दुःखाची किनार असते. आणि दुःखद प्रसंग सुद्धा बऱ्याच वेळेला वाईटातून चांगले घेऊन येतात. What matters is our attitude towards life. आपण त्या प्रसंगाकडे कसे बघतो त्यावर सर्व अवलंबून असते.

तुकाराम महाराज म्हणतात, ' सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे..' या उक्तीतून आपला असा समज होतो की खरोखरच सुख जवापाडे म्हणजे अगदी थोडे आहे आणि दुःख हे पर्वताएवढे म्हणजे प्रचंड आहे. पण तुकाराम महाराजांच्या या उक्तीत ' पाहता ' असा शब्द आहे. पाहता म्हणजे आपल्याला वाटते. खरं म्हणजे तसे नसते. सुख आणि दुःख या subjective गोष्टी आहेत. जी गोष्ट एखाद्याला सुखाची वाटेल, तीच दुसऱ्याला दुःखाची वाटू शकते. पण आपल्याकडे लहानपणापासून अशा प्रकारची शिकवण मिळते की त्यामुळे जीवनात दुःख जास्त आहे आणि सुख कमी आहे अशी मनाची धारणा दृढ होते.

त्यामुळे होतं काय की ज्या मोकळ्या मनाने आपण सुखाचा स्वीकार करतो, तेवढ्या मोकळेपणाने दुःखाचा स्वीकार करत नाही. दुःखाचा स्वीकार करताना आपण मोठ्या मनाने करतो. मोठ्या मनाने याचा विपरीत अर्थ घेऊ नका.  मोठ्या मनाने याचा अर्थ या ठिकाणी आपण असे ठरवून टाकलेले असते की दुःख फार आहे, फार मोठे आहे. आणि सुखाचा स्वीकार आपण जरा संकुचित मनानेच करतो. म्हणजे कसा ? तर आपण जे सुख किंवा यश मिळाले त्यावर समाधानी नसतो. उदा. आपल्या पाल्याला परीक्षेत ९० % गुण मिळाले, तर आपण म्हणतो, ' बस, इतकेच..? अजून थोडे हवे होते. ' आपल्याला एखादी सुटी मिळाली की आणखी हवी होती असे आपल्याला वाटते. असे आपले अनेक गोष्टींबाबत होते. म्हणजेच आपल्याला मिळालेल्या सुखाला आपणच एका अर्थी मर्यादित करतो. खरं म्हणजे उलट असायला हवं, नाही का ? पण ते नाही होत.

खरं म्हणजे सुख दुःखाकडे पाहण्याचा खूप व्यापक आणि सुंदर दृष्टिकोन आपल्याला भगवद्गीतेने आपल्याला दिलाय. त्यात स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगताना म्हटले आहे

सुख दुःखे समे कृत्वा
लाभालाभों जयाजयो

म्हणजे जो स्थितप्रज्ञ असतो तो सुख दुःख, लाभ हानी, विजय पराजय यातील कोणतीही परिस्थिती असली तरी विचलित होत नाही.  ही स्थितप्रज्ञाची अवस्था प्राप्त करणे तुम्हा आम्हा सर्वसामान्य माणसांना जरा कठीणच आहे. पण अशक्य नाही. पण मित्रांनो, मला वाटतं की आपल्या मनोधारणेत थोडा बदल केला तर आपल्या जीवनात तुम्हाला छोटे छोटे अनेक आनंदाचे प्रसंग आढळतील. आणि दुःखाच्या प्रसंगाकडे पण आपण थोड्या वेगळ्या दृष्टीने पाहू शकू.

मागे मी एक लेख वाचला होता. आता पूर्ण आठवत नाही. पण त्यात ज्याने तो लिहिला त्या माणसाला एकाच वर्षात खूप अडचणी, अडथळे येतात. आर्थिक मंदी येते, त्याच वर्षी नेमके त्याचे कसले तरी ऑपेरेशन होते, त्याला काही दिवस हॉस्पिटलमध्ये काढावे लागतात. एका बाजूने विचार केला तर ते वर्ष त्याच्यासाठी अत्यंत वाईट होते. पण तो दुसऱ्या बाजूने जेव्हा विचार करतो, तेव्हा त्याला वाटते की ही दैवाने दिलेली आपल्याला एक संधी आहे. मग तो आर्थिक प्रगतीच्या नवीन वाटा शोधतो, हॉस्पिटलमध्ये बेडवर पडल्या पडल्या चांगल्या पुस्तकांचे वाचन करतो. एका अर्थाने ते वर्ष त्याच्या जीवनात कायापालट घडवून आणते.

आता हेच बघाना , सतत काम काम म्हणून आपण कंटाळलो होतो. आणि बऱ्याचदा तक्रारही करत होतो की मला निवांत वेळच मिळत नाही. तो मिळाला असता तर मी माझी आवडती पुस्तके वाचली असती, आवडती गाणी ऐकली असती, घरातल्या माणसांसोबत गप्पा मारल्या असत्या. एक ना दोन कितीतरी गोष्टी आपल्या मनात असतात. पण आता जेव्हा वेळ मिळाला आहे आणि करोनासारख्या रोगाच्या साथीमुळे आपल्याला घरी बसावे लागले आहे, तेव्हा तोच वेळ आपल्याला नकोसा का वाटतो ?आपल्याला बदल हवा असतो. त्याच त्या गोष्टींना आपण कंटाळतो. म्हणून घरी बसायचा देखील आपल्याला आता कंटाळा आला आहे. पण  हे काही दिवस आपल्याला घरीच बसायचे आहे. ही एक प्रकारे आपली परीक्षाच आहे. या संधीचा न कुरकुरता, दुःख न करता छान उपयोग करून या. आणि या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ या.

मित्रानो, आपल्या संगणकात, मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर असते ना ! ते जसे असेल, तसा तो संगणक, मोबाईल इ गोष्टी काम करतात. आपली मानसिक घडण जी लहानपणापासून झाली आहे, ती सुद्धा एक प्रकारचे सॉफ्टवेअरच आहे असे म्हणाना . हे सॉफ्टवेअर पूर्णपणे जरी बदलता आले नाही, तरी ते थोडे अपडेट करू या. थोडा त्रास होईल, थोडे कष्ट पडतील. कारण इतक्या दिवसांचे जुने सॉफ्टवेअर बदलायला वेळ तर लागणार ना..! हां , आता तुम्ही म्हणाल, की सॉफ्टवेअर बदलायचे म्हणजे नेमके काय करायचे ते तर सांगा. तर मित्रांनो , प्रत्येक प्रसंगाकडे पाहण्याची सकारत्मक वृत्ती आपल्याला स्वतःमध्ये विकसित करायची आहे. हाच काय तो बदल  आपल्याला करायचा आहे. अशी वृत्ती जेव्हा आपली होईल, तेव्हा आपला चेहरा नैसर्गिक आनंदी दिसेल. कृत्रिम हास्य आणावं लागणार नाही. ते आतूनच फुलेल.पटतंय का बघा.



©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
           ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...