उगवतीचे रंग मी कल्हईवाला बनतो... खूप दिवसांपूर्वी कधी नव्हे तो कल्हईवाला माझ्या दारी आला होता. त्याच्याकडून मी मग माझ्याकडे असलेल्या पितळेच्या भांडयांना कल्हई करून घेतली होती. त्याचं व्यक्तिमत्व, कल्हई करण्याची पद्धत, तो त्यासाठी वापरत असलेलं सामान, वापरत असलेले पदार्थ आदींचे निरीक्षण करून मी त्यावर एक लेख लिहिला होता. तो कल्हईवाला मला फार आवडला होता. त्याने माझ्या बालपणीच्या स्मृती जागृत केल्या होत्या. त्याने कल्हई केलेली भांडी पाहून मला खूप समाधान वाटले. त्याचे कल्हईचे काम मी जीवनाशी जोडले. माणसाच्या मनालाही कधी कधी असाच गंज चढतो. त्यालाही तो काढून कल्हई करण्याची गरज असते वगैरे अशा छान छान गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. लेख लिहून झाल्यावर तो माझ्या वाचकांसाठी व्हाट्सअप तसेच फेसबुकच्या भिंतीवर टाकला. वाचकांकडून तो खूप आवडल्याचा प्रतिसाद यायला लागला. अनेकांनी आपल्या जुन्या स्मृती जागृत झाल्याचे सांगितले. कोणाला तो कल्हईचा विशिष्ट वास आठवला. कोणाला त्या लेखात दिलेले ' लावा भांड्याला कल्हई ' हे गाणं आवडलं वगैरे. हे सगळं पाहून आपले श्रम सार्थकी लागल्याचे...