मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग हद कर दी आपने...

उगवतीचे रंग

हद कर दी आपने...

आपण सगळे मनाने आणि शरीराने २१ व्या शतकात वावरतो आहोत. आपल्यापैकी जे सुशिक्षित आहेत, मोबाईल व्हाट्सअप, फेसबुक इ चा वापर करताहेत,  त्यांनी बहुतेकांनी किमान पदवीपर्यंतचे शिक्षण तर घेतलेच असेल . काहींना पदवीपर्यंत नाही पोहोचता आले तरी दहावी बारावी तरी बहुतेकांनी उत्तीर्ण केली असेलच. शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत आपण सर्वांनी विज्ञानाचा अभ्यास केलेला असेल.

विज्ञानम्हणजे काय तर एखाद्या विषयाच्या व्यवस्थित रीतीने (systematic study) केलेल्या अभ्यास. विश्वातील घटना व घडामोडी यांचे बुद्धिनिष्ठ, कार्यकारणाधिष्ठित असे आकलन होण्यासाठी मानवाने केलेल्या क्रिया व त्यांचे फलित म्हणजे विज्ञान (Science) होय.नेमकेपणाने सांगायचे तर विज्ञानाचे शिक्षण याचा अर्थ विवेकी, चिकित्सक व प्रयोगशील प्रवृत्ती अंगी बाणवणे असाच असला पाहिजे. ज्यांनी हे शिक्षण घेतले त्यांना सभोवताली घडणाऱ्या घटनांचा विज्ञानाच्या कसोट्यांवर विचार करता आला पाहिजे. आपल्या विचारातही तर्कशुद्धता पाहिजे. विज्ञान शिकून जी एक प्रकारची दृष्टी येते ती आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला वापरता आली पाहिजे. तरच त्या शिकण्याचा उपयोग.

 हे सगळे आज मी या ठिकाणी का सांगतो आहे ? मी विज्ञानाचा पदवीधर नाही. पण आजपर्यंतच्या शिक्षणातून, वाचनातून माझा जो विज्ञानविषयक दृष्टिकोन विकसित झाला आहे, तो मला हे सांगतो की सध्या व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियावर मी ज्या काही पोस्ट्स वाचतो आहे, त्या विज्ञाननिष्ठ नाहीत. त्यांना काही वैज्ञानिक आधार असेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

आता मी मूळ विषयावर येतो. सध्या करोना व्हायरसने सर्वत्र थैमान घातले असल्याने त्याच्याशी संबंधित अनेक पोस्ट्स, लेख किंवा व्हिडीओ या स्वरूपात सोशल मीडियावर येतात. हे लेख किंवा व्हिडीओ तुमच्या आमच्या सारखे सुशिक्षित आणि कमीत कमी ज्यांनी दहावी बारावीपर्यंत विज्ञानाचा अभ्यास केला आहे असे लोक वाचतात, पाहतात. आणि आपल्यासारखीच सुशिक्षित मंडळी अशा प्रकारचे लेख किंवा व्हिडीओ तयार करून पाठवतात. आज करोना साथीच्या निर्मूलनार्थ केंद्र सरकार आणि राज्य सरकार अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत हे सुरुवातीला नमूद करतो. आणि त्यांचे हे प्रयत्न प्रशंसापात्र आहेत. परंतु त्यामुळे जी वस्तुस्थिती आहे ती तर बदलत नाही.

आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांचा मी चाहता आहे. पण आदर असणे आणि चाहता असणे वेगळे. परवा व्हाट्सअपवर आलेल्या एका लेखात त्यांच्याबद्दल जी विपर्यस्त विधाने केली आहेत, ती पाहून खरंच आपण प्राथमिक विज्ञान किंवा विज्ञानाचे प्राथमिक सिद्धांत तरी अवगत केले का, शिकलो का हा प्रश्न पडतो. आता त्या लेखातील ही  काही वाक्ये पहा-

" २२ मार्च म्हणजे फाल्गुन कृष्ण १३ शततारका होय. या दिवशी मधुकृष्ण त्रयोदशी वारुणी योग आहे. पंचांगानुसार २२ मार्च हा त्याज्य दिवस असून या दिवशी प्रखर उन असते. म्हणजे सूर्य प्रखरतेने तळपणारा हा दिवस आहे. कोरोना रोग भविष्यात भारतात येणार त्यावेळी आपण काय उपाय केले पाहिजेत, यावर चर्चा करण्यासाठी आदरणीय मोदीजींनी दोन महिन्यापूर्वी नासा आणि इस्त्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली होती.

त्यावेळी अनेकांनी त्यांची चेष्टा केली. पण, मोदींजींनी उपग्रहाच्या मदतीने पृथ्वीवर रसायन फवारता येईल का याबाबत इस्त्रो आणि नासाच्या शास्त्रज्ञांससोबत चर्चा केली. तेव्हा अनेकांना मोदींच्या बौद्धिक चातुर्याचे नवल वाटले. नासाच्या शास्त्रज्ञांनी तर मोदींचा आणि आईनस्टाईनच्या मेंदूचा आयक्यू सेम आहे, अशीही प्रशंसा केली. त्यावेळी मोदींनी २२ मार्चला सूर्यासमोर रसायनाने भरलेला उपग्रह आणायचा प्रस्ताव मांडला.

२२ मार्चला सकाळी सात वाजता त्या उपग्रहावर सूर्याची अतिनील किरणे पडतील. त्यानंतर उपग्रहातून वायूगळती होऊन त्याची वाफ उन्हाद्वारे पृथ्वीच्या दिशेने निघेल. पृथ्वीच्या वेगाशी उपग्रहाचा वेग मॅच केल्यास आशिया खंडातील फक्त भारत देशावर त्याची वाफ पसरेल असे गणितही आदरणीय मोदीजींनी मांडले. "

लेखातील वरील वाक्ये पुरेशी बोलकी आहेत. ज्याने कोणी ती लिहिली असतील, तो बिचारा एक तर अंधश्रद्धाळू तरी असावा किंवा विज्ञानाचा आणि त्याचा संबंध  खूप लांबचा असावा. आता याच लेखातील अतिशयोक्तीचा कहर पहा -

" विशेष म्हणजे नासा आणि इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी यावर चर्चा करुन हे शक्य असल्याचेही सांगितले. ही बातमी गुप्त ठेवण्याचे ठरले होते. पण, नासावाले फुटीर निघाले. त्यांनी ही गोष्ट अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितली. ट्रम्पही आश्चर्यचकित झाले. पण, नासाच्या शास्त्रज्ञांनी आदरणीय नरेंद्र मोदी खऱ्या अर्थाने विद्वान असल्याचे स्पष्ट केले. त्यावर हा प्रयोग अमेरिकेत व्हायला हवा, असे ट्रम्प म्हणाले. मात्र, अंतराळात रसायनाने भरलेला उपग्रह भारतीय बनावटीचा असून त्याचा रिमोट मोदीजींकडे असल्याने नासाच्या अधिकाऱ्यांंनी स्पष्ट केले. म्हणून मोदीजींना विनंती करण्यासाठी महिन्याभरापूर्वी डोलांड ट्रम्प भारतातही आले. पण, मोदीजींनी त्यांना हुसकावून लावले.

आता प्रश्न हा होता की दिवसभराच्या प्रखर उन्हात तो वायू भारतभर पसरला तर त्याचा लोकांच्या आरोग्यावर काही परिणाम तर होणार नाही ना ? पण, याचेही उत्तर मोदींजीकडे तयार होते. या उत्तरासाठी मोदीजींनी हिमालयात आत्मसात केलेली विद्या कामी आली. मानवी शरीर हे पंचतत्वापासून बनलेले असते. प्रत्येक शरीरामध्ये आकाश, वायू, जल, अग्नी आणि पृथ्वी ही पंचतत्व असतात. आपण टाळी वाजवली कि ही पंचतत्व उत्तेजित होतात आणि शरीरातली प्रतिकारशक्ती वाढवतात. म्हणून मोदीजींनी २२ तारखेला संध्याकाळी पाच वाजता सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्यात, असे आवाहन केले आहे."

मला  खात्री आहे की वरील वाक्ये वाचून आपली थोडीफार करमणूक सुद्धा होईल. एखादी शक्यता किंवा एखाद्या गोष्टीची तारीफ ही कुठपर्यंत ताणायची त्याचा हा मासलेवाईक नमुना आहे. आज तर मी व्हाट्सअपवर एक व्हिडीओ पाहिला. त्यात महाभारतातला प्रसिद्ध श्लोक ' यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत... ' हा देऊन जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते किंवा धर्म संकटात सापडतो तेव्हा तेव्हा परमेश्वर धर्माच्या रक्षणासाठी अवतार घेतो हे सांगून शेवटी मा नरेंद्र मोदींचा फोटो दाखवला होता. प्रश्न मोदी असे आहेत की नाहीत हा नाहीच. पण एखाद्या गोष्टीची तारीफ करताना आपण कुठल्या मर्यादेला जातो हा आहे. आणि अशा प्रकारची तारीफ त्या व्यक्तीला आणि तो प्रामाणिकपणे करीत असलेल्या त्याच्या कार्याला सुद्धा मारक ठरते याचे भान लिहिणारांना असत नाही. खरं तर अशा काळात जनतेने वस्थुस्थितीचा स्वीकार करून कोरोनासारख्या साथीच्या रोगाचा मुकाबला विज्ञाननिष्ठ पद्धतीने केला पाहिजे.

२२ मार्चला सायंकाळी ५ वा मा पंतप्रधानांनी लोकांना आपापल्या घराच्या बाहेर येऊन टाळ्या वाजवा असे सांगितले. त्याचा उद्देश जे डॉक्टर, नर्सेस आणि इतर अत्यावश्यक सेवा देणारी मंडळी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा होता.असे असताना, लोकांनी एखादा आनंदोत्सव साजरा करावा तसे एकत्र येऊन, मूळ उद्देशालाच हरताळ फासला . काही महाभागांनी तर फटाके फोडून आनंद साजरा केला. गच्चीवर, रस्त्यावर लोकांनी जमून टाळ्या वाजवल्या आणि त्याचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात धन्यता मानली . आता लोकांना घराबाहेर पडू नका असे वारंवार आवाहन करून देखील लोक ऐकायला तयार नाहीत. परिस्थितीचे गांभीर्यच त्यांना नाही. ग्रामीण भागात तर सोडूनच द्या पण मुंबई, पुण्यासारख्या शहरात ही परिस्थिती आहे. मग पोलिसांना नाईलाजाने लाठीमार करावा लागतो आहे. अशाही भयंकर वातावरणात स्वतःच्या जीवाला धोका असताना डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस आणि अत्यावश्यक सेवा देणारे देवदूतासारखे काम करीत आहेत. त्यांना सलाम...!

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

         ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...