उगवतीचे रंग एक गोष्ट सांगू... ? मंडळी, एक गोष्ट सांगू..? असं म्हटलंय खरं. पण मी गोष्ट वगैरे काही सांगणार नाहीये. म्हणजे आपली अशी म्हणण्याची पद्धत आहे हो ! आपल्या कोणाबरोबर तरी गप्पा सुरु असतात. मध्येच समोरची व्यक्ती म्हणते 'एक गोष्ट सांगू का ? ' म्हणजे ती व्यक्ती काही खरोखरोच गोष्ट सांगणार नसते. तिला आपल्याला काही तरी सांगायचे असते. बोलताना अशा खूप गमती जमती घडतात. पण अशी वाक्ये बोलण्याचा एक उद्देश हा असतो की समोरच्याचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणे. घराघरातून कानावर पडणारे ' अहो, ऐकलं का...' हे वाक्यही आपणा सर्वाना परिचित असेलच. मी बऱ्याच वेळा गमतीनं ' नाही ' असं म्हणतो कारण मी त्या आधी काही बोललं गेलेलंच नसतं. तो फक्त आपल्याला बोलावण्यासाठी आणि पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी तयारी ठेवावी म्हणून केलेला इशारा असतो. ' अहो, ऐकलं का...' या तीन अक्षरी संबोधनात खूप मोठा अर्थ भरलेला असतो हे मला अनुभवाने कळलं आहे. प्रत्येक वेळा परिस्थितीनुसार त्याला वेगवेगळा संदर्भ असतो. उदा. ' अहो, ऐकलं का ? तेवढा फळीवरचा डबा काढून देता का पासून तर त्या अमुक एका दुकानात स...