उगवतीचे रंग फुले वेचिता बहरू… माझ्या बागेतल्या कुंदाच्या झाडावर सध्या एक अद्भुत दृश्य पाहायला मिळते आहे. कळ्यांनी लगडलेले झाड, शुभ्र फुलांनी भरून आलेले—जणू अंगणातच चांदणे उतरले. आरती प्रभू यांची एक सुंदर कविता आहे, समईच्या शुभ्र कळ्या. ही फुले म्हणजे जण समईच्या शुभ्र कळ्या असेच वाटले. किती फुले वेचली, तरी झाड बहरण्याचे थांबले नाही. त्याच्यावरच्या कळ्या उमलत राहिल्या. त्या क्षणी संत ज्ञानेश्वरांचा अभंग आठवला, “ फुले वेचिता बहरू कळीयासी आला ”. किती साध्या शब्दांत किती मोठे तत्त्व सांगून गेले आहेत ज्ञानेश्वरमाऊली! प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो. मोगऱ्याची फुले उन्हाळ्यात येतात; उन्हाळ्यातच आंब्याला मोहर येतो आणि वातावरणात घमघमाट सुटतो. जणू संपूर्ण आसमंत सुगंधाने भरून जातो. तसाच कुंदालाही हिवाळ्यात बहर येतो आणि तो भरभरून फुलतो. निसर्ग प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आनंद देत असतो—कधी सुगंधातून, कधी रंगांतून, तर कधी केवळ शांत सौंदर्यातून. फुलांना बहर, आंब्याला मोहर आणि हवेला सुगंध...! हे नक्षत्रांचे देणे, हे देवाघरचे देणे ! आपण अनेकदा देण्यात थांबतो.आता पुरेसे दिले, आता मा...