उगवतीचे रंग गा प्रकाशगीत... परवाच्या दिवशी एक सुंदर व्हिडिओ पाहण्यात आला. त्या व्हिडिओत दोन माणसे बोलताना दाखवली होती. त्या व्यक्तींची नावे त्यात दाखवली नाहीत. पण मला तो व्हिडिओ फार आवडला. जीवनाचे सत्य तो सांगून जातो. त्यातील एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे बहुधा डेव्हिड शॅड्स असावा. तो दुसऱ्या एका तरुण व्यक्तीशी बोलत होता. झाडांवरून त्यांची चर्चा सुरू होती. डेव्हिड त्या तरुणाला म्हणत होता," तुला माहिती आहे का झाडांची वाढ दोन दिशेने होत असते ? जमिनीच्या वरच्या बाजूला आणि जमिनीच्या खाली सुद्धा. " तो तरुण आश्चर्यचकित होऊन ऐकत होता. खरंतर झाडे जेवढी जमिनीवर वाढतात तेवढीच ती जमिनीखाली देखील वाढतात हे सत्य मला माहीत नव्हते असे नाही. पण तो व्हिडिओ पाहिल्यानंतर ती गोष्ट मला अधिक तीव्रतेने जाणवली कारण यापूर्वी मी तसा विचारच केला नव्हता. मग झाडांबद्दल बोलताना डेव्हिड केवळ झाडांबद्दलच नव्हे तर जीवनाचे सत्यही उलगडू लागला. तो म्हणाला," आपल्याला सर्वांना जमिनीच्या वर वाढणारे झाड दिसते, त्याला येणारी फळे फुले दिसतात. आपण आनंदीत होतो आपल्याला फळे देणारा वृक्षच माहिती असतो. पण ही फळे किंवा ...