उगवतीचे रंग रंगांचा उत्सव : होळी ते रंगपंचमी आपण भारतीय सण, उत्सव साजरे करण्यात आघाडीवर आहोत. आपल्या सगळ्या सणांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते सगळे निसर्गाशी आणि पर्यावरणाशी जोडले आहेत. आपले आरोग्य, जीवनशैली आणि अध्यात्म यांच्याशी त्यांची एक अतूट अशी नाळ जुळलेली आहे. होळी येते तेव्हा भोवतालचा निसर्ग आपले रूप बदलत असतो. पानगळ होऊन झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षांना बहर येतो. आंब्याच्या मोहराने भोवतालचा परिसर धुंद सुगंधी होऊन गेलेला असतो. अशातच कडक थंडी नाहीशी होऊन उन्हाळ्याची चाहूल लागलेली असते आणि अशातच फाल्गुन पौर्णिमेला होळीचा सण येतो. या पौर्णिमेलाच हुताशनी पौर्णिमा असेही म्हटले जाते. आपल्या इतर अनेक सणांप्रमाणेच हा सण अमंगलातून मंगलाकडे, वाईटाकडून चांगल्याकडे जाण्याची प्रेरणा देतो. भक्त प्रल्हादाची कथा आपण सगळे जाणतो. प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता. त्यामुळे त्याचा पिता हिरण्यकश्यपू याने त्याला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. ते सगळे अयशस्वी ठरले. शेवटी आपल्या बहिणीला म्हणजे होलिकेला प्रल्हादाला मांडीवर घेऊन जाळण्यासाठी हिरण्यकश्यपुने सांगितले. होलिकेला अग्नी जाळू शकणा...