मुख्य सामग्रीवर वगळा

उगवतीचे रंग नमस्कार...

उगवतीचे रंग

नमस्कार...

नमस्कार ही  किती सुंदर गोष्ट ! आणि त्याहून सुंदर कृती. नमस्कार ही खरं तर प्राचीन भारतीय संस्कृतीची जगाला अनमोल देणगीच म्हटली पाहिजे. नमस्कार हा दोन्ही हात जोडून केला जातो. आपले दोन्ही हात, एक डावा आणि एक उजवा, पण नमस्काराच्या वेळी एकत्र येतात. मग डावे , उजवे शिल्लकच राहातच नाही. दोन्ही हातांची दहा बोटे या वेळी एकत्र येतात. जणू दशपाकळ्यांचे फुल.. ! आपले शरीर एक वृक्ष मानले तर दोन्ही हात या त्याच्या दोन फांद्या. त्या फांद्यांवर उमललेले हे दशपाकळ्यांचे फुल. त्या दोन्ही हातांच्या बोटांमध्ये एकत्र आल्यानंतर एक पोकळी तयार होते. काय नसते त्या पोकळीत सामावलेले ? जो नमस्कार करतो, त्याचे अवघे अस्तित्व, त्याचे व्यक्तिमत्व. तो नमस्कार असतो. हृदयापासून. हृदयकमल उमलल्याचे प्रतीक म्हणजे जुळलेले करकमल .  हृदयात असतो चैतन्याचा वास. ते चैतन्य जणू नमस्काराच्या कृतीतून साकार होते.

आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीला नमस्कार करतो, तेव्हा त्यामागे असतो त्या व्यक्तीबद्दलचा आदरभाव. त्या व्यक्तीचा एक व्यक्ती म्हणून आपण स्वीकार केला आहे हे दर्शविणारी ती कृती असते. त्याचबरोबर आपल्या आत्मभावाचे समर्पणही त्यात असते. त्यात नम्रता असते, ऋजुता असते. दुसऱ्याचा आदर, स्वीकार आणि स्वतःचं समर्पण, नम्रता ही  किती सुंदर मूल्यं..!  ही सगळी व्यक्त करतो मनापासून केलेला एक नमस्कार. नमस्कारात एक शक्ती असते. मनापासून केलेला नमस्कार समोरच्या व्यक्तीला किंवा समूहाला सुद्धा जिंकून घेऊ शकतो. आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीला नमस्कार करतो, तेव्हा त्याचे उत्तर म्हणून ती व्यक्ती सुद्धा आपल्याला प्रतिनमस्कार करते. ती व्यक्ती आपल्या नमस्कारातून जणू सांगते की मी तुझ्या नमस्काराचा स्वीकार केला आहे. देवासमोर उभे राहून जेव्हा आपण नमस्कार करतो, तेव्हा आपल्या मनात हीच भावना असते. मनातून आपण जणू त्याला म्हणत असतो, ' हे परमेश्वरा , माझ्या नमस्काराचा स्वीकार कर. ' देवाला नमस्कार करताना आपली मान किंचित झुकते, डोळे मिटले जातात आणि नमस्कार असतो हृदयापासून.

आपल्या संस्कृतीत पूर्वी आईवडील, वडीलधारी मंडळी आणि गुरुजन यांना साष्टांग दंडवत किंवा नमस्कार घालण्याची प्रथा होती. नंतर नंतर त्यात बदल होऊन वाकून त्यांच्या चरणाला स्पर्श करून नमस्कार करण्याची पद्धत रूढ झाली. त्यातही  शरीर आणि मनाची एकरूपता असते. वडीलधारी मंडळी आशीर्वाद देतातच. आशीर्वाद देताना त्यांच्यातील सकारात्मक शक्ती, ऊर्जा जो नमस्कार करतो त्याला मिळते. म्हणून नमस्कार फुकाचा आणि आशीर्वाद लाखाचा असे म्हटले जाते. पण पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे ही प्रथा मागे पडताना दिसत आहे.

तसे पाहिले तर काळानुसार नमस्काराच्या अर्थात आणि कृतीत थोडा बदल काळानुसार होत गेला आहे. आता समोरच्या व्यक्तीला नमस्कार करताना वर वर्णन केलेल्या सगळ्या भावना असतीलच असे नाही. बऱ्याचदा संभाषणाची सुरुवात करण्यासाठी तो औपचारिकपणे केला जाऊ शकतो. लाचारीने, काही मिळवण्याच्या उद्देशाने केलेला नमस्कार वेगळा. कोपरापासून केलेला नमस्कार वेगळा. राजकीय पुढाऱ्यांचा नमस्कार वेगळा. त्या प्रत्येक कृतीमागे काही अर्थ असतो. पण काहीही असले तरी आदरपूर्वक आणि मनापासून केलेला नमस्कार हा आपल्या ठिकाणी श्रेष्ठच असतो. पाश्चात्य पद्धतीत समोरच्या व्यक्तीचे स्वागत हस्तांदोलन अर्थात शेकहॅण्ड करून केले जाते. त्यामागे देखील स्वीकाराची आणि आदराची भावना असतेच. पण आज काळाच्या कसोटीवर घासून पाहिले तर भारतीय नमस्कार श्रेष्ठ ठरला आहे. करोनासारख्या साथीच्या रोगाचा संसर्ग टाळायचा असेल, तर नमस्काराला पर्याय नाही.

उत्तररामचरितमानस या भवभूतीने लिहिलेल्या ग्रंथात राम आणि सीतेच्या वनवासातील जीवनाचा एक हृद्य प्रसंग वर्णन केला आहे. वनवासात पर्णकुटीत राहत असताना सीता पाणी आणण्यासाठी म्हणून नदीवर जाते. इकडे श्रीराम तिची वाट पाहत असतात. सीता आणि राम हे दोघेही खरेतर नुकतेच लग्न झालेले दोन प्रेमी जीव. पण लग्नानंतर काही दिवसातच त्यांना वनवासाला सामोरे जावे लागले. खरंतर प्रसादात राहून राजवैभव उपभोगण्याचे त्यांचे दिवस. पण त्याबद्दल त्यांची तक्रार नव्हती. पण दोघांचेही एकमेकांवर अपार प्रेम. सीता नदीवर गेली असताना पाण्यात चाललेली हंस पक्ष्यांची क्रीडा पाहण्यात रमली . तिला जेव्हा वेळेचे भान आले, तेव्हा तिला आपल्याला उशीर झाल्याचे लक्षात आले. श्रीराम आपली वाट पाहत असतील, ते कदाचित आपल्यावर रागावलेही असतील असे तिला वाटते. आणि खरंच रामाची अवस्था काही वेगळी नव्हती. सीतेच्या काळजीने, विरहाने तो व्याकुळ झाला होता. सीतेने समोरून येताच श्रीरामाला प्रणाम केला. कसा असेल तिचा चेहरा त्यावेळेला ? कोणकोणते भाव प्रकट झाले असतील त्या चेहऱ्यावर ? आणि मग त्या मनातल्या भावासहित केलेला तो नमस्कार. त्या नमस्कारात काय नव्हते..! तिच्या सगळ्या भावना एका नमस्काराने व्यक्त केल्या होत्या. तिची क्षमायाचना, नम्रता, समर्पण आणि रामाबद्दल असलेलं हृदयातील प्रेम सारं सारं त्या एका नमस्काराच्या कृतीतून व्यक्त झालं होत. त्या नमस्काराने रामाचा राग कुठल्याकुठे पळून गेला, विरघळून गेला.  तुकाराम महाराज म्हणतात, ' नम्र झाला भूता, त्याने कोंडिले अनंता . ' अर्थात नम्र होऊन केलेला नमस्कार परमेश्वराला सुद्धा जिंकून घेतो.

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

          ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...