उगवतीचे रंग स्वदेशीची जादू - भाग १२ चंद्र आहे साक्षीला राजेश आणि पिंकी ही नव्या पिढीतील मुले होती. ज्ञान आणि माहिती मिळवण्याची उत्सुकता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. सतत कुठली तरी गोष्ट जाणून घेण्याचं कुतूहल त्यांना असायचं. त्यांच्या या ज्ञानयज्ञात भर घालण्याचे कार्य श्यामराव आणि श्यामलाताई त्यांच्या परीने करीतच होते. कधी कधी भगवानकाका त्यात मोलाची भर घालत. तशातच २३ ऑगस्ट २०२३ चा दिवस उजाडला. या दिवशी भारत आपले चंद्रयान-३ चंद्रभूमीवर उतरवणार होता. त्यामुळे या ऐतिहासिक घटनेचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर सुरु होते. सगळ्यांच्याच नजरा समोरच्या पडद्यावर खिळून होत्या. क्षणाक्षणाला चंद्रयान आणि चंद्राचा पृष्ठभाग यातील अंतर कमीकमी होत होते. संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी ' विक्रम ' लॅण्डर अलगदपणे चंद्राच्या जमिनीवर उतरले. १४ जुलै २०२३ रोजी सुरु झालेली ही भारताची चंद्रझेप २३ ऑगस्टला यशस्वीपणे समाप्त झाली. बंगळुरूच्या नियंत्रणकक्षात काहीशा तणावात असलेल्या इस्त्रोच्या वैज्ञानिकांचे चेहरे आनंदाने फुलून आले. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. काहींच्या डोळ्यातून आनंदाश्रू ...