उगवतीचे रंग गावोगावीचे दिलीपकुमार... नुकतेच ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचे दुःखद निधन झाले. दिलीपकुमार म्हणजे अभिनयाचा बादशहा. त्याचा पडद्यावरचा वावर म्हणजे जणू एका प्रसन्न, सुसंकृत आणि अभिजात अशा व्यक्तिमत्वाचा वावर. दिलीपकुमार याचा अभिनय कधी कंटाळवाणा झाला नाही. पूर्वी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन त्याचे काही चित्रपट पहिले. क्वचित टीव्हीवरही. पण असं कधी वाटलं नाही की आपण हा चित्रपट पाहण्यात वेळ वाया घालवला. त्याचे गाणे असो वा अभिनय. अगदी ' नैन लड गयी है...' पासून तर विधाता, क्रांती, कर्मा सगळ्या चित्रपटातील गाणी डोळ्यांसमोर येतात आणि उभा राहतो तो दिलीपकुमारचा अभिनय. तर असा हा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. पडद्यावर वावरणाऱ्या कलाकारांनाही पडद्याआड जावंच लागतं ही अटळ नियती आहे. मी लेखाचं शीर्षक दिलं आहे गावोगावचे दिलीपकुमार. आणि मी या मोहम्मद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार यांच्यावर का लिहितो आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तुमचं बरोबर आहे. पण काय करणार राहवलं नाही म्हणून काही वाक्य लिहिली. ज्या व्यक्तीने आपल्याला आनंदाचे काही क्षण दिले अशा व्यक्तीं...