उगवतीचे रंग
समर्थ रामदास : निसर्गाचे गायन करणारा महाकवी
महाराष्ट्र ही संतांची भूमी. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, एकनाथ आदी संतांनी समाजाला भक्तिमार्ग तर दाखवलाच पण त्यासोबतच निसर्ग सुद्धा आपल्या रचनेतून उलगडला. वागावे कसे, भक्ती कशी करावी हे सांगताना त्या सगळ्यांनी निसर्गातील प्राणी, पशु पक्षी, नद्या आदींची उदाहरणे देऊन समजावले.त्यांच्या काव्यात निसर्ग विविध रूपात प्रकट झाला आहे. त्यामुळे त्यांची शिकवण कधीच निरस, रटाळ किंवा कंटाळवाणी झाली नाही. आज आपण पर्यावरणाचा उद्गोष करतो, पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करतो. पण संतांना त्याचे महत्व कधीच उमगले होते.
समर्थ रामदासांचे जेथे जेथे वास्तव्य होते, त्या सगळ्या जागा निसर्गाच्या सान्निध्यातल्या होत्या. नाशिकचे गोदातीर, टाकळी येथे केलेले पुरश्चरण, कृष्णतिरीचे कार्य, सज्जनगड किंवा समर्थानी जेथे दासबोध लिहिला ते शिवथरघळ ही सगळी ठिकाणे अतिशय निसर्गरम्य होती. आपली तपसाधना करताना हा निसर्ग समर्थांच्या दृष्टीआड कधीच झाला नाही. त्यांनी स्वतःच्या वास्तव्याचे वर्णन ' दास डोंगरी राहतो ' असेच केले आहे. समर्थ रामदासांची कोणतीही रचना घ्या. दासबोध, आरत्या, मनाचे श्लोक किंवा आणखी कोणतीही रचना. तिच्यात भक्ती, उपदेश याबरोबरच काव्यामध्ये आढळणारे पदलालित्य, साधी सोपी नादमधुर रचना आपल्या दृष्टीस पडते. समर्थ उगीच अलंकारिक भाषा वापरत नाहीत. सहज आणि ओघवती भाषा. तिला आपोआप नाद, माधुर्य, रस, रंग, गंध प्राप्त होतो. शिवथरघळीचे वर्णन करताना ते म्हणतात
‘गिरीचे मस्तकी गंगा। तेथुनि चालली बळे
धबाबा लोटल्या धारा। धबाबा तोय आदळे।।’
समर्थांनी संपूर्ण भारत भ्रमण केले होते. आपल्या तीर्थयात्रेतून निसर्गाचे अवलोकन केले होते. फक्त निसर्गाचेच अवलोकन केले नाही तर विविध गावे , प्रांत तेथील लोकजीवन, चालीरीती आणि लोकांची असलेली त्यावेळची स्थिती याचेही अचूक निरीक्षण त्यांनी केले. त्यातूनच त्यांच्या पुढच्या कार्याची दिशा ठरवण्यास त्यांना मदत झाली. समर्थांना भारतभ्रमणातून, निरीक्षणातून आणि लोकांच्या बोलण्यातून वनस्पती, निसर्ग इ ची प्रचंड माहिती झाली होती. ती सगळी त्यांच्या विविध रचनांमधून आपल्याला प्रत्ययाला येते.
त्यांची आनंदवनभुवनी ही रचना तर माझी खूप आवडती. लता मंगेशकरांनी आपल्या मधुर स्वरात तिचे सौंदर्य अधिकच वाढवले आहे. त्या रचनेतील ' उदंड जाहले पाणी, स्नानसंध्या करावया ' या ओळी समर्थांना पाण्याची असलेली मुबलकता कशी प्रिय होती ते दाखवतात.पाण्यावरचे प्रेम रामदासांच्या वाङ्मयात अनेक ठिकाणी दिसून येते.
‘वळणें वांकाणें भोवरे। उकळ्या तरंग झरे।
लादा लाटा कातरे। ठाईं ठाईं।।
शुष्क जळाचे चळाळ । धारा धबाबे खळाळ ।
चिपळ्या चळक्या भळाळ। चपळ पाणी।।
फेण फुगे हेलावे। सैरावैरा उदक धावे।
थेंब फुई मोजावे। अणुरेणु किती।।
‘येक्यासंगे तें कडवट।
येक्यासंगें तें गुळचट।
येक्यासंगे ते तिखट। तुरट क्षार।।
ज्या ज्या पदार्थास मिळे।
तेथें तद्रूपचि मिसळे।
सखोल भूमीस तुंबळे। सखोलपणें।।
विषामधें विषचि होतें।
अमृतामधें मिळोन जाते।
सुगंधीं सुगंध तें। दरुगधीं दरुगध।।
गुणीं अवगुणीं मिळे।
ज्याचें त्यापरी निवळे।
त्या उदकाचा महिमा न कळे। उदकेंविण।।’ पाणी म्हणजे जीवन. पण समर्थ त्याही पुढे जाऊन सांगतात- झाडेझुडपे, वृक्षवेली आदींना जे काही गुणधर्म प्राप्त झाले आहेत, तेदेखील पाण्यामुळे.
‘नाना वल्लीमधें जीवन। नाना फळीं फुलीं जीवन।
नाना कंदीं मुळीं जीवन। गुणकारकें।।
नाना यक्षुदंडाचे रस। नाना फळांचे नाना रस।
नाना प्रकारीचे गोरस। मद पारा गुळत्र।।’
पावसाळ्यातील निसर्ग जसा आपल्याला प्रिय, तसा समर्थानाही होता. पावसाळ्यातील डोंगरांचे वर्णन करताना ते म्हणतात
पसरले सरले गिरि साजरे |सरवटे धुकटे भरिते भरे|
बहु वात झडांच झडाडितो | वर तरु वरताचि कडाडितो||
या रचनेतील अनुप्रास आणि नादमाधुर्य अप्रतिम आहे. पावसाळ्यात सुंदर दिसणाऱ्या पर्वतांना ते ' पसरले गिरी साजिरे ' असे सुंदर शब्द वापरतात. तर झाडातून जोरदार वाहणाऱ्या वाऱ्याचे वर्णन त्याच्या आवाजासहित ' बहू वात झडाच झडझडतो ' या शब्दात ते करतात. तर साधकाला उपदेश करताना ते सांगतात
पर्वती उदकापासी ! सन्निधचि एकीकडे !
फार एकांत सेवावा ! अभ्यास नित्यनूतनु !
सहावी सीतउष्णादी ! पहावी रम्य सी स्थळे !
वाटिका वृक्ष लावावे ! पुष्पे फळे परोपरी !
समर्थांनी बागेमध्ये कोणकोणती झाडे लावावी ते सांगितले आहे. त्यावरून त्यांचे झाडांविषयीचे ज्ञान आणि निसर्गप्रेम आपल्याला प्रत्ययाला येते. सांगितले आहे. ते सांगतात
प्रसंग निघाला स्वभावे | बागेमध्ये काय लावावे | म्हणून घेतली नावे | काही एक || अशी करून नंतर काही एक असे म्हणताना वृक्ष, महावृक्ष, फळझाडे, पालेभाज्या, तृण, वेली, कंदमुळे, फुलझाडे इत्यादी जवळपास तीनशे वनस्पतींची नावे समर्थांनी सहजपणे घेतली आहेत.
भोस बरू वाळा मोळा | ऊस कास देवनळा |वेत कळकी चिवारी | असे गवताचे प्रकार एकेका ओळीत सांगितले आहेत. तर भुईचाफे नागचाफे मोगरे | पारिजातक बटमोगरे | शंखासुर काळेमोगरे | सोन तरवड सोनफुले || अशी फुलांची ऩावे एका कडव्यात घेतली आहेत. तसेच साव सिसवे सिरस कुड | कोळ कुंभा धावडा मोड | काळकुडा भुता बोकडा| कुरंडी हिरंडी लोखंडी || अशी जंगली झाडांची नावे देखील त्यांत आहेत.
समर्थांच्या या निसर्ग ज्ञानाबद्दल सांगावे आणि लिहावे तेवढे कमी आहे. या एका छोट्याशा लेखात समर्थ वाङ्मयातील सर्वच निसर्गाचा उल्लेख किंवा वर्णन करता येणे शक्य नाही. पण बऱ्याचदा त्यांच्यासारख्या संतांनी दाखवलेल्या या निसर्गप्रेमाकडे आपले दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. म्हणून केवळ ते आपल्या नजरेत आणण्यासाठी हा आजचा लेखन प्रपंच . अर्थात सगळ्या संतांचा मूळ हेतू शेवटी आपल्या सगळ्यांना परमार्थ मार्गाला लावणे हाच आहे. पण निसर्ग आणि पर्यावरणाची जाणीव देखील करून द्यायला ते विसरत नाहीत.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा