उगवतीचे रंग मोल श्रीमद भागवताच्या दशम स्कंधात आणि श्रीकृष्ण धारावाहिक मध्ये एक सुंदर कथा येते. गावभर फळांचा टोपली घेऊन फिरणारी एक म्हातारी. डोक्यावर उन्हाचा तडाखा, अंगावर श्रमांचा थकवा, पण ओठांवर परमेश्वराचे नाम. तिच्याजवळ ताजी आणि गोड फळे असतात ते संपूर्ण गाव फिरते आणि जी जी व्यक्ती समोर दिसते त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळील फळे घेण्याचा आग्रह करते परंतु दुर्दैव असे की कोणीच तिच्या जवळील फळे घेत नाही. तरीही परमेश्वरावरील तिचा विश्वास ढळत नाही — " ही परमेश्वराचीच इच्छा असावी. कधीतरी तो माझं ओझं हलकं करेल." फिरता फिरता अखेर तिचे पाऊल अखेर कृष्णाच्या वाड्यासमोर थांबतं. तिथे फळ घ्या फळ म्हणून दोन-तीन वेळा आवाज देऊन ती विश्रांतीसाठी खाली बसते. योजना जणू ईश्वराचीच असावी. विश्रांती तिथेच मिळणार आणि श्रमही तेथेच हरण होणार. तिचा आवाज ऐकून निरागस गोड असा छोटा कृष्ण घरातून बाहेर येतो. ती कृष्णाला पाहून आनंदते. " बेटा, ताजी गोड फळं आहेत. घे ना. " कृष्ण म्हणतो, " ती सगळीच फळं मला दे. " म्हातारी आनंदली. म्हणाली, " हो हो देईन बाळा, पण मोल द्यावं लागेल....