मुख्य सामग्रीवर वगळा

सवय...

उगवतीचे रंग

सवय...

काय गंमत झाली बघा. नुकतेच घरात थोडे दुरुस्तीचे काम केलं. बाथरूमजवळ एक नवीन बेसिन बसवलं. आणि एक नवीन आरसा बसवला. त्याच्याजवळ उजव्या बाजूला एक प्लास्टिकचं कंटेनर होतं. त्यात कंगवे, टूथब्रश इ ठेवलेलं होत. नवीन आरसा थोडा मोठा असल्यामुळे ते प्लास्टिकचं कंटेनर जे उजव्या हाताला होतं, ते डाव्या बाजूला लावावं लागलं. ते लावून चारपाच दिवस झाले तरी ब्रश किंवा पेस्ट घ्यायला माझा हात जो नेहमी उजवीकडे जायचा, तो अजूनही बऱ्याचवेळा जातो. मग लक्षात येतं  की  अरे आपण त्याची जागा बदलली आहे. एकदा आपल्या हाताला किंवा अवयवाला जी सवय लागली ती अशी आपला पाठलाग करते. काही लोकांना कुलूप लावल्यानंतर पुन्हा ओढून पाहायची सवय असते. अशा काही गोष्टी नकळत केवळ सवयीमुळे घडत असतात.

जी वयासह येते ती स-वय. एकदा लागलेली सवय पुढे आयुष्यभर टिकून राहते. सकाळी उठल्याबरोबर काही लोकांना चहा हवा असतो. त्याशिवाय त्यांचा दिवस सुरु होत नाही. अर्थात माझाही त्यात समावेश आहे. पण मग एखादे दिवशी सकाळी लवकर चहा नाही मिळाला की लागलीच बेचैनी येते. काहींचे डोके दुखते. सवयीचा हा परिणाम आहे. सवयी चांगल्या असतात आणि वाईटही. काही काही सवयी तर प्रतिक्षिप्त क्रिया घडल्याप्रमाणे घडतात. त्यात मेंदूचा फारसा सहभाग नसतो. उदा गाडी चालवताना कोणी अचानक समोर आलं तर ब्रेक दाबणं, सवयीनं गिअर बदलणे इ गोष्टी सहज घडतात. त्यासाठी विचार करावा लागत नाही. हा सवयीचा परिणाम असतो. काही लोकांना ज्या वाईट सवयी लागलेल्या असतात, त्या प्रतिक्षिप्त क्रियांप्रमाणे घडतात. समोरच्या माणसाला एकदम तोडून बोलणे, क्षुल्लक गोष्टीवरून चिडून काहीतरी लागेल असे बोलणे. या गोष्टी घडून गेल्यावर करणाऱ्याला त्यांचा पश्चाताप होतो. पण नंतर काही उपयोग नसतो. त्याचा जो काही परिणाम व्हायचा असेल तो होऊन गेलेला असतो.

म्हणून तर लहान मुलांना लहानपणापासून चांगल्या सवयी लागाव्या यासाठीआपण प्रयत्नशील असतो. कारण एकदा लागलेली सवय पुढे जन्मभर टिकते. सवय हे तसे पाहिले तर माणसाला मिळालेलं वरदान आहे. कारण सवयीमुळेच आपण चांगली कौशल्ये शिकतो, नवीन गोष्टी शिकतो, आपले संरक्षण करायला शिकतो. चांगल्या सवयीमुळे माणूस घडतो. ' असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. ' हे असाध्य सवयीमुळे साध्य होऊ शकते. हे जसे चांगल्या सवयींबद्दल, तसेच वाईट सवयीचं आहे. चांगल्या सवयी आयुष्याला वळण लावतात, तर वाईट सवयी आयुष्य बरबाद करतात. दुर्योधनाला धर्म म्हणजे काय आणि अधर्म म्हणजे काय हे कळत होते. पण तो म्हणतो की धर्माप्रमाणे वागणे चांगले हे मला कळते, पण मी ते स्वीकारू शकत नाही. आणि अधर्माने वागणे हे चुकीचे आहे हेही मला कळते पण मी ते सोडू शकत नाही.

म्हणून जाणीवपूर्वक चांगल्या सवयी जोपासणे महत्वाचे आहे. चांगल्या सवयी अंगवळणी पडण्यासाठी वेळ लागतो, कष्ट पडतात. पण त्या हिताच्या असतात. वाईट सवयी लागायला वेळ लागत नाही. पण त्या व्यक्तीचे आणि समाजाचे सुद्धा नुकसान करतात. माणसाला चांगले काय आणि वाईट काय हे समजते. म्हणूनच चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. त्यावर आपले पुढचे आयुष्य अवलंबून असते. रोज सकाळी लवकर उठणे, फिरायला जाणे किंवा काही व्यायाम करणे, रोज एखाद्या चांगल्या ग्रंथाचे वाचन करणे, घरातील छोटीमोठी कामे करणे, आपला थोडा वेळ दुसऱ्यासाठी देणे या सारख्या सवयी आपल्याला जाणीवपूर्वक जोपासाव्या लागतील. पण त्या आपल्या आयुष्यात कायमस्वरूपी चांगला बदल घडवून आणतील.

जसे चांगल्या सवयी जोपासणे हे आपल्या हातात असते, तसेच काही वाईट सवयी  लागल्या असतील तर त्या सोडणे पण आपल्या हातात असते. फक्त त्यासाठी मनाचा निश्चय करावा लागतो. एकदा एक श्रीमंत सावकार होता. पण तो अतिशय कंजूष होता. थोडा दानधर्म करावा असे त्याला वाटत असे. पण त्याच्या हातून पैसा सुटत नव्हता. कोणाला द्यायची इच्छाच होत नव्हती. शेवटी तो एका साधुमहाराजांकडे गेला. त्यांना त्याने आपली व्यथा सांगितली. साधुमहाराजांनी त्याला दुसऱ्या  दिवशी येण्यास सांगितले. ते उन्हाळ्याचे दिवस होते. तरी साधू महाराज अंगावर एक गरम कांबळे ओढून बसले होते. ते घामाने डबडबले होते. तो सावकार आला तेव्हा त्याला हे पाहून आश्चर्य वाटले. तो म्हणाला, महाराज तुम्हाला बरे वाटत नाही का ? एवढ्या गर्मीत आपण कांबळे का घेतले आहे ? तेव्हा साधू महाराज म्हणाले की काय करू ? माझी पुष्कळ इच्छा आहे. पण त्या कांबळ्याने मला धरून ठेवले आहे. तेव्हा सावकार म्हणाला, असे कसे होईल महाराज ? कांबळे तुम्हाला कसे धरून ठेवेल ? ज्या क्षणी तुम्ही ठरवाल , त्या क्षणी तुम्ही कांबळे फेकून देऊ शकता.

हे ऐकल्यावर साधू महाराज म्हणाले, ' अगदी तसेच तू ज्या क्षणापासून मला द्यायचे आहे असे ठरवशील , त्या क्षणापासून तू देऊ शकशील. तुला कोणी रोखू शकणार नाही. ' फक्त चांगली गोष्ट करण्याचा आणि वाईट गोष्ट सोडण्याचा निश्चय करणे आधी आवश्यक आहे. आपण ठरवले तर अशा रीतीने आपल्या वाईट सवयीचा त्याग करू शकतो. ते आपल्याच हातात आहे.

©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
       ९४०३७४९९३२

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...