उगवतीचे रंग अदृश्य अस्त्रांचा धोका ( भाग एक ) युद्धाच्या कथा ऐकणे, वाचणे किंवा पाहणे सर्वांनाच आवडते. युद्धस्य वार्ता रम्य : असे म्हटले जाते. परंतु सध्या होत असलेल्या आणि भविष्य काळात होऊ शकणाऱ्या युद्धांचे स्वरूप जर आपण लक्षात घेतले तर युद्धस्य वार्ता न रम्य: असे आपल्याला म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असते असेही म्हटले जाते परंतु जगातील निरनिराळे देश ज्या पद्धतीने युद्धाची तयारी करीत आहेत ती पाहिल्यानंतर सर्व काही क्षम्य नाही असेच आपल्याला म्हणावे लागेल. कारण नीती आणि अनितीच्या कल्पना गुंडाळून ठेवल्या जात आहेत, मानवी मूल्यांना तिलांजली दिली जात आहे. आजच्या काळात रशिया युक्रेन, इस्रायल हमास, ऑपरेशन सिंदूर यासारखी युद्धे सुरू असलेली आपण पाहत आहोत. केवळ काही मिनिटात किंवा सेकंदात भयंकर विनाश घडवून आणणारी आधुनिक अस्त्रे विज्ञानाने माणसाच्या हाती दिली आहेत. युद्धे आता काही पारंपारिक पद्धतीनेच फक्त लढली जाणार नाहीत तर त्यामागे आधुनिक टेक्नोलॉजी पण असेल जसं की रोबोटिक सैनिक, ड्रोन्स, रोबोटिक प्राणी आणि युद्धाची साधने इ. पण त्याच बरोबर जो देश हेरग...