उगवतीचे रंग एक नवी सकाळ तुमची वाट पहात आहे २०२३ चा आज शेवटचा दिवस आणि उद्याची सकाळ असणार आहे नवीन वर्षाची. सकाळ असेल रोजच्यासारखीच ! पण आठवड्याची सुरुवात ज्या वाराने होते, तो सोमवार म्हणजे आठवड्याचा पहिला दिवस असेल आणि २०२४ ची नवीन कोरी करकरीत सकाळ आपल्या स्वागतासाठी सज्ज असेल. या प्रसंगी मला कविवर्य भा. रा. तांबे यांची ' मावळत्या दिनकरा ' ही कविता आठवते आहे. उगवत्या सूर्याला वंदन करणारे आणि मावळत्या सूर्याकडे पाठ फिरवणारे हे जग ! पण ज्या मावळत्या सूर्याने मला आजचा दिवस दिला, त्याच्याबद्दल मी कृतज्ञ राहायला नको का ? माझा उद्या हा आजच्या पायावरच उभा असणार आहे. कविवर्य तांबे जसे मावळत्या दिनकराला वंदन करतात, तसे मीही मावळत्या वर्षाला करतो. कारण २०२३ च्या पायावरच २०२४ उभे असणार आहे. २०२३ ने मला आणि तुम्हाला खूप काही दिले आहे. आर्थिक वर्ष संपत आलं की बँका, वित्तीय संस्था, करसल्लागार त्या त्या वर्षाचा हिशेब मांडतात. जमा बाजू, खर्चाची बाजू, हातात राहिलेली शिल्लक वगैरे. त्या आर्थिक वर्षात निव्वळ नफा किती झाला याचाही हिशेब केला जातो. तसंच आपल्या आयुष्यातलं जाणारं...