उगवतीचे रंग विश्वास देशपांडे, चाळीसगाव भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग वीस हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर सरदार पटेलांनी राजस्थानातील विविध राज्यांचे एकीकरण घडवून आणले. या राजपुताना म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजस्थानचा प्रदेश विशाल होता. या प्रदेशात बहुतांशी रजपूत राजांची राज्ये होती. हे राजे शूर आणि परंपरांचा अभिमान असणारे होते. पण त्यांच्यात आपापसात भांडणे, हेवेदावे असल्यामुळे ही राज्ये जणू एकमेकांची शत्रू असल्यासारखी वागत होती. ही एकूण एकोणीस राज्ये होती. त्यांच्या एकीकरणासाठी सुमारे साडेआठ वर्षांचा कालावधी लागला. या एकीकरणाची प्रक्रिया १८ मार्च १९४८ रोजी सुरु झाली आणि एक नोव्हेंबर १९५६ ला पूर्ण झाली. १५ ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात सामील न होता स्वतंत्र राहण्याची या राजांची इच्छा होती. त्याचे कारणही साहजिकच होते. एखाद्या मोठ्या राज्यात आपले राज्य विलीन करणे म्हणजे आपली स्वायत्तता गमावणे हा त्याचा अर्थ होता. आपली परंपरागत सत्ता गमावण्याची या राजांची तयारी नव्हती. राजस्थानातील या राज्यांमध्ये जयपूर, ...