मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मनाचे श्लोक भाग ६१

उगवतीचे रंग  मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ६१ उभा कल्प वृक्षातळी दुःख वाहे | तया अंतरी सर्वदा ते चि आहे | जनी सज्जनी वाद हा वाढवावा | पुढे मागुता शोक जीवी धरावा |६१| अर्थ  एखादा माणूस कल्पवृक्षाच्या खाली उभा आहे परंतु त्याच्या मनात जर दुःखाची किंवा दुःख देणाऱ्या इच्छांचीच कामना असेल तर त्याला आयुष्यभर दुःखच भोगावे लागेल.  त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती संतांकडे गेली आणि त्यांच्याशी निरर्थक वाद घालू लागली तर त्यालाही आयुष्यभर दुःखालाच सामोरे जावे लागेल. ( वाहे- सुरू राहील,  सज्जन- साधू पुरुष,  वाद- निरर्थक चर्चा ) विवेचन  आधीच्या श्लोकात श्रीराम किंवा भगवंत म्हणजे कल्पतरू आहे असे समर्थांनी सांगितले. परंतु असा कल्पतरू किंवा कल्पवृक्ष आपल्याजवळ असताना त्याच्या छायेत उभे राहून दुःखाची किंवा दुःख देणाऱ्या गोष्टींची कामना करीत राहिलो तर आपल्या वाट्याला दुःख येईल आणि आयुष्यभर ते दुःखच सुरू राहील. काही माणसांचा स्वभावाच असा असतो की ते आपल्या विचारांनी स्वतःलाच दुःखी करून घेतात. चेहऱ्यावर कायमच बारा वाजलेले असतात. माझ्याच वाट्याला हे दुःख का ? मी फार कमनशिबी आहे. मला ...

मनाचे श्लोक भाग ६०

उगवतीचे रंग  मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ६० मना राम कल्पतरू कामधेनू | निधी सार चिंतामणी काय वानू| जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता| तया साम्यता कायसी कोण आता |६०| अर्थ  हे मना राम म्हणजे भगवंत कल्पतरू, कामधेनू आहेत. ते निधी, सार, चिंतामणी... सारे सारे काही आहेत. हे सगळे शब्द त्यांचे वर्णन करण्यासाठी कमी पडतात म्हणून समर्थ म्हणतात की त्यांचे कसे आणि काय वर्णन करू ? त्यांच्याच योगाने आणि सत्तेने सर्व काही घडत आहे. त्यांची तुलना किंवा साम्य कशाशी दाखवता येईल ? ( चिंतामणी - इच्छिलेली वस्तू देणारा, वानू - वर्णन करू ) विवेचन  या श्लोकात समर्थ श्रीरामांच्या भक्तीची महती आपल्याला सांगतात. श्रीरामांबद्दल बोलताना त्यांनी वेगवेगळी विशेषणे वापरली आहेत. श्रीराम कामधेनू, कल्पतरू, निधी सार, चिंतामणी सारे सारे काही आहेत असे समर्थ म्हणतात. या एकेक शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेऊया. कल्पतरू म्हणजे इच्छिलेले सर्व काही देणारा एक वृक्ष. त्याच्या छायेत बसून जी कल्पना करावी ते सर्व आपल्याला प्राप्त होते.  कामधेनू  म्हणजे इच्छिलेले सर्व काही देणारी दिव्य गोमाता. निधी म्हणजे कुबेराचे भांडार ...

मनाचे श्लोक भाग ५९

उगवतीचे रंग  मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग  ५९ मना कल्पना कल्पिता कल्पकोटी | नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी | मनी कामना राम नाही जयाला | अति आदरे प्रीति नाही तयाला ||५९|| अर्थ  हे मना, नाना प्रकारच्या अनंत कल्पना तू करीत राहिलास तर भगवंताचे दर्शन कदापिही शक्य नाही. ज्याच्या अंतरात वासना असतील,  त्याच्या मनामध्ये भगवंताविषयीची कामना निर्माण होणे शक्य नाही आणि भगवंताविषयी कामना नसेल तर त्याच्यावर आदरयुक्त प्रेम कसे राहील ? ( कल्पिता - कल्पना करणे,  कल्पकोटी - अनंत/ नाना प्रकारच्या ) विवेचन  आपल्या जीवनात कल्पनेचे देखील काही एक विशिष्ट स्थान आहे. आपल्या मनातील कल्पना चांगल्या आणि विधायक असतील तर व्यवहारात त्या प्रत्यक्षात येऊ शकतात,  त्यांचा उपयोग होतो. परंतु त्या कल्पनांना जर योग्य दिशा नसेल आणि त्या विधायक नसतील तर त्या जीवनाचा नाश करू शकतात. सदैव कल्पनेच्या राज्यात रमणारा माणूस व्यवहारात अयशस्वी होतो. त्याला धड प्रपंचही जमत नाही आणि धड परमार्थही तो करू शकत नाही. अशी अनेक उदाहरणे आपण आपल्या अवतीभवती नेहमी पाहतो.  समर्थांनी दासबोधात सांगितले आहे की...

मनाचे श्लोक भाग ५८

उगवतीचे रंग  मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग  ५८ नको वासना वीषई वृत्तिरुपें।  पदार्थी जडे कामना पूर्वपापें | सदा राम निष्काम चिंतीत जावा।  मना कल्पनालेश तोहि नसावा॥५८॥ अर्थ  हे मना, भौतिक विषयांमध्ये वृत्तीरूपाने वासनांमध्ये अडकू नकोस. पूर्व पापांमुळेच आपले मन विषय वासनांमध्ये अडकते. म्हणून भगवंताचे  नेहमी निष्काम भावाने चिंतन कर आणि मनामध्ये कल्पनेचा लवलेशही ठेवू नकोस. ( पदार्थी- दृश्य/बाह्य  विषयांमध्ये, निष्काम- कोणतीही इच्छा न ठेवता,  कल्पना-सुखाच्या गोष्टींचे मनोरे रचणे, लेश- मागमूस ) विवेचन  ५७ ते ६० या श्लोकांमध्ये समर्थ आपल्याला विषयवासनेचा त्याग करण्याबद्दल सांगत आहेत. वासनेच्या पोटी जन्म घ्यावा लागतो हे आपण मागील श्लोकांमध्ये पाहिले आहे. या श्लोकात म्हणूनच समर्थ आपल्याला सांगतात की विषयांमध्ये वृत्ती रूपाने आपली वासना अडकता कामा नये. या दृश्य किंवा भौतिक जगात आपण ज्या ज्या गोष्टी पाहतो, त्यामध्ये आपले मन अडकते. ही सवय पूर्वपापामुळे लागते असे समर्थ  सांगतात. हे पूर्वपाप म्हणजे पूर्व संचित संस्कार असे म्हणता येईल. हे संस्कार किंव...

मनाचे श्लोक भाग ५७

उगवतीचे रंग  मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग  ५७ जगीं होइजे धन्य या रामनामे । क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमे ॥ उदासीनता तत्त्वता सार आहे । सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥ ५७ ॥  अर्थ : भक्ताने सतत रामनाम घेऊन या जगात धन्य व्हावे. नुसते नामस्मरण करण्यापेक्षा क्रिया म्हणजे कृतीने, भक्तीने सातत्याने उपासना करावी. मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका न येऊ देता, उदासीनपणे (म्हणजे आजूबाजूच्या घटनांचा मनावर परिणाम न होऊ देता ) मोकळ्या मनाने रामनामाची उपासना करावी आणि या जगात भक्त म्हणून धन्य व्हावे.  विवेचन या आधीच्या दहा श्लोकांमध्ये समर्थांनी आदर्श भक्त कसा असावा, त्याची लक्षणे सांगितली आणि त्यावरून साधकांना देखील आपण कसे असावे याचा बोध होतो. पण त्या मार्गाने जायचे कसे किंवा त्यासाठी काय करायचे याचा उपाय ते या श्लोकात आपल्याला सांगत आहेत.  आधीचे श्लोक वाचून जर आपल्याला समर्थ म्हणतात त्याप्रमाणे सर्वोत्तम भक्त व्हावेसे वाटले तर समर्थांचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल. परंतु असे भक्त होण्यासाठी संस्कारांची आणि प्रयत्नांची गरज असते. लहानपणापासूनच संस्काराचे महत्त्व असते....

मनाचे श्लोक भाग ५६

उगवतीचे रंग  मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग  ५६ दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू | स्नेहाळू कृपाळू, जनी दास पाळू | तया अंतरी क्रोध संताप कैचा | जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा | ५६| अर्थ : जो अनाथ आणि दुःखितांवर प्रेम करतो, जो मनाने अत्यंत मृदू आहे, प्रेमळ आणि सर्वांवर कृपेचा वर्षाव करणारा आहे, तसेच शरणागताला आश्रय देणारा आहे आणि ज्याच्या अंतरात राग किंवा संताप यांना त्रास नाही, असा परमेश्वराचा भक्त जगामध्ये खरोखरच धन्य होय. ( मवाळ - मृदू, स्नेहाळ - प्रेमळ, दासपाळू - शरणागताला आश्रय देणारा, संताप -त्रास )  विवेचन हा श्लोक "जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा" या पालुपद-मालिकेचा सुंदर समारोप आहे.  हा श्लोक वाचताना एक विशिष्ट लय आपोआपच प्राप्त होते.' ळ 'ची पुनरावृत्ती याला एक वेगळेच सौंदर्य देते. परंतु हे केवळ भाषिक दृष्टीने जरी असले तरी अर्थाच्या दृष्टीने देखील हा श्लोक तेवढाच सुंदर आहे. जो भक्त भगवंताचा होऊन राहिला आहे, त्याच्यामध्ये काही गुणांचा परिपोष आपोआपच होत असतो. अशा भक्ताच्या अंगी कोणते गुण असतात ते समर्थांनी या श्लोकात सांगितले आहे.  संत हे भगवंताचे श्रेष्ठ भक्त असतात ...

मनाचे श्लोक भाग ५५

उगवतीचे रंग  मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग  ५५ नसे मानसीं नष्ट आशा दुराशा।  वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा॥  ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५५॥ अर्थ: ज्याच्या मनातील दुष्ट वासना आणि वाईट विचार नाहीसे झाले आहेत, भगवंताला आपल्या प्रेमपाशात बांधण्याची उत्कट इच्छा ज्याच्या मनामध्ये तीव्रतेने आहे आणि ज्याच्या प्रेमामुळे आणि शरणागत वृत्तीमुळे स्वतः भगवंत त्याचा ऋणी झाला आहे, असा भक्त भगवंताचा जगातील सर्वात उत्कृष्ट किंवा धन्य भक्त आहे.  ( नष्ट -त्याज्य/वाईट,  दुराशा - दुष्ट वासना वासना /इच्छा, प्रेमपाश- प्रेमाने बांधून ठेवणे, पिपाशा - तृष्णा /तहान ) विवेचन  भगवद भक्तीत जो रंगून गेला आहे, तो मनाने अंतर्बाह्य निर्मळ असतो. आत एक आणि बाहेर एक असे त्याच्याजवळ असत नाही. वासना, विकार आणि दुष्टभावना यांना त्याच्या मनात थारा नसतो. किंबहुना ह्या गोष्टी त्याला सहनच होत नाहीत. जसे आपल्याला शुभ्र वस्त्रावर एखादाही डाग चालत नाही, त्याप्रमाणे त्याचे मन शुभ्र वस्त्रासारखे आणि पारदर्शक असते. अशा भक्त विषयी बोलताना तुकाराम महाराज म्हणतात, " जैसी गंगा ...

मनाचे श्लोक भाग ५४

  उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ५४ सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी | मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी | चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा | जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा | ५४| अर्थ : जो भक्त तरुणपणी एकांतात राहून आपला काळ घालवतो, कल्पनेच्या राज्यात जो रमत नाही, ज्याची भगवंतावरील श्रद्धा अढळ असते, असा भक्त खरोखरच त्या सर्वोत्तम असलेल्या भगवंताचा जगामध्ये धन्य असलेला दास आहे. ( सेवि - काळ घालवणे, आरण्य - एकांतवास, मिळेना - मिसळत नाही, मेळी - समूह, चळणे - परावृत्त होणे ) विवेचन  ज्या व्यक्तीला भगवंताची ओढ लागलेली अशी व्यक्ती तरुणपणातच एकांतात राहून त्याचे ध्यान किंवा नामस्मरण करणे पसंत करते. इथे समर्थांनी अरण्य हा शब्द जरी वापरलेला असला तरी प्रत्यक्षात अरण्यातच जाऊन राहिले पाहिजे असा त्याचा अर्थ नाही तर भगवंत प्राप्तीसाठी एकांतात जाऊन तपश्चर्या करणे आवश्यक आहे हा त्याचा अर्थ घेता येतो. आजच्या काळात ही गोष्ट थोडीशी विचित्र वाटेल. तरुणपणातच कसे काय एकांतात राहायचे आणि भगवंताचे ध्यान करायचे? ती तर म्हातारपणी करण्याची गोष्ट आहे अशी आपली समजूत असते. पण साधना ही पुढे ढकलण्याची गोष्ट नव्हे...

अक्षय फळ देणारी अक्षय तृतीया

उगवतीचे रंग  अक्षय फळ देणारी अक्षय तृतीया  वैशाखाच रणरणतं ऊन अंगाची काहिली करीत आहे. माणसे, पशुपक्षी झाडांचा आश्रय घेत आहेत. झाडांच्या सावल्या आखूड होतात. रस्त्यावर डांबर अगदी वितळायला लागते. पण याच वैशाखात असा एक दिवस येतो जो या उन्हाळ्यालाही शीतल करून टाकतो. तो दिवस म्हणजे वैशाख शुद्ध तृतीया – अक्षय तृतीया ! अक्षय म्हणजे कधीही न संपणारे, कधीही न झिजणारे. या दिवसाच्या नावातच त्याचे सार आहे. भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला या दिवसाचे महत्त्व सांगताना म्हटले होते, "या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय होते." म्हणजेच या दिवशी केलेल्या प्रत्येक सत्कर्माचे फळ अनंतकाळ टिकते. असा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त मानला जातो.  या दिवशी कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर ती फलदायी होते. अनेक अर्थांनी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवसाची महती केवढी आहे पाहा! याच दिवशी कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले. याच दिवशी भगवान विष्णूंनी परशुरामांचा अवतार धारण केला म्हणून या दिवशी परशुराम जयंत...

मनाचे श्लोक भाग ५३

  उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ५३ सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी । सदा सर्वदा सत्यवादी विवेकी | न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा | जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||५३|| अर्थ : नेहमी नम्रतेने बोलणारा आणि आपल्या मधुर वाणीने लोकांना आपलेसे करणारा, सत्यवचनी आणि विवेकी असणारा, त्याचप्रमाणे कधीही वायफळ आणि असत्य न बोलणारा असा जो परमेश्वराचा भक्त असतो तो जगामध्ये खरोखरच धन्य होय. ( आर्जवी - नम्र, मिथ्य वाचा - खोटे बोलणे, त्रिवाचा - त्रिवार /निश्चित / ठामपणे. परंतु येथे बोलण्यात एकवाक्यता नसलेला असा अर्थ घेता येतो ) विवेचन   भक्ताने कसे असावे ते या श्लोकातही समर्थ सांगत आहेत. त्याचे बोलणे आर्जवी असते. आर्जवी म्हणजे नम्र. आर्जवी म्हणजे लाचार नव्हे. ज्याला (ईश्वराचे) ज्ञान झाले आहे असा भक्त आपोआपच नम्र होतो. फळांनी लगडलेले झाड जसे झुकलेले दिसते त्याप्रमाणे खरा ज्ञानी, विद्वान आणि भगवंताचा भक्त नम्र असतो. ही नम्रता त्याला कोठून उसनी आणावी लागत नाही. ती त्याच्या आतूनच उत्स्फूर्तपणे येते.   समर्थांना मधुर बोलणे अतिशय प्रिय आहे. दासबोधामध्ये ते म्हणतात,  पेरिले...

मनाचे श्लोक भाग ५२

उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ५२    क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे।  न लिंपे कदा दंभ वादे विवादे॥  करी सुखसंवाद जो उगमाचा।  जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५२॥ अर्थ : खरा भक्त तत्वचिंतनात वेळ घालवतो. अहंकार, दंभ आणि वादविवादात तो वेळ घालवत नाही किंवा त्यात गुंतून पडत नाही. तो उगमाचे म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाचे चिंतन करून स्वतःशी किंवा इतरांशी सुख संवाद साधतो असा भक्त परमेश्वराचा खरोखरच धन्य असा भक्त होय. ( क्रमी - वेळ घालवतो, तत्त्वचिंतन  - परमात्मस्वरूपाचे चिंतन, अनुवाद - आचरण /अनुकरण, लिंपे - लिप्त होत नाही किंवा दोष लावून घेत नाही, दंभवाद - फसवा युक्तिवाद, विवाद - निष्फळ वाद, उगम - मूळ स्वरूप ) विवेचन   खरा भक्त आपला वेळ कसा घालवतो हे समर्थ पहिल्या आणि तिसऱ्या ओळीत सांगतात तर भक्ताने कसे असू नये हे दुसऱ्या ओळीत त्यांनी सांगितले आहे. क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे...  साधकाचे अंतिम ध्येय परमेश्वराला प्राप्त करून घेणे हे असते एकदा त्याने ही गोष्ट आपल्या मनाशी निश्चित केली की मग त्याचे चिंतन करण्यातच तो आपला वेळ घालवतो. त्याव्यतिरि...

मनाचे श्लोक भाग ५१

उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ५१ मदें मछरे सांडिला स्वार्थबुद्धी| प्रपंचिक नाही जयाते उपाधि| सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा| जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा|५१| अर्थ : जो अहंकार आणि द्वेषरहित आहे, ज्याने स्वार्थ बुद्धीचा त्याग केला आहे, जो संसारात राहूनही विरक्त वृत्तीने वागतो, नेहमी नम्र आणि मधुर वाणीनेच बोलतो, असा मनुष्य सर्वोत्तम अशा भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय. ( मद - अहंकार, मछरे -मत्सर/द्वेष, सांडिला - सोडून दिले आहे, स्वार्थ बुद्धी - केवळ स्वतःचा फायदा पाहणे, उपाधि - बाह्य पाश /बंधन, सुवाचा - गोड /मधुर बोलणे )  विवेचन हा फार सुंदर आणि अर्थपूर्ण असा श्लोक आहे. खऱ्या भक्ताची लक्षणे आपल्याला समर्थ या ठिकाणी सांगत आहेत. खरा भक्त अहंकार आणि द्वेष रहित असतो. त्याने स्वार्थ बुद्धीचा त्याग केलेला असतो. काही ठिकाणी या श्लोकामध्ये पाठभेद आढळतात. काही पुस्तकांमध्ये  सांडली असा शब्द आहे तर काही पुस्तकांमध्ये सांडिला असे म्हटले आहे. या शब्दांमुळे अर्थामध्ये जरा फरक पडतो. ज्या पुस्तकामध्ये मदे मत्सरे सांडीली स्वार्थ बुद्धी असे म्हटले आहे, तिथे सांडली म्हणजे त्याग केला या...

मनाचे श्लोक भाग ५०

उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ५० नसे अंतरी कामकारी विकारी | उदासीन जो तापसी ब्रह्मचारी| निवाला मने लेश नाही तमाचा| जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा |५०| अर्थ : ज्याच्या मनामध्ये कामवासनेसारख्या निरनिराळ्या प्रकारच्या विकार उत्पन्न करणाऱ्या वासना उत्पन्न होत नाहीत, जो वृत्तीने विरक्त असून ब्रह्मचारी राहून तपस्या करतो, ज्याच्या मनात क्रोधाचा लवलेशही उरत नाही, ज्याचे मन अत्यंत शांत आणि क्रोधरहित असते असा मनुष्य त्या सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय. (कामकारी - कामवासना, विकारी - विकृती/अशांती निर्माण करणारा, उदासीन - तटस्थ/निर्विकार, निवाला - शांत/तृप्त, लेश - अंश, तम - अंधार /अज्ञान/ मोह/ अविचार ) विवेचन  मागील काही श्लोकांपासून समर्थ आपल्याला खऱ्या भक्ताची लक्षणे सांगत आहेत. एकेक श्लोक वाचून त्याचा अर्थ लक्षात घेतला की आपणही मानसिकदृष्ट्या खऱ्या अर्थाने समृद्ध होत जातो. आपण जर साधक असू, तर आपण कसे असायला हवे हे यातून कळते.  कामवासना ही माणसाच्या मनातील इतर वासनांपेक्षाही अधिक बलवान असलेली वासना असते. ती अनेक विकार म्हणजेच विकृती उत्पन्न करते. जेव्हा कामवासन...

लाल छटा विरताना…

 उगवतीचे रंग  लाल छटा विरताना… पहाट उगवते तेव्हा ती केवळ प्रकाश घेऊन येत नाही; ती एक जाणीव घेऊन येते. ती सांगते की अंधार कायमचा नसतो. काळोख कितीही दाट असला तरी त्याच्या कडांना सोनेरी किनार लागू लागतेच. आज भारताच्या ‘रेड कॉरिडॉर’मध्ये अशीच एक पहाट आकार घेताना दिसते हळूहळू, पण निश्चयाने. गडचिरोलीच्या घनदाट जंगलातील एका चिमुकल्या पाड्यावर त्या दिवशी काहीतरी वेगळं घडत होतं. जिथे कधी संध्याकाळ झाली की भीतीचा पडदा पसरायचा, तिथे एका पडक्या शाळेच्या छतावर तिरंगा डौलाने फडकत होता. एका म्हाताऱ्या आदिवासी आजीने आपल्या नातवाचा हात धरला होता. त्या मुलाच्या हातात बंदूक नव्हती, तर ‘अक्षरओळख’ करून देणारी पाटी होती. तिच्या डोळ्यांतलं पाणी दहशतीचं नव्हतं; ते होतं नव्या भविष्याचं समाधान. कधीकाळी पश्चिम बंगाल ते आंध्र प्रदेश असा पसरलेला ‘लाल पट्टा’ हा केवळ भौगोलिक नव्हता; तो उपेक्षेचा, असंतोषाचा आणि हिंसेच्या चक्रव्यूहाचा पट्टा होता. झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, गडचिरोली या भागांत अनेक वर्षे विकासाची पावले पोहोचली नाहीत. परिणामी, स्थानिक समाजात अविश्वास आणि असुरक्षिततेची भावना वाढत गेली आणि त्याचा फा...

मनाचे श्लोक भाग ४९

  उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ४९ सदा बोलिल्यासारीखे चालताहे| अनेकी सदा एक देवासी पाहे| सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा| जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा|४९| अर्थ : जो बोलण्याप्रमाणे वागतो, परमेश्वराची जरी अनेक रूपे असली तरी तो एकच आहे या दृष्टीने त्याच्याकडे पाहतो, सगुण परमेश्वराची उपासना करताना त्याच्या मनामध्ये कोणतीही शंका असत नाही असा भक्त त्या सर्वोत्तमाचा श्रेष्ठ भक्त असतो. विवेचन  खऱ्या भक्ताची फार सुंदर लक्षणे समर्थांनी या ठिकाणी सांगितली आहेत. परमेश्वराचा प्रिय भक्त होणे ही सोपी गोष्ट नाही. जशी रोगातून बरे होण्यासाठी अनेक पथ्ये पाळावी लागतात, तशीच पथ्ये भक्ताला देखील पाळावी लागतात. आपले संत म्हणजे "बोले तैसा चाले" या तुकोबांच्या उक्तीचे मूर्तिमंत उदाहरण होत.  व्यवहारामध्ये आपण बऱ्याच वेळा खोटे बोलत असतो. बऱ्याच व्यक्ती बोलतात एक आणि करतात दुसरे ! अशा व्यक्ती दुसऱ्याला उपदेश करण्यात आघाडीवर असतात. परंतु स्वतःवर वेळ आली की त्यांचे वागणे वेगळे असते. आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये घाला असे सांगणाऱ्या बऱ्याच व्यक्तींची मुले इंग्रजी माध्यमातून शिक्ष...

मनाचे श्लोक भाग ४८

  उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ४८ सदा देवकाजी झीजे देह ज्याचा | सदा रामनामे वदे नित्य वाचा | स्वधर्मेचीं चाले सदा उत्तमाचा| जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा|४८| अर्थ : जो भक्त केवळ परमेश्वराच्या कार्यासाठीच आपला देह झिजवतो, ज्याच्या मुखात अखंड रामनाम आहे आणि स्वधर्माच्या म्हणजे आपल्या कर्तव्याच्या मार्गावर जो उत्तम रीतीने वाटचाल करतो तो भक्त म्हणजे सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय. विवेचन  देवकाज म्हणजे देवाचे कार्य. खरा भक्त नित्य परमेश्वराचेच काम करीत असतो. तो दोन प्रकारे कार्य करतो. स्वतः परमेश्वराचे नामस्मरण तर करतोच परंतु इतरांनाही परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाने वळवतो. सगळ्या संतांनी हेच परमेश्वराचे कार्य केले आहे. स्वतः नाम घेता घेता त्यांनी इतरांनाही नामाला लावले आहे. मग असा भक्त कोणतेही काम करीत असेल तर ते भगवंताचेच कार्य असते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी आपल्या आयुष्यात अखंड रामनाम घेतले परंतु ही करीत असताना त्यांनी हजारो भक्तांना रामनामाची गोडी लावली. स्वतः समर्थ रामदास यांनी रामनामाचे आणि गायत्री मंत्राचे अखंड पुरश्चरण केले. स्वतः अकरा मा...