उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर वारसा आणि कार्य - भाग २५ रवींद्रनाथांच्या आणखी काही कादंबऱ्या १९१६ मध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या दोन कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या त्यापैकी एक होती 'घरे बाहिरे 'आणि दुसरी होती ' चतुरंग.' ' चतुरंग ' ही एक सामाजिक कादंबरी आहे. या कादंबरीत नावाप्रमाणेच चार व्यक्तींच्या स्वभावाचे चार रंग रवींद्रनाथांनी दाखवले आहेत. या चारही व्यक्ती म्हणजे गावोगावी फिरणारे आणि कीर्तन करून समाज प्रबोधन करणारे कीर्तनकार आहेत. जेव्हा व्यक्तीच्या जीवनात संघर्ष सुरू होतो तेव्हा मानसिक संतुलन राखण्यासाठी व्यक्ती जी प्रयत्नांची पराकाष्ठा करते, त्याचे सूक्ष्म चित्रण या कादंबरीत रवींद्रनाथांनी केले आहे. त्यातून त्यांचा मानवी स्वभावाचा सूक्ष्म अभ्यास दिसून येतो. रवींद्रनाथांच्या कादंबऱ्यांमध्ये ' गोरा 'या कादंबरीचा अपवाद वगळला तर अनेक साहित्य रसिकांना त्यांची ' चतुरंग ' ही कादंबरी खूप भावते. त्यांच्या ' घरे बाहिरे ' या कादंबरीला बंगालच्या फाळणीची पार्श्वभूमी आहे. या कादंबरीत निखिल, संदीप आणि विमला अशी तीनच पात्रे आहेत. त्यांच्या आत्मनिवेदनात...