उगवतीचे रंग
नजर...
लहानपणीची एक गोष्ट आठवते. आम्ही कुठून बाहेरून खेळून वगैरे आलो की आई किंवा आजी आमच्या चेहऱ्याकडे बघायची. चेहरा चांगला आनंदी वाटला तर काही प्रश्न नसायचा. पण जर चेहरा म्लान झालेला किंवा कोमेजलेला असला तर त्यांना विशेष काळजी वाटायची. त्यातच कधी कधी अंगात कणकण असली किंवा थोडे अंग गरम वाटले तर आई म्हणायची ' कुणाची तरी दृष्ट लागली किंवा नजर लागली माझ्या राजाला. ' आणि मग म्हणायची ' थांब तुझी नजर काढते. ' आणि मग अंगावरून मीठ मोहऱ्या उतरवून काही तरी म्हणायची. मला नीटसं आठवत नाही आता. पण ' मीठ मोहऱ्या पाटीभर गवऱ्या, राम लक्ष्मणा तुझीच दाही, सीता जानकी तुझी दाही ' असं काहीसं म्हणायची. दोन्ही हातातील मुठीत मीठ मोहऱ्या घेऊन ती गरम तव्यावर किंवा लोखंडाच्या गरम पळीवर टाकायची. मग त्या मीठ मोहऱ्या चांगल्या तडतडल्या की म्हणायची, बघ खरंच दृष्ट लागली होती माझ्या राजाला. आता गेली बरं का. आता तुला बरं वाटेल.
कदाचित हा अंधश्रद्धेचा भाग असेल, मनाचे समाधान असेल आईच्या , आजीच्या आणि त्या काळात आपल्या बालगोपाळांवर प्रेम करणाऱ्या सगळ्या माताभगिनीच्या. त्यात शास्त्रीय दृष्ट्या फारसे तथ्य नसेलही म्हणजे नाहीच. पण तो एक मोठ्या मानसिक श्रद्धेचा भाग होता. ज्यामुळे एक आधार वाटायचा . ' इडा पीडा टळली ' असे वाटायचे. खरं म्हणजे आपले मन बळकट असलं तर अशी कुठली बाधा किंवा नजर आपलं काही वाकडं करू शकत नाही. जो परमेश्वर सगळ्यांचं रक्षण करतो, तो आपलंही रक्षण करतोच.
पण तरीही काही व्यक्तींची नजर चांगली नसते असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्यात काही तरी तथ्य निश्चित असते. त्यांची नजर चांगली नसते, याचा दुसरा अर्थ त्यांचा बघण्याचा हेतू चांगला नसतो, निर्मळ नसतो हा आहे. आपल्याला जसे डोळे असतात, तसे त्यांनाही असतात. आपण पाहतो, तसेच तेही पाहतात. मग फरक कशाने पडतो ? तर त्यांच्या नजरेतला भाव चांगला नसतो. तो भाव पाहणाऱ्याला लगेच कळतो. आईची प्रेमळ नजर, एखाद्या सत्पुरुषाची शांत आणि आश्वासक नजर, एखाद्या लोभी किंवा अधाशी माणसाची नजर लगेच ओळखू येते. स्त्रिया तर समोरच्या व्यक्तीची नजर लगेच ओळखतात. एखादी अनोळखी व्यक्ती आपल्या घरात आली तर ती ज्या पद्धतीने आपले घर न्याहाळते, त्यावरून आपल्याला तिच्या मनातले भाव ओळखता येतात.
पूर्वीच्या काळी कोणी अनोळखी व्यक्ती आपल्या घरी आली , तर तिला घरात लगेच प्रवेश नसायचा. तिला बाहेरच बसवले जायचे. हे त्या व्यक्तीचा अनादर करण्यासाठी निश्चितच नव्हते. पण आपल्या घरातील स्त्रिया, मुलेबाळे, संपत्ती इ वर त्या व्यक्तीची वाईट नजर पडू नये हा हेतू असायचा. एकदा का ती व्यक्ती पूर्ण परिचयाची झाली की मग काही अडचण नसायची.
पूर्वीच्या गोष्टींना आपण नावे ठेवतो. पण सगळ्याच गोष्टी वाईट नव्हत्या. आताही आपण त्या करतोच. पण जरा नवीन पद्धतीने. अलीकडे ज्या मोठमोठ्या हौसिंग सोसायट्या आहेत, तेथे आपण एकदम आपल्या नातेवाईकाच्या घरात प्रवेश करू शकत नाही. आधी सिक्युरिटीचे लोक आपली चौकशी करतात. त्यांची खात्री झाल्यावर मगच आपण आत जातो. प्रत्येक ठिकाणी सी सी टीव्ही कॅमेऱ्यांची नजर असते. तिथे लिहिलेलं असतं ' आपण सी सी टीव्हीच्या कक्षेत आहात . ' आता नुकत्याच आलेल्या करोनासारख्या साथीमुळे आपण घरामध्ये कशालाही हातपाय धुतल्याशिवाय स्पर्श करत नाही.
आपली नजर ही आपल्या मनातील भावना, विचार प्रतिबिंबित करते. म्हणून कोणाची नजर कधी आश्वासक असते. दिलासा देणारी असते. तर कधी तरी आपल्या आवडत्या व्यक्तीने आपल्याकडे एखादा कटाक्ष टाकावा असे आपल्याला वाटत असते. परमेश्वराच्या किंवा साधुसंतांच्या आपल्याकडे असलेल्या नजरेला आपण कृपाकटाक्ष म्हणतो. कधी कधी कोणाची नजर आपल्याला अस्वस्थ करणारी असते.मग अशी व्यक्ती किंवा तिची उपस्थिती आपल्याला नकोशी वाटते. एखाद्या व्यक्तीकडे, एखाद्या गोष्टीकडे आपल्याला निर्मळपणे, कुठलेही पूर्वग्रह मनात न ठेवता पाहता आले पाहिजे.नजर निर्मळ , नितळ दिसली पाहिजे. हे सरावाने जमू शकते. पण त्यासाठी आपल्याला आपली विचार करण्याची पद्धत बदलावी लागेल. आपले विचार चांगले ठेवावे लागतील.
काही लोकांची दृष्टी ही नेहमी नकारात्मक असते. प्रत्येक गोष्टीत वाईट काय , तेवढे ते शोधून काढतात. त्यांना चांगल्या गोष्टी दिसतच नाहीत, किंवा त्याकडे त्यांचे लक्ष जातच नाही. मागे एक गोष्ट वाचण्यात आली होती. एकदा एका मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलचे उदघाटन होते. त्या समारंभासाठी अत्यंत प्रतिष्ठित लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. अशा वेळी मानसशास्त्रज्ञांनी एक प्रयोग करायचे ठरवले. त्या हॉटेलच्या स्वागत कक्षातील जी समोरची भिंत होती, त्या भिंतीवरील एक वीट लावण्याचे मुद्दाम राहू दिले. बाकी मग स्वागत कक्ष अप्रतिम सजवला होता. सुंदर रोषणाई होती. फुलांची आरास होती. सुंदर पेंटिंग्स लावलेले होते. पण येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष त्या भिंतीकडेच जात होते, जिथे एक वीट लावलेली नव्हती. आणि जाताना प्रत्येक जण म्हणत होता, सगळे छान आहे हो, पण तेवढी एक वीट मात्र लावायला हवी होते. त्यामुळे सगळॆ वाया गेले. फक्त काही मोजकेच लोक असे निघाले की ज्यांनी आपल्या बोलण्यात त्या विटेचा उल्लेख न करता, हॉटेलच्या सौंदर्याबद्दल गौरवोद्गार काढले. तेव्हा जाणीवपूर्वक चांगल्या गोष्टी पाहण्याची सवय लावून घेऊ या.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२

Nice Article, childhood memories
उत्तर द्याहटवाGood one
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाThanks a lot
हटवा*नजर* हटत नाही एकदा वाचायला लागल्यावर��
उत्तर द्याहटवाधन्यवाद धनंजयजी
हटवा