उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य-भाग १८ रवींद्रनाथांची सर्वात मोठी देणगी - जन-गण -मन रवींद्रनाथांची भारताला दिलेली सर्वात मोठी देणगी कोणती असा प्रश्न जर कोणी विचारला तर माझ्या मते आपल्या भारताचं राष्ट्रगीत ' जन-गण -मन ' ही आहे. कारण रोज भारतातील लक्षावधी शाळांची सुरुवात या राष्ट्रगीताने होते. कोटी कोटी कंठातून हे राष्ट्रगीत निनादते. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दिवशी ध्वजाला प्रणाम करताना जेव्हा राष्ट्रगीताचे सूर कानी पडतात, तेव्हा छाती अभिमानाने फुलून येते. एखाद्या चित्रपटगृहात चित्रपट पाहायला जाताना जेव्हा पडद्यावर राष्ट्रगीत सुरु होते, तेव्हा चित्रपटगृहात उपस्थित असलेली सगळी माणसे आपली भाषा, जात, धर्म, पंथ विसरून उभे राहून मानवंदना देतात, तेव्हा अभिमानाने रोमरोम फुलून येतो. कधी कुठे जाताना राष्ट्रगीताचे सूर कानी पडले तर नकळत पावले थांबतात. उभे राहा असे कोणी सांगावे लागत नाही. केवळ ५२ सेकंदात गायिले जाणारे हे राष्ट्रगीत रोमरोम पुलकित करते. जोपर्यंत हे सूर्य चंद्र आहेत, जोपर्यंत ही सस्यश्यामल भारतभूमी अस्तित्वात आहे, तोपर्यंत जन-गण-मन आहे आणि जोपर्यंत जण-गण...