महावस्त्र नात्यांचं महावस्त्राचे पदर - भाग एक ' एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे..' अतिशय अर्थपूर्ण असं हे गाणं. आपल्या आयुष्याला तंतोतंत लागू पडणारं. क्षणभर त्यातील सुखदुःखाचा विषय आपण बाजूला ठेवू, पण आपलं आयुष्य हे एक सुंदर असं जरतारी वस्त्र आहे. जेव्हा आपण नात्यांचा विचार करतो, तेव्हा हे एका 'महावस्त्राचं' रूप घेतं. आपण ज्या घरात जन्म घेतो, त्या घरापासून आणि जन्मापासून काही नाती आपल्याला उपजतच मिळतात. आई, वडील, बहीण, भाऊ यासारखी अनेक नाती रक्ताची असतात. पण आपण समाजात जसजसे मोठे होत जातो, तशी आणखीही अनेक नाती आपल्याशी जोडली जातात. मग ती नाती बऱ्याच वेळा रक्तापलीकडची असतात. अशी बिनरक्ताची नाती कित्येकदा रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असतात. अशी सगळी नाती मिळून तयार होतं ते भरजरी महावस्त्र ! यातील मधले एकमेकात गुंफलेले घट्ट धागे असतात रक्ताच्या नात्यांचे; बाजूची रुपेरी किनार असते समाज नावाच्या नात्याची; आणि पदरावर जी मोरपंखी नक्षी असते ना, ती असते जिवलग मित्रांची! त्यांच्यामुळेच ही भरजरी पैठणी शोभून दिसते. वस्त्राला 'पट...
उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १०२ अती लीनता सर्वभावे स्वभावे । जना सज्जनालागी संतोषवावे । देहे कारणी सर्व लावीत जावे । सगूणी अति आदरेंसी भजावे ।।१०२।। अर्थ : आपल्यामध्ये स्वभावतःच अतिशय नम्रता असावी. अशा सहज नम्रतेने सत्पुरुषांना आनंद द्यावा. आपला देह सर्व चांगल्या कामांसाठी झिजवावा. अतिशय आदरपूर्वक सगुण भक्ती करावी. ( लीनता - नम्रता, सर्वभावे - अगदी मनापासून, कारणी - चांगल्या गोष्टींसाठी ) विवेचन भक्ताच्या अंगी कोणते गुण असावेत ते या श्लोकात समर्थ आपल्याला सांगत आहेत. भगवंताचा भक्त लीन म्हणजे नम्र असतो. अध्यात्मात लीनता हा अतिशय मोठा गुण मानला गेला आहे. ज्या व्यक्तिजवळ लीनता नसेल, त्याच्या ठायी अहंकार निर्माण होतो. हे मी केले, ते माझ्यामुळे झाले अशा प्रकारचा अहंकार निर्माण होतो. साधकासाठी अहंकार हा प्रगतीतील मोठा अडथळा आहे. त्यामुळे आपल्या स्वभावात नम्रता असणे आवश्यक आहे. ती सुद्धा मनापासून असावी. आतून उमलून आलेली असावी. एखाद्या हसतमुख व्यक्तीच्या चेहऱ्यावर असणारे हास्य आतून उमलून आलेले असते. हास्याचा कृत्रिम मुखवटा त्याला धारण करावा लागत नाही. तश...