उगवतीचे रंग कहीं ये वो तो नहीं... काही दिवसांपूर्वी संगीतकार मदन मोहन यांचा जन्मदिन होता. त्यादिवशी त्यांची आणि लतादीदींची खूप गाणी मनसोक्त ऐकली. एक गाणं मात्र मनात खोल रुतून बसलं... एखादं सुंदर मनमोहक कारंजं असतं ना.. ! त्याच्या तळाशी पाणी असतं पण ते पाणी आतून वर येतं आणि सुंदर आकार आणि सुंदर नर्तन करतं. मनाला प्रसन्नता देतं. त्याच्याकडे कितीही वेळ पाहिलं तरी मन भरत नाही. तसेच या गाण्याचे शब्द हृदयाच्या गाभाऱ्यातून उत्स्फूर्तपणे वर येत होते. एखादा अनाहत नाद जसा आतून फुलून वर यावा तसेच या गाण्याचे शब्द राहून राहून सारखे मनात घोळत होते. गाणं मनात रेकॉर्ड झालं होतं आणि प्रतिध्वनी जाणिवेच्या पातळीपर्यंत पोहोचून धडक देत होता. या कारंजाला वेगळ्या संगीताची गरज नव्हती. गाण्याची सुरुवात किती हळुवार केली आहे लतादीदींनी...! जरासी आहट होती है... हे हळुवार शब्द येतात आणि मग आपण त्या गाण्यात गुंततच जातो. कैफी आजमी हे सुंदर या गीताचे कवी. आपल्या प्रियकराची वाट पाहणाऱ्या प्रेयसीच्या अंतर्मनात प्रवेश करून तिच्या अमूर्त भावनांना शब्दात बांधणे ही सोपी गोष्ट नक्कीच नाही. पण ते अवघड...