उगवतीचे रंग महाभारतातील युद्ध : केवळ रणांगणावरचे ... ? महाभारत हा ग्रंथ महर्षी व्यासांच्या अलौकिक प्रतिभेचा अविष्कार आहे, हे जेव्हा महाभारतातील प्रत्येक व्यक्तिरेखा आपण पाहतो, तेव्हा लक्षात येते. महाभारतातील युद्ध केवळ रणांगणावर झालेले नाही. ते मनामनातले पण युद्ध आहे. एक कृष्णाची व्यक्तिरेखा जर सोडली, तर बाकी सर्वांच्या व्यक्तिमत्वाला हे दुभंगलेपण व्यापून राहिले आहे. पितामह भीष्मांपासून आपण सुरुवात करू. भीष्म हे आपल्याच हस्तिनापूरच्या असलेल्या निष्ठेप्रती असलेल्या प्रतिज्ञेने बांधले गेले आहेत. धृतराष्ट्राचे अनेक निर्णय पितामहांना आवडत नाही. दुर्योधनाचे वागणे त्यांना पसंत नाही. शकुनीची कपटनीती ते ओळखून आहेत. पण आपल्या प्रतिज्ञेशी बांधले गेले असल्याने, ते काही करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या मनात कायम द्वंद्व सुरु आहे. आणि ज्याच्या मनात आयुष्यभर असं द्वंद्व सुरु राहतं, त्याच्यावर केवढा मानसिक ताण येत असेल याची कल्पना आपण करू शकतो. म्हणून पितामह भीष्म की जे एक शूर योद्धा आहेत, सगळं तत्वज्ञान आणि नीतीचे गाढे विद्वान आहेत, ते केवळ असहाय झालेले आपण पाहतो. जी गोष्ट भीष्मांची, ती...