उगवतीचे रंग विश्वास देशपांडे, चाळीसगाव भारतरत्नावली उज्ज्वल भारताचे स्वप्न पाहणारा द्रष्टा वैज्ञानिक : डॉ अब्दुल कलाम - भाग दोन आईवडील आणि त्यांच्या शाळेतील शिक्षकांव्यतिरिक्त कलामांच्या बालपणीच्या जीवनावर प्रभाव टाकणारी आणखी दोन व्यक्तिमत्वे होती. एक म्हणजे त्यांचा चुलतभाऊ शमसुद्दीन आणि दुसरे म्हणजे त्यांच्या बहिणेचे पती अहमद जुलालुद्दिन. हे दोघेही त्यांचे नातेवाईक तर होतेच पण त्याहून जास्त त्यांचे मित्र होते. जुलालुद्दिन कलामांच्या वडिलांना नावा दुरुस्तीच्या आणि बांधणीच्या कामात मदत करीत असे. त्या काळात त्या गावात इंग्रजी जाणणारी जुलालुद्दिन ही एकाच व्यक्ती होती. तो गावातील लोकांना त्यांची पत्रे वाचून दाखवत असे. तो कलामांना आपल्याबरोबर फिरायला नेई. त्यांना आधुनिक विज्ञानातील शोध , घटना आणि इतर आश्चर्यकारक गोष्टी सांगे. तो त्यांच्याशी देव आणि त्याची शक्ती याबद्दल बोलत असे. शमसुद्दीनचा वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय होता. त्यावेळी गावात तो एकच वर्तमानपत्र विक्रेता होता. तो कलामांना वर्तमानपत्रात आलेल्या गोष्टी सांगत असे. ...