उगवतीचे रंग
आदतसे मजबूर...
आमच्या घराच्या समोरून थोडे अंतर चालले की आपण मुख्य रस्त्यावर येतो. त्या रस्त्यावरच्या एका कोपऱ्यात एक पानाचा ठेला किंवा पान टपरी आहे. मी लहानपणापासून तिथे गर्दी पाहत होतो. सुरुवातीला माझ्याकडे कोणतेच वाहन नव्हते. साधी सायकलही नव्हती. पायी फिरायला आवडायचे. त्यामुळे वाहन नाही म्हणून तक्रार नव्हती. पण नकळत कधी तरी त्यांचे आकर्षण वाटायचे. मी ज्या पान टपरीचा उल्लेख करतो आहे, त्या ठिकाणी बरेच गाडीवाले थांबायचे. कोणी टू व्हीलरवाले तर कोणी फोर व्हीलरवाले. लहानपणी गाडीबद्दल असणाऱ्या नैसर्गिक कुतूहलातून मी त्यांचे निरीक्षण करायचो.
एखादा टू व्हीलरवाला आपल्या गाडीवरून रुबाबात खाली उतरायचा. त्या पानवाल्याला एकशे वीस किमाम असले काही तरी सांगायचा . तो पानवाला आपल्या ग्राहकांच्या सेवेत अत्यंत तत्पर होता. त्याने प्लॅस्टिकच्या आवरणात अगोदरच काही पुड्या रबर लावून बांधून ठेवलेल्या असायच्या. त्याच्यात आणि त्याच्या ग्राहकांत फार सामंजस्याचे वातावरण होते. कारण त्यांच्यात फारसे संभाषण होत नसायचे. नेहमीच्या परिचयाने दोघे एकमेकाला चांगले ओळखत असत. ग्राहकाने खिशातून नोट काढायची, पानवाल्याला द्यायची. तो ते आधीच बांधून ठेवलेले पुडके लागलीच द्यायचा. सोबत उरलेले सुटे पैसे . कधी कधी काही ग्राहक दिवसभराची सोय करून ठेवावी म्हणून जास्तीच्या दोनचार पुड्या आपल्या खिशात ठेवायचे. इतकी समंजस माणसे पाहून मला आपला देश सुधारू लागला असे उगीच वाटायचे.
मग त्या पानवाल्याचे ते आदरणीय ग्राहक किंवा तो ग्राहकराजा आपल्या गाडीवर आरूढ होण्यापूर्वी ती दिलेली पुडी व्यवस्थित सोडून आपल्या तोंडात रिकामी करायचा. मग त्याच्या तोंडात एका बाजूला छानपैकी फुगा यायचा. चेहेऱ्यावर समाधानाचे, तृप्ततेचे भाव यायचे. त्या तृप्त अवस्थेत आपला मुखरस तोंडात साठवत, तो आपल्या गाडीला किक मारायचा. मग ती गाडीसुद्धा समाधानाने मार्गस्थ व्हायची. एखादी फोरव्हीलर थांबायची. तिचा चालकही गायछाप किंवा तसलेच काही तरी घ्यायचा. हातावर घेऊन त्यावर बोटाने किंवा बोटाच्या नखाने घेतलेला चुना मळत ते मिश्रण पुरेसे एकजीव झाले की बोटाच्या चिमटीत ती पूड घेऊन अत्यंत पद्धतशीरपणे आपल्या तोंडात एका बाजूला व्यवस्थित ठेवायचा. केवढी ही शिस्त..! मग गाडीत बसायचा, आणि ती फोरव्हीलर कोणतीही तक्रार न करता सुरु व्हायची. आणि ते समाधानी जीव मार्गस्थ व्हायचे. ( सध्या गुटखा खाण्यावर बंदी असली तरी गावोगावचे पानवाले आपल्या ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून चोरूनलपून का होईना पण त्यांची ही हौस पुरवतात हा भाग वेगळा. )
खूप दिवस माझा असा समज झाला होता की तोंडामध्ये बार असल्याशिवाय किंवा एका बाजूला गाल फुगलेला असल्याशिवाय कोणतेही वाहन सुरु होत नाही. ते वाहन नीट चालायचे असेल तर तुमच्या तोंडामध्ये बार हा असलाच पाहिजे. त्या पानटपरी जवळची भिंत लाल पिवळ्या तपकिरी रंगात रंगलेली होती. त्या पान टपरीवाल्याच्या उदार ग्राहकांनी त्याला त्या भिंत रंगवण्याचा कोणताही खर्च येऊ नये या उदात्त हेतूने आपल्या पाझरलेल्या मुखरसाने ती आधीच रंगवून ठेवली होती. पुढे मी जसजसा मोठा होत गेलो, तसतसे मला कळू लागले की कुठेही आपल्या मुखरसाची बरसात करायची नाही. त्यासाठी एखादा कोपरा शोधायचा आणि मगच ते सत्कृत्य करायचे. या चांगल्या सवयीमुळे सरकारी कार्यालये, वाचनालय इतकेच काय पण शाळांचे कोपरे, सार्वजनिक स्वच्छतालये इ चे कोपरे लोकांनी रंगवलेले होते. इतरत्र कुठेही त्यांनी आपल्या मुखरसाची बरसात केली नव्हती.
पण काही हुशार लोकांनी इमारतींच्या कोपऱ्यात देवाच्या चित्रांच्या टाईल्स बसवून अशा लोकांची फार पंचाईत केली होती. आणि त्या बिचाऱ्यांना कुठे बोलताही येत नव्हते. सगळा तोंड दाबून बुक्क्याचा मार . त्यांना काही पर्याय द्यायला नको का ? बरं सगळीकडे लिहून ठेवलंय ' येथे थुंकू नका. ' पण मग थुंकायचे तरी कुठे ? आणि आता तर काय म्हणे मायबाप सरकारने त्याच्यावर दंडच लावलाय . काय करायचं बिचाऱ्यांनी ! परदेशात म्हणे खूप स्वच्छता असते. कोणी कागदाचा कपटा सुद्धा रस्त्यावर टाकत नाही. मग थुंकणे तर दूरची गोष्ट ! पण जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशात केवढे हे स्वातंत्र्य..!
आम्ही कधी शहाणे होणार ? शिकलेल्यांची आणि न शिकलेल्यांची परिस्थिती सारखीच. आणि आता तर करोनासारख्या घातक विषाणूने जगभर थैमान घातले आहे. रोज करोनाबाधितांची संख्या वाढते आहे. करोनाचे विषाणू रोग्याच्या थुंकीमार्फत वातावरणात पसरतात. ते तुमच्या आमच्या श्वासात हवेतून गेले की आपल्यालाही त्यांचा संसर्ग होऊ शकतो. म्हणून आता बदलायला हवे. कोणत्याही बदलाची सुरुवात ही स्वतःपासून होत असते. आपले वैयक्तिक आणि सार्वजनिक आरोग्य सांभाळायचे तर स्वच्छतेला आणि चांगल्या सवयींना पर्याय नाही.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा