उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ४८
सदा देवकाजी झीजे देह ज्याचा |
सदा रामनामे वदे नित्य वाचा |
स्वधर्मेचीं चाले सदा उत्तमाचा|
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा|४८|
अर्थ : जो भक्त केवळ परमेश्वराच्या कार्यासाठीच आपला देह झिजवतो, ज्याच्या मुखात अखंड रामनाम आहे आणि स्वधर्माच्या म्हणजे आपल्या कर्तव्याच्या मार्गावर जो उत्तम रीतीने वाटचाल करतो तो भक्त म्हणजे सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय.
विवेचन
देवकाज म्हणजे देवाचे कार्य. खरा भक्त नित्य परमेश्वराचेच काम करीत असतो. तो दोन प्रकारे कार्य करतो. स्वतः परमेश्वराचे नामस्मरण तर करतोच परंतु इतरांनाही परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाने वळवतो. सगळ्या संतांनी हेच परमेश्वराचे कार्य केले आहे. स्वतः नाम घेता घेता त्यांनी इतरांनाही नामाला लावले आहे. मग असा भक्त कोणतेही काम करीत असेल तर ते भगवंताचेच कार्य असते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी आपल्या आयुष्यात अखंड रामनाम घेतले परंतु ही करीत असताना त्यांनी हजारो भक्तांना रामनामाची गोडी लावली. स्वतः समर्थ रामदास यांनी रामनामाचे आणि गायत्री मंत्राचे अखंड पुरश्चरण केले. स्वतः अकरा मारुतींची स्थापना केली आणि गावोगाव श्रीराम आणि मारुतीची मंदिरे निर्माण करवली. मठ उभारून महंत घडवले. हे सगळे भगवंताचेच कार्य त्यांच्या हातून झाले. त्या कार्यातच त्यांचा देह झिजला.
भगवंताचे कार्य करायचे म्हणजे केवळ नामस्मरणच केले पाहिजे असे काही नाही. रंजल्या गांजल्यांची, दीनदुबळ्यांची, प्राणीमात्रांची सेवा म्हणजे ईश्वर सेवाच आहे. ते देखील भगवंताचे कार्य आहे असे म्हणता येईल.
भक्ताने नेहमी ईश्वरसन्मुख राहिले पाहिजे. तसे राहण्यासाठी भगवंताचे नाम अखंड त्याच्या मुखात आले पाहिजे. ज्याच्या मुखात भगवंताचे नाम अखंड असते असा भक्त धन्य होय. व्यवहारांमध्ये बोलताना भलेही त्याला लोकरीतीनुसार व्यवहार करावा लागेल. परंतु अंतरातील भगवंताचे चिंतन अखंड सुरूच राहते.
तिसऱ्या ओळीत समर्थ म्हणतात, "स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा" म्हणजे आपल्या वाट्याला आलेले काम तोच आपला स्वधर्म समजून जो उत्तम प्रकारे करतो तो भक्त धन्य होय. बऱ्याच वेळा हे जग म्हणजे एक रंगमंच आहे आणि आपण सर्व त्यावरील कलाकार आहोत असे म्हटले जाते. आपल्या वाट्याला जी भूमिका आली असेल ती उत्तम प्रकारे करणे हे आपले काम आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तोच आपला स्वधर्म आहे तो आपल्याला उत्तम रीतीने निभवता आला पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात
तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा ।
पूजा केली होय अपारा । तोषालागी ।।
त्या सर्वात्मक ईश्वराला स्वकर्म कुसुमांनी केलेली पूजा अतिशय प्रिय आहे. म्हणजेच आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडणे हे त्याला आवडते. मग तुम्ही मंदिरात किंवा तीर्थयात्रेला गेला काय आणि नाही गेलात तरी चालू शकते. प्रत्येकाने आपले काम जर उत्तम प्रकारे केले तर हीच त्या परमेश्वराची अतिशय चांगल्या प्रकारे पूजा आपण बांधली असे होईल. मग जगामध्ये आपोआपच सज्जनांची मांदियाळी तयार होईल आणि सगळे सुखी होतील. तेव्हाच ऋषींनी सांगितलेले अस्तित्वात येईल
सर्वेऽपि सुखिनः सन्तु। सर्वे सन्तु निरामयाः॥
सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चिद् दुःखभाग्भवेत्॥सर्व सुखी होतील सर्वांना आरोग्य लाभेल. अर्थात प्रत्येकाने आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडले तर... आणि असे वागणारा भक्त जगामध्ये धन्य होईल. भगवंताच्या उत्कृष्ट भक्तांमध्ये त्याची गणना होईल.
स्वसंवाद
१) माझ्या दैनंदिन कामात मी "देवकाज" पाहतो का – माझे काम म्हणजे परमेश्वराची सेवा आहे असा भाव माझ्या मनात असतो का ?
२) "स्वधर्म" म्हणजे माझ्या वाट्याला आलेली भूमिका – ती मी उत्तम प्रकारे निभावतो का की इतरांच्या भूमिकेकडे माझे लक्ष जास्त असते ?
३) माझ्या नामस्मरणाने किंवा वागण्याने इतर कोणाला परमेश्वराकडे वळण्याची प्रेरणा मिळाली आहे का ?
(क्रमशः)
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
८/४/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा