मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ५३

 उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ५३

सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी ।

सदा सर्वदा सत्यवादी विवेकी |

न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा |

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ||५३||

अर्थ : नेहमी नम्रतेने बोलणारा आणि आपल्या मधुर वाणीने लोकांना आपलेसे करणारा, सत्यवचनी आणि विवेकी असणारा, त्याचप्रमाणे कधीही वायफळ आणि असत्य न बोलणारा असा जो परमेश्वराचा भक्त असतो तो जगामध्ये खरोखरच धन्य होय.

( आर्जवी - नम्र, मिथ्य वाचा - खोटे बोलणे, त्रिवाचा - त्रिवार /निश्चित / ठामपणे. परंतु येथे बोलण्यात एकवाक्यता नसलेला असा अर्थ घेता येतो )

विवेचन 

 भक्ताने कसे असावे ते या श्लोकातही समर्थ सांगत आहेत. त्याचे बोलणे आर्जवी असते. आर्जवी म्हणजे नम्र. आर्जवी म्हणजे लाचार नव्हे. ज्याला (ईश्वराचे) ज्ञान झाले आहे असा भक्त आपोआपच नम्र होतो. फळांनी लगडलेले झाड जसे झुकलेले दिसते त्याप्रमाणे खरा ज्ञानी, विद्वान आणि भगवंताचा भक्त नम्र असतो. ही नम्रता त्याला कोठून उसनी आणावी लागत नाही. ती त्याच्या आतूनच उत्स्फूर्तपणे येते. 

 समर्थांना मधुर बोलणे अतिशय प्रिय आहे. दासबोधामध्ये ते म्हणतात, 

पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते|

तरी मग कर्कश बोलावे ते, काय निमित्ये ||

 आपण जसे बोलू तसे उत्तर समोरून मिळेल. मग विनाकारण दुसऱ्याला लागेल असे बोलण्यात काय अर्थ ? काही लोक बोलण्यात अत्यंत फटकळ असतात. आपल्या बोलण्याने लोकांची मने दुखावतात. अशी माणसे अप्रिय होतात. मग भलेही ती स्वतःला स्पष्टवक्ता म्हणवून घेतात. परंतु त्यांचा स्पष्टवक्तेपणा इतरांना जखम करणारा असतो. आपण गोंदवलेकर महाराजांची प्रवचने वाचली असतील तर त्यातील भाषा किंवा कधी के वि बेलसरे यांचे निरूपण ऐकले असेल तर त्यांचे बोलणे किती नम्र आणि मधुर होते याचा प्रत्यय आपल्याला येतो. हीच खऱ्या भक्ताची लक्षणे आहेत.

"सत्यम बृयात, प्रियम बृयात." गोडही बोलायचे आणि सत्यही बोलायचे ही तारेवरची कसरत असते. परंतु दुसऱ्याला न दुखवता देखील सत्य सांगता येते. असा भक्त समर्थांनी सांगितल्याप्रमाणे सदा सर्वदा म्हणजे नेहमी सत्य बोलतो. परंतु या सत्य बोलण्यात विवेकाचा वापर तो करतो. एखाद्या अत्यवस्थ किंवा शेवटच्या घटका मोजत असणाऱ्या रुग्णाला जर आपण भेटायला गेलो आणि त्याला म्हटले की आता ही तुझी शेवटची अवस्था आहे. त्यातून तू बरा होणार नाहीस. असे बोलणे सत्य जरी असले तरी ते अविवेकाचे आहे. म्हणून अशा वेळी विवेकाचा वापर करून, " तू बरा होणार आहेस. तुला लवकरच बरे वाटेल. " अशा प्रकारचा धीर देणे उपयुक्त ठरते.

 खोटे बोलणे आणि स्वतःच्या असत्य वागण्याचे लटके समर्थन करीत राहणे ही सवय बऱ्याच लोकांना असते. परंतु काही काळानंतर लोकांना अशा माणसांचा स्वभाव लक्षात येतो आणि मग त्यांच्या बोलण्यावर ते फारसा विश्वास ठेवत नाहीत. ते बोलतात एक करतात दुसरे आणि वागतात तिसऱ्या प्रकारचे. अशा वागणाऱ्यांसाठी समर्थांनी त्रिवाचा हा शब्द वापरला आहे. म्हणजे ज्यांच्या वागण्याबोलण्यात एकवाक्यता नसते अशा व्यक्ती. परमेश्वराचा खरा भक्त कधीही असत्य बोलून आपली जीभ विटाळत नाही. त्याला खोटे बोलण्याची गरजही भासत नाही. कारण त्याला काही लपवायचे नसते. खोटे ते बोलणाऱ्या माणसाला आपल्या बोलण्याची वेगवेगळी कारणे सांगावी लागतात. आणि आपण आधी काय बोललो होतो हे लक्षात ठेवावे लागते. भक्त हा निर्मळ मनाचा आणि सरळ स्वभावाचा असतो. त्यामुळे त्याच्या वागण्या बोलण्यात एकवाक्यता असते. त्यामुळे तो जे बोलतो ते सत्यच असते. त्याचे शब्द त्याच्या निर्व्याज आणि निरलस व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब असतात.

आणि ज्याच्या शब्दांत सत्य, नम्रता आणि विवेक असतो, तोच खरा “सर्वोत्तमाचा दास” ठरतो.

स्वसंवाद :

१) माझ्या बोलण्यात नम्रता आणि माधुर्य आहे का?

२) “स्पष्ट बोलतो” या नावाखाली मी कधी दुसऱ्याला दुखावतो का?

३) सत्य बोलताना मी विवेकाचा वापर करतो का?

४) माझे विचार, बोलणे आणि वागणे यात सुसंगती आहे का?

(क्रमशः)

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव

१४/४/२०२६

प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...