उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ५४
सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी |
मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी |
चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा |
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा |५४|
अर्थ : जो भक्त तरुणपणी एकांतात राहून आपला काळ घालवतो, कल्पनेच्या राज्यात जो रमत नाही, ज्याची भगवंतावरील श्रद्धा अढळ असते, असा भक्त खरोखरच त्या सर्वोत्तम असलेल्या भगवंताचा जगामध्ये धन्य असलेला दास आहे.
( सेवि - काळ घालवणे, आरण्य - एकांतवास, मिळेना - मिसळत नाही, मेळी - समूह, चळणे - परावृत्त होणे )
विवेचन
ज्या व्यक्तीला भगवंताची ओढ लागलेली अशी व्यक्ती तरुणपणातच एकांतात राहून त्याचे ध्यान किंवा नामस्मरण करणे पसंत करते. इथे समर्थांनी अरण्य हा शब्द जरी वापरलेला असला तरी प्रत्यक्षात अरण्यातच जाऊन राहिले पाहिजे असा त्याचा अर्थ नाही तर भगवंत प्राप्तीसाठी एकांतात जाऊन तपश्चर्या करणे आवश्यक आहे हा त्याचा अर्थ घेता येतो. आजच्या काळात ही गोष्ट थोडीशी विचित्र वाटेल. तरुणपणातच कसे काय एकांतात राहायचे आणि भगवंताचे ध्यान करायचे? ती तर म्हातारपणी करण्याची गोष्ट आहे अशी आपली समजूत असते. पण साधना ही पुढे ढकलण्याची गोष्ट नव्हे तर तरुणपणीच करण्याची गोष्ट आहे.
एकांताची सवय होण्यासाठी घरातील एखादा निवांत कोपरा किंवा जवळचे एखादे शांत मंदिर अशा ठिकाणी जाऊन स्वसंवाद करता येईल. काही काळ टीव्ही, मोबाईल यासारख्या गोष्टींपासूनही दूर राहण्याची सवय करावी लागेल.
पण समर्थ या अनुभवातून गेले आहे. "आधी केले मग सांगितले" असेच त्यांचे बोल आहेत. अगदी तरुणपणी त्यांनी नाशिक जवळील टाकळी येथे राहून बारा वर्षांचा काळ एकांतात घालवला. ज्ञानेश्वरादी भावंडांनी एकांतात राहूनच तपश्चर्या केली. संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर एकांतात आपला काळ घालवित असत.
तरुण वयात उत्साह असतो, काहीतरी करण्याची जिद्द असते अशावेळी एकांताचे सेवन सहज होऊ शकते. जेव्हा सगळी गात्रे थकलेली असतात अशावेळी एकांतात राहणे मनुष्याला शक्य होत नाही. वृद्धापकाळी मुलांशी पटत नाही म्हणून जंगलात जाऊन राहणे हे लादलेले वैराग्य म्हणता येईल. तीर्थयात्रा, निरनिराळ्या ग्रंथांचा अभ्यास, भजन, प्रवचन, कीर्तन इत्यादी गोष्टी तरुणपणीच उत्तमरीत्या करता येतात. मुखात रामाचे नाव तरुणपणीच यायला हवे. आयुष्यभर जर जिभेवर राम नाही आला तर अंतिम समयी तरी तो कसा येईल? त्यावेळीही कामच आठवेल.
तरुणपणीच भगवत भजनात रमलेला माणूस चुकूनही कल्पनेच्या राज्यात रममाण होत नाही. जी माणसे कल्पनेच्या राज्यात रमतात, ती कोणतेच कर्तव्य नीट पार पाडू शकत नाहीत. एकांताची सुद्धा सवय व्हावी लागते. एकांत पचावा लागतो. त्याची सवय व्हावी लागते. काही लोकांना समूहात राहण्याची एवढी सवय असते की ते एकांत सहन करू शकत नाहीत. पण सदैव लोकांमध्ये राहिले तर काही काळाने माणसाचे मन मलिन होते आणि मग अशा वेळी एकांत आणि स्व चिंतन आवश्यक असते. म्हणूनच पूर्वीची माणसे काही काळ साधनेसाठी म्हणून घरातून निघून जात असत. आणि काही काळानंतर परत येत असत. दैनंदिन जीवनातील ताणतणाव, धावपळ इत्यादी गोष्टींना कंटाळलेली काही माणसे वर्षातून काही दिवस नियमितपणे विपश्यनेसाठी जातात त्याचाही उद्देश हाच असतो.
एखाद्याला भगवंत प्राप्तीची ओढ लागली तरी त्याचा उत्साह काही दिवस टिकतो आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरू होते. कारण लोकांमध्ये राहून त्याच्या मनात वेगवेगळे विचार येतात. तर कधी त्याचा बुद्धिभेद होतो आणि त्याचा जो निश्चय असतो तो ढळतो. माणसाचे मन अतिशय चंचल असते. बंधनात राहणे, एकच एक गोष्ट करणे त्याला आवडत नाही. म्हणून करुणाष्टकामध्ये समर्थ म्हणतात, " घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा, म्हणवुनी करुणा हे बोलतो दीनवाचा... "परंतु परमेश्वराचा जो खरा भक्त असतो आणि तरुणपणापासूनच जाऊ भगवंत प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतो अशा व्यक्तीचा निश्चय कधीही ढळत नाही अशी व्यक्ती म्हणजे परमेश्वराची खरोखरच प्रिय भक्त असते.
स्वसंवाद :
१) मी साधना/नामस्मरण “नंतर करू” असे पुढे ढकलतो आहे का?
२) माझ्या दिवसात मला एकांतासाठी किती वेळ मिळतो? की मी तो जाणीवपूर्वक टाळतो?
३) मी वास्तवात कृती करतो का, की कल्पनांच्या जगातच रमतो?
४) माझा आध्यात्मिक निश्चय किती दृढ आहे? अडचणी आल्या की तो ढळतो का?
५) आजपासून मी एक छोटी पण सातत्यपूर्ण साधना सुरू करू शकतो का?
समारोप :
जीवनाचा पाया तरुणपणी घातला जातो…
आणि ज्याने त्या काळात मनाला दिशा दिली,
त्याचा संपूर्ण जीवनप्रवास प्रकाशमान होतो.
(क्रमशः)
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१५/४/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा