उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ५९
मना कल्पना कल्पिता कल्पकोटी |
नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी |
मनी कामना राम नाही जयाला |
अति आदरे प्रीति नाही तयाला ||५९||
अर्थ
हे मना, नाना प्रकारच्या अनंत कल्पना तू करीत राहिलास तर भगवंताचे दर्शन कदापिही शक्य नाही. ज्याच्या अंतरात वासना असतील, त्याच्या मनामध्ये भगवंताविषयीची कामना निर्माण होणे शक्य नाही आणि भगवंताविषयी कामना नसेल तर त्याच्यावर आदरयुक्त प्रेम कसे राहील ?
( कल्पिता - कल्पना करणे, कल्पकोटी - अनंत/ नाना प्रकारच्या )
विवेचन
आपल्या जीवनात कल्पनेचे देखील काही एक विशिष्ट स्थान आहे. आपल्या मनातील कल्पना चांगल्या आणि विधायक असतील तर व्यवहारात त्या प्रत्यक्षात येऊ शकतात, त्यांचा उपयोग होतो. परंतु त्या कल्पनांना जर योग्य दिशा नसेल आणि त्या विधायक नसतील तर त्या जीवनाचा नाश करू शकतात. सदैव कल्पनेच्या राज्यात रमणारा माणूस व्यवहारात अयशस्वी होतो. त्याला धड प्रपंचही जमत नाही आणि धड परमार्थही तो करू शकत नाही. अशी अनेक उदाहरणे आपण आपल्या अवतीभवती नेहमी पाहतो.
समर्थांनी दासबोधात सांगितले आहे की आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका. ज्याला प्रपंच नीट करता आला नाही त्याला परमार्थ कसा जमणार ? म्हणून आपल्याला यशस्वी प्रपंच करून परमार्थाकडे वाटचाल करायची आहे. अस्थिर मनाने प्रपंच आणि परमार्थ ही साधणार नाही.
कल्पना करीत राहणे हा मानवी स्वभाव आहे. या कल्पनाच आपल्याला विषयांच्या राज्यात घेऊन जातात आणि त्यांच्या तीव्र ओढीने विषयांचे सेवन आपल्याकडून घडते. साहजिकच भगवंतापासून आपण दूर जात असतो. ज्याप्रमाणे एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे मनामध्ये विषय चिंतन आणि भगवंत या दोन्ही गोष्टी एकाच वेळी राहू शकत नाहीत. मन एकाच गोष्टीला पूर्णपणे वाहिले पाहिजे.
परमार्थाकडे वाटचाल करताना मनामध्ये वासना असता कामा नये. वासना असतील तर आपल्याला भगवंत हवा, अगदी मनापासून हवा असे वाटणारच नाही. जोपर्यंत आपल्याला भगवंत हवाच आहे असे मनापासून वाटत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होणार नाही.
भगवंत हवा आहे असे मनापासून वाटत असेल तर विषयाकडे धावणारी वृत्ती सवयीने हळूहळू कमी करायला हवी. त्यासाठीच नामस्मरण, पूजा, सत्संग, साधना इ. गोष्टी सांगितल्या आहेत.
पण विषयाकडे धावणारे मन नाना प्रकारच्या कल्पना करीत राहते. मनाची शक्ती अपार आहे. परंतु आपण या शक्तीचा योग्य वापर करण्यापेक्षा गैरवापरच जास्त करीत असतो. दिशाहीन आणि निरुपयोगी कल्पना मनाला थकवा आणतात. म्हणूनच मनाला प्रयत्नपूर्वक योग्य मार्गावर आणायला हवे आणि त्याला योग्य दिशा द्यायला हवी. मला भगवंत हवा आहे अशी निव्वळ इच्छा करून तो प्राप्त होणार नाही. तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. विवेक आणि वैराग्य धारण करावे लागेल. भगवंत हवा असेल तर अन्य सर्व इच्छांचा त्याग करून त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. एखाद्या गोष्टीचा नित्य सहवास लाभला की त्याबद्दल आपल्याला प्रेम निर्माण होते. त्याप्रमाणेच सतत भगवंताचे नाम घेत गेल्याने त्याच्याबद्दल आदरयुक्त प्रेम निर्माण होईल.
स्वसंवाद
१) माझ्या मनात दिवसभर कोणत्या प्रकारच्या कल्पना सर्वाधिक येतात – विधायक की विषयप्रधान?
२) मी वास्तवात जगतो का, की कल्पनांच्या जगात जास्त वेळ घालवतो?
३) मला खरोखर भगवंताची ओढ आहे का, की ती केवळ एक वरवरची इच्छा आहे?
४) मी माझ्या मनाला जाणीवपूर्वक योग्य दिशेला वळवण्यासाठी काही प्रयत्न करतो का (नामस्मरण, वाचन, सत्संग)?
(क्रमशः)
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२८/०४/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा