उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ५२
क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे।
न लिंपे कदा दंभ वादे विवादे॥
करी सुखसंवाद जो उगमाचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५२॥
अर्थ : खरा भक्त तत्वचिंतनात वेळ घालवतो. अहंकार, दंभ आणि वादविवादात तो वेळ घालवत नाही किंवा त्यात गुंतून पडत नाही. तो उगमाचे म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाचे चिंतन करून स्वतःशी किंवा इतरांशी सुख संवाद साधतो असा भक्त परमेश्वराचा खरोखरच धन्य असा भक्त होय.
( क्रमी - वेळ घालवतो, तत्त्वचिंतन - परमात्मस्वरूपाचे चिंतन, अनुवाद - आचरण /अनुकरण, लिंपे - लिप्त होत नाही किंवा दोष लावून घेत नाही, दंभवाद - फसवा युक्तिवाद, विवाद - निष्फळ वाद, उगम - मूळ स्वरूप )
विवेचन
खरा भक्त आपला वेळ कसा घालवतो हे समर्थ पहिल्या आणि तिसऱ्या ओळीत सांगतात तर भक्ताने कसे असू नये हे दुसऱ्या ओळीत त्यांनी सांगितले आहे.
क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे...
साधकाचे अंतिम ध्येय परमेश्वराला प्राप्त करून घेणे हे असते एकदा त्याने ही गोष्ट आपल्या मनाशी निश्चित केली की मग त्याचे चिंतन करण्यातच तो आपला वेळ घालवतो. त्याव्यतिरिक्त जो इतर गोष्टींमध्ये आपला वेळ घालवतो तो खरा साधक नव्हेच ! तो मूळ तत्वाचे म्हणजे परमेश्वराचे चिंतन करतो. याच ओळीत अनुवादे हा शब्द आला आहे याचा अर्थ नीट समजून घ्यायला हवा. साधारणपणे अनुवाद म्हणजे भाषांतर असे आपण समजतो परंतु या ठिकाणी त्याचा अर्थ आचरण किंवा अनुकरण असा घ्यायला हवा. म्हणजे ज्याला परमेश्वराच्या मूळ स्वरूपाचे ज्ञान झाले आहे तो साधकाने जसे वागायला हवे तसेच वागत असतो. आपल्या गुरूंनी किंवा आपल्या श्रेष्ठ ग्रंथांनी जी गोष्ट सांगितली आहे, त्याचे अनुकरण करत असतो. त्याचा अनुभव घेत असतो. ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाबद्दल एक तरी ओवी अनुभवावी असे म्हटले जाते. म्हणजे केवळ ज्ञानेश्वरीवाचून उपयोग नसतो तर त्याप्रमाणे वागून त्या ओवीची अनुभूती घेणे, अनुभव प्राप्त करणे हा त्याचा अर्थ आहे आणि खरा भक्त तेच करत असतो.
असा भक्त निष्करण वादविवादात गुंतून पडत नाही. आपल्याला थोडेफार ज्ञान झाले, काही मोजक्या ग्रंथांचे आपण वाचन केले म्हणजे आपल्याला फार कळते आहे असे आपल्याला वाटू लागते. मग आपण ते दाखवण्यासाठी समोरच्या व्यक्तीशी वादविवाद करत बसतो आणि मी किती श्रेष्ठ आहे, मला किती कळते हे अप्रत्यक्षपणे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. खरा भक्त बोलतो, गातो ते फक्त परमेश्वराबद्दल बोलण्यासाठीच. त्याचीच महती तो गात असतो. म्हणून तो व्यर्थ वादविवादात पडत नाही किंवा त्यात स्वतःला गुंतवून घेत नाही.
आपल्याला दिवसाचे चोवीस तास मिळतात. त्यातील आठ ते दहा तास झोपेत जातात. दहा ते बारा तास आपली नोकरी, प्रपंचाचे काम यात जातात आणि उरलेले तीन -चार तास आपण आपल्या मनाप्रमाणे घालवतो. त्यात टीव्ही पाहणे, मोबाईल पाहणे, मित्रमंडळींमध्ये गप्पा मारणे यासारख्या गोष्टी करतो. खरा भक्त या वेळेत काय करतो ? तर तो स्वतःशी संवाद साधतो, आत्मचिंतन करतो. त्यालाच सुखसंवाद असे म्हणता येईल. हा सुखसंवाद उगमाकडे जाण्याचा असतो. गंगा नदी किंवा यमुना नदी आपण पाहिलेली असते परंतु हिमालयात प्रवास करणारे यात्रिक किंवा भाविक गंगोत्री किंवा यमुनोत्री म्हणजेच गंगेच्या किंवा यमुनेच्या उगमपर्यंत जातात. म्हणजेच मूळ स्थान शोधून काढतात.
आपल्यालाही मनुष्यजन्म प्राप्त झाला आहे. परंतु आपणही आपले मूळ स्वरूप काय आहे हे जाणून घेतले पाहिजे. कोहम म्हणजे मी कोण आहे, माझे मूळ स्वरूप कोणते आहे असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. मग आपण सोहम पर्यंत येतो म्हणजे तो मीच आहे हे आपल्याला कळू लागते आणि मग आपलाच आपल्याशी संवाद होऊ लागतो. " तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी." आणि जेव्हा भक्ताच्या वागण्यात ही सगळी लक्षणे दिसू लागतात, तेव्हा तो फक्त खरोखरच परमेश्वराचा धन्य भक्त ठरतो.
स्वसंवाद
१) माझा रिकामा वेळ कशात जातो – तत्त्वचिंतनात की मोबाईल, गप्पा यासारख्या गोष्टींमध्ये ?
२) मला थोडे ज्ञान झाले म्हणून मी वादविवादात पडतो का – की माझ्या ज्ञानाचे आचरण करण्यावर माझा भर असतो ?
३) "कोहम ते सोहम" – मी कोण आहे हा प्रश्न मला कधी पडला आहे का ? माझ्या मूळ स्वरूपाचा शोध घेण्याची माझ्या मनात खरी ओढ आहे का ?
(क्रमशः)
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१४/४/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा